साहित्यिक मुख्यपान

 

 

विजय भटकर

vijay-bhatkarपरदेशात नोकरी न करता स्वदेशासाठी स्वदेशातच काम करायचे या हेतूने भारतातच थांबलेले शास्त्रज्ञ विजय भटकर ह्यांना भारत महासंगणकाचा निर्माता म्हणून ओळखतो. त्यांच्या उतुंग कारर्कीदीचा आढावा घेणारा हा लेख.

विजय भटकर हे मूळचे अकोला जिल्ह्यातील, मूर्तिजापूर तालुक्यातील, मुरंबा या अडीचशे-तीनशे लोकवस्तीच्या गावाचे. जन्म ११ ऑक्टोबर १९४६. त्यांचे मूळ घर जनावरांचा गोठा आणि पडक्या भिंती असलेल्या जुनाट वाड्यात. त्यांनी आपले इलेक्ट्रिकल इंजिनीयरींगचे आणि पीएच.डीपर्यंतचे शिक्षण मुरंबा, करजागाव, मूर्तिजापूर, अमरावती, नागपूर, वडोदरा आणि दिल्ली अशा अनेक ठिकाणी राहून पूर्ण केले.

अमेरिकेने संगणकविक्रीसाठी घातलेल्या अटी नाकारून भारताने डॉ.भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली महासंगणक बनवण्याचे ठरवले. हवामानाच्या अंदाजातील अचूकता वाढवण्यासाठी महासंगणक ही भारताची मोठी गरज होती. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने भरारी घ्यायची स्वप्ने पाहणारे पंतप्रधान राजीव गांधीनी सी-डॅक या संस्थेची स्थापना पुणे विद्यापीठात २ जून १९८८ रोजी केली. श्री. भटकर तेव्हा 'इलेक्ट्रॉनिक रिसर्च व डेव्हलपमेंट सेंटर'चे संचालक म्हणून त्रिवेंद्रमला काम करीत होते. ते महासंगणक बनवण्यासाठी पुण्यातील एनआयसीत आले. तोवर त्यांना महासंगणकाचा कोणताही अनुभव नव्हता. असे असून, डॉ.विजय भटकरांनी परम-८०० हा महासंगणक, अमेरिकेने देऊ केलेल्या किंमतीच्या निम्म्या किंमतीत आणि निम्म्या वेळेत करून दाखवला. त्याची दखल ‘वॉल स्ट्रीट जर्नलने’ घेतली.

डॉ. विजय भटकर यांची तंत्रज्ञानावरची आतापर्यंत १२ पुस्तके व ८० निबंध प्रसिद्ध असून हे साहित्य युरोप, अमेरिका व भारतातल्या अनेक विद्यापीठांमध्ये अधिकृत म्हणून वापरले जाते. राष्ट्रीय पातळीवरील अनेक संस्थांची रचना त्यांनी केली आहे. उदा. C-DAC, ER & DC त्रिवेंद्रम येथील R&D सेंटर, पुणेयेथील I2IT, IIMV इ. डॉ. विजय भटकर यांच्या निरनिराळ्या शोध, उपक्रम व आयटी क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना जागतिक इलेक्ट्रॉनिक्स व संगणक क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ समजल्या जाणा-या संस्था IEEEACM यांनी 'फेलो' या अत्युच्च पदवीने पुरस्कृत केले आहे. डॉ. विजय भटकर यांच्या कर्तुत्वाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना सर्वोच्च नागरी महाराष्ट्र भूषण तर केंद्र शासनाने पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केले आहे.

एक आदर्श वैज्ञानिक, तत्वाज्ञ, शिक्षणतज्ञ, समाज प्रबोधक म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉ. विजय भटकर यांच्या व्यक्तिमत्वाला विनम्रतेची अनोखी जोड आहे. त्यामुळेच त्यांच्या संपर्कात येणारे अनेक लोक देशकार्यासाठी प्रेरित होऊन आपापल्या क्षेत्रात उत्तुंग शिखरं गाठत आहेत.

- अजिंक्य तर्टे

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा