गणपती विशेष मुख्यपान
 

गणपतीचे अध्यात्मिक महत्त्व

वक्रतुंड महाकाय
सूर्यकोटी समप्रभ |
निर्विघ्नं कुरुमे देव
सर्वकार्येषु सर्वदा ||

भाद्रपद शुध्द चतुर्थीला महासिध्दी विनायकी असे म्हणतात. त्यादिवशी 'गणपती बाप्पा मोरया' हा आवाज सर्वत्र ऐकायला मिळतो. 'मोरया' म्हणजे नमस्कार. त्या दृष्टीने पाहता, 'गणपती बाप्पा मोरया' चा अर्थ गणपती बाप्पाला नमस्कार असा होतो.

प्रत्येक शुभकार्यात सर्वप्रथम श्रीगणेशाचे पुजन केले जाते. गणेशाची मूर्ती नसेल तर सुपारीचा गणपती बनवायचा, पण अग्रपूजन हे गणपतीचेच झाले पाहीजे. पौराणिक कथा आहे की, अजाणता गणपतीचे शिर कापून टाकल्यानंतर पार्वतीला संतुष्ट करण्यासाठी शंकराने आपल्या पार्षदाला जो कोणी प्राणी प्रथम दिसेल त्याचे शिर आणण्यास सांगितले. पार्षदाला सर्वप्रथम हत्ती दिसतो व पार्षद हत्तीचे मस्तक घेऊन येतो. गणपतीच्या धडावर ते मस्तक ठेऊन गणपती बाप्पाला जिवंत केले जाते व आपला सर्वांचा लाडका गणपती बाप्पा गजानन, गणेश, गणराज अशा विविध नावाने ओळखला जाऊ लागतो.

गणपती बाप्पाला हत्तीचे मस्तक लावण्यात एक वैशिष्टय आहे. हत्ती हा सर्व प्राण्यांमध्ये सर्वांहून अधिक बुध्दीमान प्राणी आहे. गण-पती म्हणजे समुहाचा नेता होय. ह्याप्रमाणे नेता व तत्ववेत्ता ह्यांच्या जीवनात बुध्दीची तेजस्विता व समाजाला योग्य मार्गाने नेण्याची अभिलाषा असणे गरजेचे असते.

गणपतीचे हत्तीसारखे बारीक डोळे मानवी जीवनात सूक्ष्म दृष्टी ठेवण्याची प्रेरणा देतात. बारीक सुई देखिल जमिनीवरुन उचलण्याएवढी सूक्ष्म दृष्टी हत्तीची असते. मानवानेही स्वत:ची दृष्टी सूक्ष्म ठेवली पाहिजे आणि जीवनात नकळत घुसणाऱ्या दोषांना अडवले पाहिजे. हत्तीचे लांब नाक (सोंड) दूरपर्यंत हुंगायला समर्थ असते. नेता व तत्ववेत्ता यांच्यामध्ये दूरदर्शीपणा असला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा गंध त्याला प्रथम आला पाहिजे, याचे ही सोंड सूचक आहे. गणपतीला दोन सुळे असतात. एक पूर्ण व दुसरा अर्धा असतो. पूर्ण सुळा श्रध्देचा व अर्धा सुळा बुध्दीचा प्रतिक आहे. गणपती बाप्पाला चार हात असतात. एका हातात अंकुश, दुसऱ्या हातात पाश, तिसऱ्या हातात मोदक व चौथ्या हाताने गणपती बाप्पा आपणास आशीर्वाद देतात.गणपती बाप्पाला लंबोदर असे सुध्दा म्हणतात. सर्वांच्या ऐकलेल्या गोष्टी स्वत:च्या विशाल उदरात साठवून ठेवल्या पाहिजेत ह्याची सूचना त्याचे मोठे पोट देते. गणपतीचे पाय लहान असतात त्यामुळे तो लवकर धावू शकत नाही. म्हणजेच कोणतेही काम करताना उतावीळ होऊ नये. जसा ससा व कासव यांच्या शर्यतीत कासव जिंकतो तसे हळूहळू पुढे जाणाऱ्याचे कार्य सुदृढ व सफल बनत जाते. गणपतीचे वाहन उंदीर आहे. गणपतीचे वाहन इतके लहान असण्याचे कारण म्हणजे उंदीर हा त्याला घराघरात घेऊन जातो. महापुरुषाची साधने अशी लहान व नम्र असली पाहिजेत. जेणेकरुन ते घराघरात प्रवेश प्राप्त करु शकतील व सर्वांसाठी प्रिय बनू शकतील. गणपतीचे वाहन उंदीर हे मायेचेही प्रतिक आहे. उंदराप्रमाणे मायादेखिल मानवाला फुंकर मारुन चावत असते. फुंकून फुंकून चावणाऱ्या या मायेला फक्त ज्ञानी तत्वज्ञानीच अंकुशामध्ये ठेऊ शकतो, तिच्यावर स्वार होऊ शकतो. गणपतीचे वाहन उंदीर आपल्याला फार सूचक गोष्टी समजावते.

गणपतीला दुर्वा फार आवडतात. लोकांच्या दृष्टीने ज्याला काही महत्त्व नाही, असे गवत त्याने आपले मानले व त्याचे मूल्य वाढविले. नेता आणि तत्त्ववेत्ता ज्यांना काही महत्त्व नाही, ज्यांना कोणी विचारत नाही, अशांना आश्रय देतात. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करुन जीवंत जीवन जगण्याची प्रेरणा देतात. दुसरे, दूर्वांना काही रंग नाही, सुगंध नाही. रंगविरहीत, सुगंधविरहीत; ज्याची जगाच्या दृष्टिने काही किंमत नाही असे कर्मदेखिल प्रभुचरणावर प्रेमाने वाहिले तरी त्याला आवडते.

गणपती बाप्पाला लाल रंगाचे फूल अधिक प्रिय आहे. लाल रंग हा क्रांतीचा सूचक आहे. शिवाय गणरायाला आपण तांदूळ वाहतो. तांदुळाला संस्कृतमध्ये 'अक्षता' म्हणतात. अक्षत म्हणजे जो तुटलेला नाही असा; जो खंडीत नाही तर अखंड आहे. देवाबद्दलच्या आपल्या अखंड भक्तीचे दर्शन अक्षता वाहण्यात आहे.

गणपतीला 'वक्रतुंड' म्हणतात. ऋध्दिसिध्दीपासून मुख फिरवून राहणाऱ्यालाच ऋध्दिसिध्दी मिळतात. वाकडे तिकडे चालणाऱ्याला, आडव्या रस्त्याला जाणाऱ्याला जो दंड देतो तो वक्रतुंड.

आध्यात्मिक दृष्टीने पाहिले तर आपल्या इंद्रियाचा एक गण आहे. आणि या गणाचा पती मन आहे. कोणतेही कार्य सिध्दीस न्यायचे असेल तर आपला हा गणपती ठिकाणावर असला पाहिजे. म्हणून गणपतीला प्रथम पूजण्याचा अर्थ असा की, मनाला कार्याच्या प्रारंभापूर्वी शांत व स्थिर करायचे; ज्याच्यामुळे काही विघ्ने येऊ नये व कार्य सरळपणे पार पडावे.

गणेश-चतुर्थीच्या दिवशी आणलेल्या गणपतीचे विसर्जन आपण अनंत चतुर्दशी-दिवशी करतो. जे सान्त आहे त्याला अनंतात, साकाराला निराकारात व सगुणाला निर्गुणात विलीन करतो.

 

अकार चरण युगल । उकार उदर विशाल ।

मकार महामंडल । मस्तकाकरें ॥

'अ' कार म्हणजे गणपतीने घातलेले पद्मासन, 'उ'कार म्हणजे विशाल पोट आणि 'म'कार म्हणजे त्याचे मस्तक. अशी रसमय कल्पना ज्ञानेश्वर माऊलीने केलेली आहे. ध्येयमूर्ती, ज्ञानमूर्ती व मंगलमूर्ती गणेश, नेता व तत्त्ववेत्ता ह्यांचे आदर्श स्वरुप आहे.
- अर्चना जोगळे

'गण' म्हणजे अष्टवसूंचा समूह. 'वसु' म्हणजे दिशा, दिकपाल, दिक् देव म्हणून दिशांचा स्वामी आणि 'पती' तो गणपती. इतर देवता त्याच्या परवानगीशिवाय कोणत्याही दिशेने येऊ शकत नाहीत. म्हणून कोणतेही मंगल कार्य किंवा इतर कोणत्याही देवतेची पूजा करतांना प्रथम गणपतीपूजन करतात. गणपतीने एकदा दिशा मोकळया केल्या की, ज्या देवतेची आपण पूजा करीत असतो, ती तिथे येऊ शकते. यालाच 'महाद्वारपूजन' किंवा 'महागणपतीपूजन' असे म्हणतात.याशिवाय 'गण ' म्हणजे पवित्रके,जी अतिशय सूक्ष्मातिसूक्ष्म असतात म्हणून गणपती म्हणजे पवित्रकांचा स्वामी.

जीवसृष्टीवर विघातक परिणाम करणाया 'तिर्यक'व 'विस्फुटीत लहरींचा समूह' म्हणजे 'गण',त्याच्यावर नियंत्रण ठेवणारा तो गणपती. ह्या 360 वेगवेगळया लहरी अष्टदिशांमधून अव्याहतणे प्रवास करीत असतात. अशां या गणपतीची आराधना करतांना पूजा, उपवास व अर्थवशीर्षाची आर्वतले करतात. त्यापैकी पूजा ही षोडशोपचार करून प्राणप्रतिष्ठा करतात. धूप, दीप, नैवेद्य, आरती करून मूर्तीत प्राण जागृत करतात.

पूजा करतांना लाल वस्त्र, तांबडे फूल व रक्तचंदन वापरतात. लाल रंगामुळे वातावरणातील गणपतीची पवित्रके मूर्तीक़डे जास्त प्रमाणात आकृष्ट होतात व मूर्ती जागृत व्हावयास मदत होते. गणपतीला दुर्वा आवडतात. म्हणजे गणपती दुर्वांनी आच्छादल्यामुळे मूर्तीच्या बाजूने दुर्वामचा वास निघायला लागतो. हा गंध गणपतीच्या आकारात संप्रषित होतो म्हणून गणपतीच्या पवित्रकांच्या आकाराला या आकाराकडे येणे सोपे जाते यालाच मूर्ती जागृत झाली असे म्हणतात. याशिवाय शमीमध्ये 'अग्नीचावास' आहे व मंदार हे 'एक वानस्पत्य रसायन'आहे म्हणून गणपतीला प्रिय आहे.उपास किंवा उपवास हे व्रत असून या व्रताची देवता 'श्री सिध्दीविनायक' आहे. सर्व चांगले व्हावे ह्याकरिता 'विनायकी' करतात. 'संकष्टी' ह्या व्रताची देवता 'श्री विघ्नविनायक' आहे. विघ्न म्हणजे संकट, पृथ्वीपासून येणाऱ्या 360 लहरींनी आपण वेढले जातो. त्यामुळे शरीरातील प्रवाह बंदिस्त होतात व यालाच 'संकट' म्हणतात. कृष्ण पक्षात 360 लहरी जास्त प्रमाणात कार्यरत असतात. त्यामुळे शरीराच्या नाडयांतील प्रवाह बंदिस्त होतात.

'अथर्वशीर्ष'- 'थर्व' म्हणजे गरम, 'अथर्व' म्हणजे शांती व 'शीर्ष' म्हणजे मस्तक. 'ज्याच्या पुर0चरणाने मस्तकास शांती प्राप्त होते ते अर्थवशीर्ष होय'. यानंतर नैवेद्य, या नैवेद्यात परिपूर्ण आहारात मोदकाचा समावेश असतो. मोदक हे ज्ञानाचे प्रतीक आहे म्हणून त्याला 'ज्ञानमोदक' असेही म्हणतात. ज्ञान प्रथम थोडे आहे असे वाटते. (मोदकाचे टोक हे त्याचे प्रतीक आहे.) पण अभ्यास करू लागल्यावर समजते की ज्ञान हे फारच मोठे आहे. मोदक गोड असतो, ज्ञानाचा आनंदही तसाच असतो. पूजा करणारा गणेश लहरींनी सपृक्त व्हावा, हा पूजेचा उद्देश असतो. ही संपृक्तता वाढविण्यातला शेवटचा टप्पा म्हणजे 'उत्तरपूजा'. उत्तरपूजेच्यावेळी मूर्तीत असलेली सर्व पवित्रके एकदम बाहेर पडतात व पूजा करणाऱ्याला त्याचा लाभ होतो. गणपती हा बुध्दीदाता आहे म्हणून प्रथम 'श्री गणेशायनम:' असे लिहितात. ज्ञान ग्रहण केले तर ते शब्दबध्द करण्याचे काम सरस्वतीचे आहे. गणपती ही एकमेव देवता 'शब्दभाषा' म्हणजेच 'नादभाषा' जाणणारी देवता आहे. आपण बोलतो ती नादभाषा गणपती समजू शकतो म्हणूनच तो लवकर प्रसन्न होणारा देव आहे. इतर देव बहुतांशी प्रकाशभाषा समजू शकतात. गणपती ही नादाचे प्रकाशात व प्रकाशाचे नादात रूपांतर करणारी देवता आहे. 'गणेशविद्या' म्हणजे ध्वनीवर आधारीत लेखशास्त्र. 'गं' हा बीजमंत्र नीट लिहिण्याच्या संदर्भात हा शब्द या अर्थाने गणपती अर्थवशीर्ष या स्तोत्रात वापरलेला आहे. अशी ही गणपती देवता व तिचे पूजन भक्तिभावाने केल्यास तसेच दररोज गणेशाला नमन केल्यास प्रत्येकाला त्याचा जरूर अध्यात्मिक फायदा होतो.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF