गणपती विशेष मुख्यपान

गणपतीला मोदक प्रिय का?

गणपतीला देवांनी अथक परिश्रम करून अमृताचा मोदक तयार केला. तो घेऊन ते शंकराकडे आले. पार्वतीच्या हातात मोदक देऊन परत गेले.'स्कंद'व'गणेश'मोदक मिळावा म्हणून पार्वतीजवळ येऊन बसले.

पार्वती म्हणाली,'हा महाबुध्दी मोदक आहे. याचा वास घेतला तरी अमरत्व प्राप्त होतं. जो हा मोदक खाईल, तो सर्व शास्त्रांत प्रवीण होईल व शस्त्रास्त्रविद्येतही निपुण होईल. हे ऐकल्यावर स्क.द व गणेश हे दोघेही 'मला मोदक हवा', असा हट्ट करू लागले. तेव्हा पार्वतीने एक युक्ती शोधली. ती आपल्या पुत्रांना म्हणाली, 'तुम्ही दोघंही पृथ्वीप्रदक्षिणेला जा. जो आधी करून येईल, त्याला मी मोदक देईन.'स्कंद लगेच पृथ्वीप्रदक्षिणेला निघाला; परंतू गणपती मात्र तिथेच थांबला. त्यानं एका शिलाखंडावर शंकर-पार्वतींना बसवीलं. त्या दोघांची यथासांग पूजा केली. त्या दोघांनाच एक पूर्ण प्रदक्षिणा घातली व तो शंकर-पार्वतीपुढे नतमस्तक होऊन उभा राहिला. मधुर वाणीनं म्हणाला, 'आई-वडीलांना प्रदक्षिणा म्हणजे पृथ्वीप्रदक्षिणा. सर्व तीर्थात केलेलं स्नान, सर्व देवांना केलेला नमस्कार. सर्व यज्ञयागादी व्रतं व साधना यांचं पुण्य आई-वडिलांच्या पूजेच्या सोळाव्या भागांएवढंही होऊ शकत नाही.'

शंकर-पार्वतीला गणपतीच्या कुशाग्र बुध्दीचं कौतुक वाटलं. पार्वतीनं गणपतीला आनंदानं तो दिव्य मोदक दिला. लहानपणी गजाननानं दाखवलेली हुषारी, ते बुध्दीची देवता होणार आहेत हे दाखवून गेली.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF