साहित्यिक मुख्यपान

 

डॉ. शरदिनी डहाणूकर


रूग्णांवरील उपचारपध्दतीत आधुनिक औषध विज्ञाना इतकीच परंपरागत आयुर्वेद चिकित्सा व औषधे प्रभावी ठरू शकतात, या वास्तवाचा संशोधनपर वेध घेत वैद्यक क्षेत्राला नवी दिशा देणा-या नायर पालिका इस्पितळाच्या डॉ. शरदिनी डहाणूकर ह्या लोकप्रिय अधिष्ठात्री होत्या.

आपल्या संशोधनपर वृत्तीने आणि माणुसकीचा वसा जपलेल्या प्रेमळ स्वभावाने भारतीय वैद्यक व अन्य अनेक क्षेत्रात नाव कमावलेल्या डॉ. शरदिनींचा जन्म १७ ऑक्टोबर १९४५ रोजी मुंबईत झाला. गोव्यातील पणजी येथील बेतीम वेरे या गावच्या पै धुंगट या कुटुंबात जन्मलेल्या डॉ. डहाणूकर यांचे वडील भिकू पै धुंगट उद्योगानिमित्त मुंबईत आले आणि येथेच स्थायिक झाले. बुध्दीने कुशाग्र आणि चिकित्सक असलेल्या डॉक्टर ही पदवी संपादित केल्यानंतर फार्माकॉलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

सुमारे २५ वर्षांपूवी अमेरिकावारीत एका परदेशस्थाने आयुर्वेदाबद्दल उत्कंठापूर्वक काही प्रश्न विचारले आणि त्यांची उत्तरे देतांना डॉ. शरदिनी डहाणूकर यांच्या मनात आयुर्वेदाबद्दल अधिक संशोधन करण्याची ओढ जागृत झाली. तेव्हापासून १० वर्षे त्यांनी अथक संशोधन केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच के. ई. एम. मध्ये आयुर्वेदाला ऍलोपथीच्या जोडीने रोगनिदान व उपचारात स्थान मिळाले.अध्यापन आणि संशोधन ही दोन उद्दिष्टे समोर असलेल्या डॉ. डहाणूकर यांच्या सलग बारा वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे के. ई. एम. मध्ये भारतातील पहिले आयुर्वेद संशोधन केंद्र १९८९ साली स्थापन झाले. या विभागाचे प्रमुखपद त्यांच्याकडे सोपविण्यात आले. गुळवेल, कडुनिंब बस्ती यांच्यावरील कामाचे पेटंट त्यांच्या नावावर असून या संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. नायर इस्पितळाच्या अधिष्ठात्री झाल्यानंतर त्यांनी तेथेही आयुर्वेद विभाग सुरू केला.

उद्योगपती अरूण डहाणूकर यांच्याशी विवाहबध्द झालेल्या डॉ. डहाणूकर ह्यांचे वैद्यक क्षेत्रांतील अनोख्या कामगिरीसह, निसर्गाच्या विविध आविष्कारांवर बेतलेले ललित लेखनही अत्यंत मनोवेधक ठरले. 'लोकसत्ता'मध्ये विविध विषयांवर सदर लेखन करणा-या डॉ. डहाणूकर यांचे वृक्षगान, मनस्विनीचे मणी, फुलवा, सगे सांगाती, हिरवाई, पांचाळीची थाळी असे ललित साहित्य प्रकाशित झाले. गोमंतकन्या असलेल्या डॉ. डहाणूकर यांच्या या आगळया लेखनाचा गोवा कला अकादमी, गोमंत विद्यानिकेतन, मडगांव या संस्थांनी गौरव केला. ललित लेखनाला मिळालेला वाचकांचा तसेच मान्यवरांचा हा प्रतिसाद पाहून अधिक मोठया प्रमाणात ललित लेखनाला वाहून घेण्याचे त्यांचे स्वप्न मात्र अधूरे राहिले.

साहित्य आणि वैद्यक आशा दोन क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटविणारे व्यक्तिमत्व फारच लौकर काळाच्या पडद्याआड गेले.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा