गणपती विशेष मुख्यपान

गणपतीच्या पूजेत २१ पत्री

भारतीय संस्कृतित पूजेत वाहण्यात येणारी फुले, पाने यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. विविध देवतेनुसार पूजा साहित्यामध्ये बदल बघावयास मिळतो. काही दिवसांत गणेशाचे आगमन होणार आहे. गणपतीच्या पूजेत २१ पत्रीचा समावेश असतो. या पत्रींचे औषधी गुण आपण जाणून घेऊ यात.

१  पिपंळयाला 'बोधीवृक्ष' म्हणतात. गौतम बुध्दांना याच झाडाखाली आत्मज्ञान प्राप्त झाले होत. हवा शुध्दकरण्यासाठी हे एकच झाड एअरकुलर सिस्टीमच्या पाचपट अधिक काम करते. 

याच्या पानांत औषधी गुणधर्म असतात म्हणून आदिवासी भागात या पानांवर मुलांना जेऊ घातले जाते. पिपंळाची लाख (राख) खडीसाखरेबरोबर दिल्यास चांगली झोप लागते.

 २  केवडा - ही वनस्पती समुद्र किनार्‍यावर मोठया प्रमाणात आढळते. ही वनस्पती थायरॉईडच्या दोषावर गुणकारी ठरते.

३  हादगा - हादग्याला आपण 'अगस्ती' म्हणूनही ओळखतो. याच्या फुलांची भ्‍ाजी छान लागतात. या फुलात अनेक जीवनसत्वांचा खजिना आहे. हा वृक्ष मध्यम आकाराचा आहे.

४  बोर - बोराच्या बियांचे चुर्ण चेहर्‍यांवर लावल्यास पुटकुळया जातात. मध्यम आकाराचा हा काटेरी वृक्ष डोळे जळणे, तापावरील दाह यासाठी उपयुक्त ठरतो.

५  मधुमालती - मधुमालती ही वेल तशी शहरात बंगल्यांमध्‍ये सहज बघावयास मिळते. ही एक काष्ट वेल आहे. गुलाबी, पांढर्‍या, पिवळया रंगाची फुले व सदाहरित पाने हे त्याचे वैशिष्टय.

फुफ्फुसाचे विकार, त्वचारोग, सांधेदुखी, पोटातील कृमी कमी करण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग होतो. 

६  माका - पावसाळयात आढळणारी ही वनस्पती डोंगर - टेकडयांवर नजर लावून तिचा शोध घ्यावा लागतो. माका रसायन आहे. रसायन म्हणजे कोणत्याही प्रकारचा रोग होऊ न देणारे औषध. मूत्रपिंडाचा आजार, कावीळ, त्वचारोग, विंचूदंश आदी रोगांवर माक्याचे औषध प्रभावी ठरते. 

७  बेलपत्र - शंकराचे बेलपत्र सर्वांना परिचित आहे. या वनस्पतीचा उपयोग पोटातील जंतावर गुणकारी आहे. अतिसार, आव, धडधड, उष्णता आदींसाठी हिचा उपयोग होतो.

८ धोतरा - धोतर्‍याचा काळा, पांढरा, व राजधोतरा अशा तीन जाती आहेत. या वनस्पतीपासून अफ्रोपिन नावाचे औषध काढतात. वेदनाशक म्हणून त्याचा उपयोग केला जातो. ही वनस्पती पडिक जागेत उगविणारी विषारी वनस्पती आहे. काटेरी पांढर्‍या लांब नरसळ्यासारखे फूल दमा, कफ, संधिवात आदी रोगांवर उपयुक्त ठरते. या वनस्पतींची रोपे शहरात रस्त्याच्या कडेला हमखास दिसतात.

९  तुळस - ही वनस्पती चोवीस तास ऑक्सिजन देणारी आहे. डासांना पळवून लावणारी तुळस जवळपास प्रत्येक घरात बघावयास मिळते. तुळशीत राम, कृष्ण असे दोन प्रकार असले तरी आणखी तीन चार इतर प्रकारही आहेत. कफ, दम, सर्दी, कीटक दंश तसेच कॅन्सर सारख्या रोगांवर तुळशीचा रस औषध उपयोगी पडतो.

१०  दुर्वा - ही एक गवताच्या जातीची वनस्पती आहे. पांढरी (श्वेत) आणि निळा (नील) या दोन जाती आहेत. पांढ-या दुर्वा गणेशाला प्रिय असते. आपल्याकडे तिला 'हरळ' म्हणतात. 

नाकातून रक्त येणे, ताप, अंगातील दाह कमी करण्यासाठी दूर्वांचा रस अमृतासमान असतो. दूर्वा रस्त्याच्या बाजूला, बागेतही मिळतात.

११ शमीशमीला सुप्त 'अग्नीदेवता' असेही म्हणतात. त्यामुळे यज्ञाच्या ठिकाणी शमीची रवी ठेवतात. हा वृक्ष कोरडया हवामानात वाढणारा आहे. त्वचारोग, दमा, मूत्रपिंड या आजारांवर शमी प्रभावी ठरते. 

१२  विष्णुकांता - या वनस्पतीला आपल्याकडे 'शंखपुष्पी' म्हणतात. बुध्दीवर्धक म्हणून ही वनस्पती विद्यार्थी वर्गात लोकप्रिय आहेत. ब्रेन टॉनिक म्हणून अत्यंत उपयोगी आहे. निळसर फुले येणारी ही वनस्पती जमिनीलगत उगविणारी आहे. या वनस्पतीचा उपयोग मानसिक विकारावर औषध म्हणून केला जातो. नदीच्या बाजूला, डोंगर-टेकडया आदी ठिकाणी ही आपण बघू शकतो.

१३  आघाडा - ऋषीपंचमीच्या दिवशी महिला मुखमार्जनासाठी त्याचा वापर करतात. आघाडा मुखरोग व दंतरोगावर उत्तम औषध आहे. ही वनस्पती पडिक जागेत माळरानांवर बघावयास मिळते.

१४  डाळिंब - आपल्याकडे आरक्ता आणि गणेश अशा दोन जाती मोठयाप्रमाणात बघावयास मिळतात. देखणी फुले, काहीसे काटेरी झुडूप आहे. याचा उपयोग जंतावर गुणकारी आहे. काविळीसाठीही उपयोग केला जातो.

१५  डोरली - या रोपाला 'काटे रिंगणी' म्हणूनही ओळखतात. या वनस्पतीच्या पानवर देखील काटे असतात. त्वचारोग, पोटातील विकार, मूत्ररोगांवर हे झुडूप फायदेशीर ठरते. आदिवासी भागात हे झुडूप मोठ्या प्रमाणात आढळते. 

१६  देवदार - हा महाकाय वृक्ष पश्चिम घाट, हिमालयात आढळतो. या वृक्षाचे लाकूड अतिशय मजबूत असते. कफ, पडसे, संधिवात यासाठी याचा रस फायदेशीर ठरतो. याची झाडे महाराष्ट्रात नाशिकजवळ पेठ, हरसूल भागात देखील दिसतात.

१७  कण्हेर - कण्हेरीची पाने व मुळाचा साठा औषधी आहे. परस बागेतही हमखास दिसणारी वनस्पती एक विषारी झुडूप आहे. याच्या फुलांना सुगंध असतो. वात विकारावरील महाविषारी तेलात हिचा वापर केला जातो.

१८ मारवा - ही सुवासिक वनस्पती असून विविध प्रकारच्या जखमा, भाजणे, किंवा कोणत्याही कारणांमुळे त्वचेवर आलेल्या डागांसाठी ही वनस्पती उपयुक्त ठरते. नवीन संशोधनात तर मारव्यापासून कर्करोगावर औषध तयार करण्यास यश आले आहे. ही वनस्पती घरात कुंडीतदेखील लावता येते.

१९  रूई - रुई या वनस्पतीला 'मांदार' म्हणूनही ओळखतात. ओसाड जागेत ही वनस्पती मोठया प्रमाणात दिसते. हिला पांढर्‍या, जांभळया रंगाची फुले येतात. हत्तीरोगावर हे फार उत्तम औषध आहे. तसेच कुष्ठरोगावर देखील त्याचे औषध प्रभावी ठरते. पांढरी रूई गणेशाला अधिक प्रिय असते.

२०  अर्जुन - हाडे जोडणारी वनस्पती म्हणून आदिवासी पट्टयात हिला ओळखतात. या वृक्षाचा उल्लेख रामायणात देखील आढळतो. हृदयरोगावर ही वनस्पती उपयोगी ठरते. या वनस्पतीत कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते. 

२१  जाई - या वनस्पतीला जास्मीन देखील म्हणतात. ही वनस्पती शहरात मोठया प्रमाणात दिसते. तोंड आल्यावर जाईची पाने खातात, तसेच जुन्या जखमांवर जाईचा पाला लावला जातो. 

ही वेल सुगंधी फुलांची आहे.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF