साहित्य मुख्यपान

 

मराठी भाषा व साहित्याच्या परीक्षा २

२) कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक संचालित 'साहित्य भूषण परीक्षा'

'कुसुमाग्रज प्रतिष्ठान' हे कविवर्य कुसुमाग्रज -  अर्थात श्री. वि.वा. शिरवाडकर यांच्या प्रेरणेने स्थापन झालेले प्रतिष्ठान आहे. गरीब-श्रीमंत, जात-पात, धर्म इ. भेद ओलांडून एकूण समाज जीवनाची उंची वाढावी या दृष्टीने साहित्य, भाषा, विज्ञान, शिक्षण, नाटय संगीत इत्यादी कला व सामाजिक कार्य यांना प्रोत्साहन देणे हा त्यामागचा व्यापक हेतू आहे. मराठी भाषेचा प्रसार व प्रचार करणे हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी दर वर्षाआड मराठी लेखन करणा-या आणि रसिक वाचकांकडून मते मागवून निवडलेल्या ज्येष्ठ साहित्यिकास 'जनस्थान' पुरस्कार दिला जातो. तसेच 'साहित्य भूषण' ही मराठी भाषेसंबंधीची परीक्षाही आयोजित केली जाते. या परीक्षेविषयीची माहिती खाली दिलेली आहे.

साहित्य भूषण परीक्षा
 

* १९९६ पासून दरवर्षी मे महिन्यात ही परीक्षा आयोजित करण्यात येते.
* ह्या परीक्षेची सर्व संकल्पना मा. वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज ह्यांची आहे.
* ह्या परीक्षेस मराठी साहित्याची आवड व आस्था असणा-या कुणाही साहित्यप्रेमी रसिकास बसता येते.
* परीक्षेस बसण्यासाठी जरी पूर्वशिक्षणाची अट नसली तरी परीक्षेस नेमलेल्या साहित्याचे आकलन करून उत्तरपत्रिकेत त्या संबंधी अभिव्यक्ती करण्याची क्षमता अपेक्षित आहे.
* मराठी माणसाला त्याच्या मातृभाषेतील साहित्याकडे वळविण्याचा हा एक प्रयत्न आहे.
* एम्. ए. (मराठी) ह्या दर्जाची ही परीक्षा असून, कोणत्याही विद्यापीठीय परीक्षेशी ती समकक्ष नाही. नोकरी इ. मिळवण्याशी ह्या परीक्षेचा संबंध नाही.
* पारंपरिक संकेताप्रमाणे ही परीक्षा नाही. कारण ह्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका २० ते २५ दिवसात घरूनच लिहून पाठवावयाच्या आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवडयात प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका (को-या) ह्यांचा एकत्र संच प्रतिष्ठानकडून अभ्यासकाकडे रजिस्टर्ड पार्सलने पोहचवण्यात येतो.
* मे महिन्याच्या शेवटी अभ्यासकांकडून उत्तरपत्रिका लिहून प्रतिष्ठानकडे प्राप्त झाल्यावर त्या तज्ज्ञ परीक्षकांकडे पाठवल्या जातात. जुलैच्या पहिल्या वा दुस-या आठवडयात निकालपत्र अभ्यासकाला पाठवण्यात येते व निकाल जाहीर प्रसिध्दही केला जातो.
* नोंदणी फी रु. ५० असून ती ३१ ऑगस्टपर्यंत रोख, मनी ऑर्डर वा डी.डी ने स्वीकारली जाते. चेक स्वीकारले जात नाहीत. नंतर प्रतिष्ठानतर्फे अभ्यासक्रम पुस्तिका व फॉर्म अभ्यासकाला पाठवला जातो. परीक्षेला बसण्याची इच्छा असल्यास ३० ऑक्टोबरपूर्वी परीक्षा शुल्क रु. ३००.०० भरावे लागते. एकदा भरलेले पैसे परत दिले जात नाहीत. त्या वर्षाचे शुल्क त्याच वर्षाच्या परीक्षेसाठी असते.
* ह्या परीक्षेत पहिल्या क्रमांकास रु. १०००.०० चा 'इंद्रायणी' , दुस-या क्रमांकास रु. ७५०.०० चा 'गोदामाता' आणि तिस-या क्रमांकास रु. ५०० चा 'कृष्णामाई' हे पुरस्कार, प्रमाणपत्र व गौरवचिन्ह नाशिक येथे समारंभपूर्वक दिले जाते. मराठी साहित्याची आपली आवड समृध्द करणे हा ह्या परीक्षेचा मूळ उद्देश आहे.

अभ्यासक्रमाची स्थूल रूपरेषा अशी आहे -
 

* रु. ५० भरून नोंदणी केल्यावर अभ्यासक्रम पुस्तिका पाठवण्यात येते. ह्यात खालील सर्व माहिती असतेच.
* अभ्यासक्रमामध्ये एकूण पाच प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे.
* पहिल्या प्रश्नपत्रिकेसाठी मराठी वाङ्मयाचा स्थूल अभ्यास (प्रारंभापासून ते १९५०) करावयाचा आहे. त्यासाठी संदर्भ पुस्तके नेमलेली आहेत.
* दुस-या प्रश्नपत्रिकेत साहित्यप्रकारांपैकी कथा, कादंबरी (ह्यांपैकी एक पर्याय) व वैचारिक गद्य (निबंध), ललित गद्य (ह्यांपैकी एक पर्याय) ह्यांचा अभ्यास अभिप्रेत आहे. त्या त्या साहित्य प्रकारातील विशिष्ट पुस्तके अभ्यासासाठी नेमली आहेत.
* तिस-या प्रश्नपत्रिकेत ग्रामीण साहित्य. दलित साहित्य (ह्यांपैकी एक पर्याय), स्त्रीवादी साहित्य, विज्ञान साहित्य (ह्यांपैकी एक पर्याय) ह्यांचा अभ्यास करावयाचा असल्यामुळे त्या त्या प्रवृत्ती संदर्भातील विशिष्ट पुस्तके नेमलेली आहेत.
* चौथी प्रश्नपत्रिका भाषिक व्यवहार आणि कौशल्ये ह्यांची आहे.
* सर्व अभ्यासक्रमाचे नीट परिशीलन केल्यास लक्षात येईल की अभ्यासकाचे लक्ष साहित्याच्या वाचनाकडे केंद्रित केलेले आहे. वाचन व आकलनाची सवय व्हावी म्हणून इतकी विविधता त्यामध्ये आहे.
* नोंदणी खाली दिलेल्या पत्त्यावर आपला पोस्टल कोड क्रमांकासह पत्ता देऊन रु. ५०.०० भरून केली जावी.

संपर्क :

कार्यवाह
साहित्यभूषण परीक्षा समिती
कुसुमाग्रज प्रतिष्ठान
तरण तलावामागे, टिळकवाडी,
नाशिक ४२२ ००२
दूरध्वनी - ०२५३ - ५७६१२४, ५७६१२५, ५७९९६४ << मागे

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा