संत तुकाविप्र

॥ सिंहस्थ महापर्वणी ॥

सिंहस्थ महापर्वणी
एक दार्शनिक विश्लेषण
एक दार्शनिक विश्लेषण
सिंहस्थ महापर्वणी एक दार्शनिक विश्लेषण
कुशावर्त सम तीर्थ नास्ति ब्रम्हांड गोलके
त्र्यंबकश्वर हे क्षेत्र आहे.
ते पांडवांचे धर्मक्षेत्र आहे. कौरवांचे कुरूक्षेत्र आहे.
येथे पापपुण्यांचे युध्द चालते. पराभूत झालेली पापे याच क्षेत्रात आपला देह ठेवतात.
हे क्षेत्र आहे .शेत आहे. स्वर्गमोक्षांचे मळे पिकविणारे शेत हेच आहे. सत्कर्माला साधनेची वाफ लागून येथेच पुण्याची रोपे फुलतात.
संत येथेच पुण्याची लावणी व आवणी करतात.
अधार्मिक येथेच दंभाचे खत वापरून पापांचे हायब्रीड पीक काढतात. शुगर कोटींग पापांचे बेचव पीक जाळणारी तपोभूमीही त्र्यंबकच आहे. या भूमीचा प्रभाव अद्भुत आहे. येथील जमिनीच्या कणांकणांत पुण्याचे बीज खेळते. या पुण्यविद्युतला मीटर नाही. हिला शार्टसर्किट नाही. चोरी नाही.
ही वीज या क्षेत्राच्या अणूरेणूत खेळते. कणांकणांत झिम्माफुगडयांचा नाच करते.
ही वीज मनाच्या सिलिंगमध्ये असते. वृष्टि विजेची बहीण आहे.
या दोघी धर्ममेघाच्या मुली आहेत.
ही पुण्यभूमी आहे धर्मभूमी आहे, तपोभूमी आहे.

सलिलस्य अभ्दुतात प्रभावान

गंगा ब्रह्मद्रव आहे, धर्मद्रव आहे, येथील पाणी तीर्थरूप आहे. गंगा ब्रह्मदेवाच्या कमंडलूतले धर्मसंपादक आद्य जल आहे. या कमंडलूजलाने ब्रह्मदेवाने आचमन केले, तेच जल भगवान् शंकराच्या जटेत आहे. तेच गंगाजल जाह्नवी झाले. पुढे तीच जलधारा विष्णुंच्या चरणारविंदातले तीर्थ बनली. कारूण्याने झालेले हे गंगेचे भूमीवरील अवतरण अद्भुत आहे. शंकराच्या हृदयातील ही करूणातरंगिणी कृतयुगात गोदेच्या रूपाने व त्रेतायुगात गंगेच्या रूपाने अवतरली. शंकरांच्या उत्तमांगावरून ही निघाली व खाली येवून तिने वसुंधरेला सर्वांग आलिंगन दिले. पापांचा पाया खणणारे हे पाणी पुण्यकृपण नाही. याचा प्रभाव अद्भुत आहे- पवित्रसलिला, पुण्यतरला, सर्वमंगला अशी ही गंगा धर्मतरंगिणी आहे. हिच्या आचमनात ब्रह्मांडाचे आपोशन घेण्याची शक्ती दडली आहे. त्रैलोक्याच्या चित्राहुती व महापातकांच्या पंचप्राणाहुती घेवूनच हिचा भोजन यज्ञ पूर्ण होतो. मनाने यति व वृत्तीने ययाति बनून जेव्हां आमची परमार्थाची पुण्ययात्रा सुरू होते, तेव्हां गंगेचे जलबिंदु आमच्या पंचकोषांना पावन करतात. ही गंगा तुकारामांच्या अभंगात शिरली व इंद्रायणीने गंगेला घाबरून तुकारामांचे अभंग परत केले. संत तुकारामांचे अभंग गंगेचे तरंग आहेत. वेदार्थ गाणाऱ्या तुकोबांचे अभंगात ज्ञानेश्वरांच्या हृदयातल्या प्रणवध्वनींचा अनाहत नाद ऐकू येतो. वेदगंगेच्या काठावर व नादगंगेच्या घाटावर संतसाहित्याचा वसंत फुलला अशी ही ज्ञानगंगेची बहीण मूळगंगा आहे.

गंगेचे अद्भूत तेज ! गंगेच्या प्रवाहाचे ज्योतिर्मय स्वरूप !

ज्योतिर्लिंगाच्या जटेतून निघालेली ज्योतिष्मती जलधारा गंगा आहे. सूर्य, चंद्र व अग्नी यांनीच आपले पापदायक व ज्ञानप्रकाशक तेज गंगेत सोडले.
। तीर्थे बाह्य मळ क्षाळे । सत्कर्मे अभ्यंतर उजळे ॥
सत्कर्मे हीच तीर्थे आहेत. सत्कर्मे व सध्धर्माने अंतर्मल प्रक्षालन होते. शुचिता येते. गंगेच्या तीरावरील तपाने तेज वाढते. तप्तकांचनासारखी काया होते. गायत्रीपुरश्चरणानेही तेज वाढते. अघमर्षणही शुध्दतेचेच अंग आहे.

गंगा संतांना पसंत आहे !

संत जेथे जातात तेथे तप करतात. ती जागा तीर्थ होते. तारतात ती तीर्थे, तरून जातात ते संत !! चंदनाप्रमाणे झिजणे हे तप आहे संत तुलसीदासांच्या तपश्चंदनाने रघुवीरांनी कपाळी तिलक लावला. तपश्चंदनाचा तिलक कपाळी असला तर ललाटरेषा बदलता येते. गौतमांनी तपश्चंदनाने ललाटी लिहिलेले गोहत्येचे पातक धुतले. गौतमांच्या अघमर्षणाने कुशावर्त तीर्थ झाले. कुशावर्ताच्या एकेका जलबिंदूत अनन्त पुण्यसिंधू आहेत. गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी या सप्तसरिता कुशावर्तात आपले अघमर्षण करतात.

वरील विवेचनाचा सूत्रधारक श्लोक –
॥ प्रभावादभ्दुताभ्दूमे:सलिलस्य च तेजस: ॥
॥ परिग्रहान्मुनीनां च तीर्थानां तीर्थता मता ॥

तीर्थे, पर्वे, पर्वण्या व स्नाने हे पावित्र्याचे चौक आहेत. नद्या विराट पुरूषाच्या आहेत. या नाडयातून पुण्याचे पाणी वाहाते त्या पाण्यात फुललेली कमळे तीर्थे आहेत. त्या सर्व तीर्थांची सम्राज्ञी गोदावरी ज्या ब्रह्मगिरीतून प्रकट झाली, त्या ब्रह्मगिरीच्या सावलीत विसावलेले क्षेत्र त्र्यंबकेश्वर आहे. कृतयुग म्हणजे सत्ययुग, जेथे सत्याचीच सत्ता राज्य करते, त्या सत्ययुगात झालेले मूळगंगेचे प्रथमावतरण जेथे झाले ते तीर्थराज कुशावर्त !

॥ षट्कोणंतीर्थराजकम् ॥

मनातल्या षड्रिपूंचे प्रक्षालन करणारा ही तीर्थसम्राट विश्वाचे पाप धूत आहे. याचे पाणी ब्रह्मद्रव आहे. या ब्रह्मद्रवाच्या बिन्दू-बिन्दूत गंगा, यमुना, सरस्वती या त्रिवेणींच्या गुप्त प्रवाहाच्या धारा आहेत. सिंहस्थात या प्रवाहांच्या धारेत सर्व नद्यांचा पुण्य विद्युत प्रवाह खेळतो. या विजेच्या शॉकट्रीटमेंटने शेकडो पापे जळून जातात ही पुण्यविद्युत पकडण्याचा पवित्र पर्वकाल म्हणजे ‘सिंहस्थ पर्वकाल !! सिंहासनावर सिंहराशीत बृहस्पती असतात. बृहस्पती देवगुरू, देवांचे पुरोहित, ज्ञानशक्तीने त्रैलोक्याचे हित करणारे हे त्रैलोक्याचे उपाध्याय !! या ज्ञानसिंहाचे स्वागत करण्यासाठी सर्व विश्व येथे धावत येते. सूर्यचंद्रही छत्रचामरे धरून या ज्ञानगंगेच्या स्नानाचे कौतुक करतात. चंद्र, सूर्यात एकरूप होतो ती आमावस्या मनश्चंद्राचे आत्मसूर्यात हरवून जाणे म्हणजे मोक्ष जीवशिवांचे अद्वैताची जाणीव करून देणारी अमावस्या ही मुख्य पर्वणी !! ज्ञानतीर्थावरचे उपाध्याय देवगुरू बृहस्पती सर्व देवांसह, देवतांसह पुण्याच्या राशी उधळीत या पर्वकाळात त्र्यंबकेश्वरी हजर असतात. विश्वाचा आत्मा विश्वचक्षू सूर्य, विराटि्वश्वाची ज्ञानदेवता बृहस्पती यांचे एका राशीत येणे म्हणजे सूर्यचंद्रांचे देवगुरूंच्या राशीतले उपनयनच आहे. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे व मनाचा स्वामी चंद्र आहे. हे दोघे देवगुरूंसह सिंहराशीत येतात. सिंह व सूर्य यांना राशीवांचून विश्वावर राज्य करता येते. राशी म्हणजे, ढीग, कळप, टोळी. कळप मेंढयांचे, सिंहांचे पर्वणी, म्हणून स्वागत होते. रवि-चंद्र गुरूंचे मित्र. ज्ञानगुरू बृहस्पतीचे स्वामी सूर्य, व सूर्याचा प्रकाशशिष्य चंद्र हे सिंह राशीला सिंहाचे बल देतात. असे हे बलवान सूर्यचंद्रगुरू स्नानासाठी मूळगंगेच्या धारेवर येतात. येथेच या पुण्य धाराधारांची धार जेथे पडते ते कुशावर्त तीर्थ !! महर्षी न्यायदर्शनकार गौतमांची गोहत्या जेथे पूर्णविराम पावली ते हे कुशावर्त तीर्थ !!

निवृत्तीनाथांनी ज्या गंगासागरात समाधी घेतली त्या निवृत्तीनाथांना येथील ब्रह्मगिरीच्या गहनगुफेत गहिनीनाथांचे दर्शन झाले व गहिनीनाथ, निवृत्तीनाथ व ज्ञाननाथांच्या त्रिपथगेत महाराष्ट्राने स्नान केले. या कर्म- भक्ति – ज्ञानाच्या आकाशगंगेत स्नान करून संतसाहित्य सुखावले. ताजे टवटवीत झाले. अशा ह्या नाथत्रयीला पावन करणारे त्रिसंध्या क्षेत्र त्र्यंबकेश्वर आहे. नवनाथांनी नवयोगेश्वरांनी याच त्रिसंध्याक्षेत्रात योगसाधना करून समाधिसुख अनुभवले.

भागीरथी व गोदावरी तत्वतः एकच!
॥माहेश्वर जटास्था या आपो दैव्यो महामते॥
॥तासांतु द्विविधो भेदः आहर्तुः पदकारणात्॥

धूर्जटीच्या जटाजूटांतून दोन जलप्रवाह भूतलावर आले.
महर्षि गौतमांनी कृतयुगांत एक प्रवाह भूतलावर आणला व राजर्षि भगीरथांनी दुसरा प्रवाह त्रेतायुगात भूतलावर आणला.
ब्रह्मवर्चसाचा आल्हादक चंद्र गौतम !
कृतयुगांत त्या तपाचे चांदणेविश्वात पडले होते.
क्षात्रधर्माचा विश्वपालक मेघ, भगीरथ ! कपिल. तापदग्ध सगरांच्या उध्दारार्थ भगीरथांनी तप केले व जान्हवीचा प्रवाह भूतलावर आला. ब्राह्मतपाचा शांत व संथ शीतल प्रवाह गौतम !
क्षात्रतेजाचे धर्मरक्षक कवच भगीरथ !!
विश्वोध्दारासाठी ब्राह्मतेज व क्षात्रतेज एकवटले.
निष्पाप तप:प्रधान सत्ययुगाने आम्हाला भागीरथी दिली.
वडील बहीण वृध्दगोदा ब्रह्मगिरीतून प्रकटली. धाकटी बहीण भागीरथी हिमालयातून उतरली. मूळ प्रवाह एक परंतु तो प्रवाह खाली आणणारे दोघे !! गौतम ! व भगीरथ !!
ब्रह्मद्रवरूपा गोदावरी धर्मद्रवरूपा भागीरथी. पापतापतप्त विश्व बघून धर्म द्रवला ब्रह्मही द्रवले आणि त्यांच्या द्रवीभूत हृदयाने गंगेचा वेष घेतला.

गोदा मोठी की गंगा !

याचे उत्तर भगवान शिवच देतील !!
दोघीही शंकराच्या मस्तकावरच्या !!
दोघीही पतीतोध्दारासाठी खाली उतरल्या !!
एक वयाने मोठी म्हणून ती वृध्दगोदा.

ही गोदा शंकराच्या जटेतून निघाली व दत्तावृक्ष औदुंबराच्या मुळात शिरली व गोमुखातून बाहेर पडली. औदुंबर, वड व पिंपळ हे ब्राह्मण वृक्ष आहेत व गाय वेदमाता आहे आणि गंगा विश्वमाता आहे. निष्पाप कृतयुगात पतित कुणीच नाही तेव्हां विश्वोध्दारासाठी गोदेने, त्रेतायुगांत गंगेचा वेष घेतले !

कुंभ राशीला गुरू असला की गोदावरी गंगेला भेटण्यासाठी प्रयागला जाते. सिंहेला गुरू आला की भागीरथी गोदावरीला भेटण्यासाठी कुशावर्तात येते. सर्व तीर्थे, सर्व सरिता सर्व देवता सिंहस्थत गोदास्नान करून भगवान.
त्र्यंबकराजांची पूजा करतात प्रेयसी पार्वतीला फसवून श्रेयसी गंगा मस्तकावर घेतली तीच शिवांनी विश्वोध्दारासाठी जगाला दिली. ही गंगा नव्हे हा आशुतोष शिवाचा हृदयद्रव आहे. गोदावरी ब्रह्मगिरीतूनच निघाली. गायत्री गोमाता व गीता ही गंगेचीच रूपे आहेत- वृध्दगोदेची धाकटी बहीण गंगा. निवृत्तीनाथांचा ज्ञाननाथांचा उध्दार गोदावरीने केला. त्या गंगेच्या लहरींनी जगन्नाथांच्या कवितेला परतत्वस्पर्श झाला. गोदास्पर्शाने गंगालहरीत रस उसळला व गंगा – गोदा एकरस झाल्या. दोघी दोघींना भेटल्या व त्यांनी गंगालहरीत बुडी मारली व रसब्रह्म काव्यरूप झाले. म्हणून जगन्नाथांनी निराळी गोदालहरी लिहिली नाही. गोदावरीच्या मुळाशी गोदेचे प्रियवल्लभ भगवान् त्र्यंबकराज आहेत. म्हणून तळाचा मुळाचा मागोवा घेणारे मूलगामी संत महंत मूळगंगेत स्नानासाठी येतात.

सिंहस्थ कुठे ? त्र्यंबकला की नाशीकला ?

अशा कृत्रिम कलहात बुडालेल्या कलह पण्डितांना गंगा म्हणते !
तुम्ही काठावर का भांडता ! तुम्ही स्नान करा,
मनातल्या तू-तू-मी-मी चे माझ्यात विसर्जन करा.
देहवाङमनशुध्दी झाली की गंगाच तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईल. उत्तरक्रिया घाटावर व भांडण काठावर !
काठावर पास होणारे भांडतात. ज्ञानगंगेच्या मुळाकडे जाणारे कलिमुक्त होतात.
कलह मुक्त होतात !
कलहकंडूचे अस्थिविसर्जन झाले की तुमच्या शंकेलाचिरशांतिमिळेल !!
त्र्यंबकेश्वरला आलांत की प्रश्न कैलासवासी होतील व शंका वैकुंठवासी होतील.
कलह म्हणजे विचारसुर्यावरचे पांढरे ढग !
या ढगात पाणी नसते हे ढग तहान भागवीत नाहीत.
ज्ञानाची भूक भागवीत नाहीत.
प्रेमाची तहान व ज्ञानाची भूक भागवणारी ज्ञानगंगा आहे तीच गोदावरी आहे.
कलिकलहशांतीसाठी सिंहस्थस्नान आहे. लागण तर सर्वत्र असते. साधूसंतही भांडतात. फार पूर्वी शैव वैष्णव साधूंची स्नाने कुशावर्तात एकत्र होत असत कुणाचे स्नान आधी व नंतर या स्नानक्रमावरून चकमक उडाली लाठयाकाठया, भाले-बरच्या, त्रिशूल-तलवारी शांतीच्या म्यानातून बाहेर आल्या ! विरक्त, रक्ताची रंगपंचमी खेळले, मग, वैष्णवांनी नाशिकला स्नानकरावे व शैवांनी त्र्यंबकला असा निर्णय झाला सर्व साधूंचे आखाडे त्र्यंबकेश्वरीच आहेत. सिंहस्थाच्या शाहीस्नानाचा मान कुशावर्ताला मिळाला. कुशावर्त तीर्थावरच मूळगंगेच्या पवित्र जलाला राजपट्टाभिषेक झाला व कुशावर्ताला तीर्थराज ही पदवी मिळाली साधूंच्या राजेशाही मिरवणुका ही ज्ञानाची शोभायात्रा आहे, त्यांच्या त्यागाची वैराग्याची अग्रपूजा आहे.

त्र्यंबकेश्वराचे आध्यात्मिक ऐश्वर्य

गंगा, गायत्री, गिरिजा व गिरीशांनी गौरवलेला, ब्रह्मगिरी हे त्र्यंबकेश्वर क्षेत्राचे वैभव आहे. ब्रह्मगिरी साक्षात त्र्यंबकराज आहे. ब्रह्मगिरीवरची पाच शृंगे ही शंकराची पाच लिंगे आहेत. सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरूष व ईशान ही त्यांची नावे आहेत.
त्र्यंबकराजांच्या सोनेरी मुखवटयाची पांच मुखे हीच आहेत.
पंचलिंगलिंगित ज्योतिर्लिंगाचे मंगलायतन रूप ब्रह्मगिरी आहे.
सर्वमंगला गंगेचे मंगळसूत्र ब्रह्मगिरी आहे.
शिवाने ह्या आपल्या वामांकावर वामांनी पार्वतीला बसविले आहे.
नीलपर्वतवासिनी नीलांबा नीलांबिकाचे रेणुका आहे. रेणुका ही परशुरामांची जननी आहे. भगवान शिवांच्या अणूरेणूत वसलेल्या करूणेचा अवतार रेणुका आहे. श्री विद्येचे परमाचार्य परशुरामांना येथेच श्री विद्येच्या चरणरेणूचे दर्शन झाले. योगिराज अवधूत दत्ताचे दर्शनही परशुरामांना येथेच झाले. शैवांच्या पंचब्रह्माचे पंचशिखरूप ब्रह्मगिरी हाच शैवांचा ‘कौलगिरी’, आहे. रेणुकेचे वसतिस्थान असलेला नीलगिरी दत्तात्रेयाचे सिध्दिक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे.
ब्रह्मगिरीच्या दक्षिण अंकावर कोलांबा नावाच्या देवीचे एक स्थान आहे. कौलांची आराध्या व समयाचारी शाक्तांची आराध्या नीलांबा ही शिवशक्तीची अभिन्न रूपे आहेत.

कौलांबा शक्तीचे गंगाद्वार आहे !
नीलांबा श्री विद्येचे महाद्वार आहे !
या दोन्ही शक्तींचे मातृकापीठ त्र्यंबकेश्वर आहे.

शैववैष्णवांचे शैवशाक्तांचे नवयोगीश्वर नवनाथांचे आराध्य त्र्यंबकराज आहेत. त्रि-तीन, अंबक–लोचन आसलेल्या त्रिलोचन त्र्यंबकाच्या पापण्या ब्रह्मविष्णुमहेश आहेत. जलहरीवर येथे शाळुंका डोळयावरची पट्टी आहे – चष्मा आहे. येथील पिण्डी, पट्टी – चष्मा नसलेल्या शंकराचा उघडा डोळा आहे. याच शिवाच्या डोळयातील करूणा गंगा आहे. परब्रह्माचा ज्योतिर्मय नेत्र ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर आहे.

त्र्यंबकंयजामहे या वैदिक मृत्यंजय मंत्राची देवता त्र्यंबकेश्वर आहेत. ब्रह्मनिष्ठ वसिष्ठ या मंत्राचे द्रष्टे आहेत. विश्वामित्र गायत्रीमंत्राचे द्रष्टे आहेत. ब्राह्मण्य फुलविणाऱ्या गायत्रीचे हे त्रिसंध्या क्षेत्र आहे. वसिष्ठांचे ब्राह्मतेज व विश्वामित्रांचे क्षात्रतेज यांची मृत्युंजयात प्राणप्रतिष्ठा आहे. मृत्यूचे वेळेस तारकमंत्र उपदेशिणारे काशीविश्वनाथच गौतमीतटावर येऊन त्र्यंबकनाथ झाले, विश्वनाथाबरोबर काशीही गंगेसह त्र्यंबक नगरीत प्रवेशली. त्रि – वेद, त्रि – देव, व तीन अग्नि या त्रैताचे अद्वैत दर्शन त्र्यंबकेश्वर आहेत. सामरस्याची समस्यापूर्ति पार्वती ज्यांचे अर्धांग आहे तसेच सौरस्य व सामस्याचे तत्व असलेला सत्वगुणी विष्णु ज्यांचे दुसरे अंग, असे माधव व उमा-धव ज्यांच्यात एकवटले आहेत ते त्र्यंबकनाथ आहेत.
नाथसंप्रदायात त्र्यंबकक्षेत्राचे व त्र्यंबकमठाचे (मठिकेचे) महत्व आहे. आदिनाथ त्र्यंबकनाथांच्या ह्या सिध्दभूमीत गोरक्षनाथ, गहिनीनाथ व निवृत्तिनाथांची तपोभूमी त्र्यंबकेश्वर अआहे. नाथपंथाच्या छत्रच्छायेत ज्ञानदेवांवर निवृत्तिनाथांची तपोभूमी त्र्यंबकेश्वर आहे. नाथपंथाच्या छत्रच्छायेत ज्ञानदेवांवर निवृत्तिनाथांची गुरूकृपा झाली. काश्मिरी शैवांचा व शाक्तांचा आदरपात्र झालेला त्र्यंबकमठ काशिमरी शैव परंपरेतला होता. शैव ग्रंथकार सोमानन्द अभिनवगुप्तांचा पारमार्थिक पणजा होता प्रत्यभिज्ञादर्शन व त्रिकदर्शनाचे संप्रदायबीज सोमानन्दाने काश्मिरात नेले. सोमानन्दाचा श्रीकण्ठशिवही नाथयोग्यांचे दैवत होते.

ज्ञानदेवांनी त्रिक व कौल संप्रदायाचे अद्वैत स्वीकारले परंतु
कौलाचारांचे पंच-मकार टाळले व त्या ऐवजी योगाला भक्तीची
जोड देऊन आद्यशंकराचार्यांच्या अद्वैतमार्गावर आधारलेला
भागवत धर्म उभा केला. वैदिक विचार सागरावरची
लाट भागवतधर्म आहे. वारकऱ्यांच्या भगव्या
पताकेतल्या त्याग वैराग्याला आधार
वैदिक धर्माचीच काठी आहे.
तत्वज्ञानाची पहाट येथेच
झाली व ज्ञानसूर्याच्या
प्रकाशात विश्व
न्हाले !!

त्या त्र्यंबकराजाच्या चरणी कोटि-कोटि प्रणाम

॥ तव तत्वं न जानामि की दृशोऽसि महेश्वर ॥
॥ या दृशोसि महादेव तादृशाय नमोनम: ॥
॥ गांगं वारि मनोहारि मुरारिचरणच्युतम् ॥
॥ त्रिपुरारि शिरश्चरि पापहारि पुनातुमाम् ॥

लेखक : पं. भालचंद्र विनायक मुळे शास्त्री