पं. भालचंद्र विनायक मुळे शास्त्री यांचा अल्पपरिचय

mule जन्म शके १८४६, मार्गशिर्ष व ॥ १०, रविवार, दिनांक २१.१२.१९२४. गुरूवर्य कै. पं. नथूशास्त्री पाटणकर व कै. पं. भास्करशास्त्री शुक्ल यांचेकडे व्याकरण, वेदांत न्यायमीमांसा साहित्याचा १२ वर्षे अभ्यास. अनेक सत्पुरूषांच्या सहवासातून शुध्द वैदिक जीवन दृष्टीचा लाभ. विद्वत्तेबरोबरच श्रध्दा व उपासनेचा मणिकांचनयोग. भगवतीचे एकान्त उपासक, तपोमूर्ती पूज्य श्रीपूर्णवैतन्य ब्रह्मचारीजी महाराजांचा ‘श्री’ उपासनेचा अनुग्रह. चार शंकराचार्य पीठांकडून धर्मप्रवचनांना आशीर्वाद. वै. ह. भ. प. मामासाहेब दांडेकर, वै. ह. पं. भालचंद्र विनायक मुळे शास्त्री याचा अल्पपरीचय –

भ. प. धुंडामहाराज देगलूरकर, कै. योगिराज श्रीगुळवणी महाराज, कै. पूज्य श्रीधर स्वामीमहाराज, पं. दत्तमहाराज कवीश्वर यांचे आशिर्वाद. पंडितराज राजेश्वरशास्त्री द्रबिड, काशी यांचेकडून काशीला ‘प्रवचनकेसरी’ हा सन्मान. पूजनीय सरसंघचालक कै. मा. स. गोळवलकर गुरूजी यांचे द्वारा नागपूरला भव्य सन्मान व मानपात्र. प्रवचन कार्याव्यतिरिक्त शास्त्रांचे अध्यापन, संस्कृत, मराठी, हिन्दी भाषेतून कविता व निबंध लेखन. श्रीत्र्यंबकेश्वराष्टकम्, श्रीवासुदेवानंदांची भूपाळी व इतर कविता लोकप्रिय.

रामायण, महाभारत, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, श्रीमद्भागवत इत्यादि विषयांवर गेल्या ४० वर्षात २० हजारांवर रसाळ व उद्बोधक प्रवचने. पुरी शंकराचार्यांकडून भागवत प्रवचनांची प्रशंसा. शाळा, हायस्कूल, कॉलेजेस, वाचनालये व साहित्य संस्थांमधून अनेक व्याख्याने. ग्वाल्हेर, जबलपूर, दिल्ली, भोपाळ, येथे हिन्दीतून प्रवचने. यांचा भागवतसप्ताह म्हणजे प्रज्ञा, प्रतिभा व प्रसाद यांचा त्रिवेणी संगमच ! वाराणसी येथील विद्वत्परिषदेच्या अध्यक्षपदाच्या वेळेस ‘प्रवचनवाचस्पती’ ही पदवी. काशीनगरेशांच्या राजप्रसादांत भागवतावर प्रवचन व सत्कार. अहमदाबाद येथील भागवतविद्यापिठात हिन्दीमधून व संस्कृत भाषेतून भागवतार्थ विवरण, सत्कार व संस्कृतमधून सन्मान पत्र. बदरीनाथधामांत श्रीनारायणाचे तपोभूमीत श्रीभागवतसप्ताहाचे अनुष्ठान.

वेद, उपनिषदे, पुराणे व दर्शने यांचा सखोल अभ्यास, मराठी व हिन्दी संतवांङमयाचे सतत परिशीलन, भारतीय राज्यशास्त्र, धर्मशास्त्र व अर्थशास्त्रच्या दृष्टीकोनातून प्रचलित, धार्मिक, सामाजिक, राजकीय व आर्थिक प्रश्नांवरील तर्कशुध्द विवेचन. अमोघ व रसाळ वक्तृत्व, प्रसन्न व्यक्तिमत्त्व, धर्म प्रचाराची कळकळ, यामुळे शास्त्रीबुवांची प्रवचने नवशिक्षित तरूणांनाही मोहून टाकतात. तत्वज्ञान, धर्म व संस्कृती यांच्या पायावर भारताच्या सर्वांगीण विकासासाठी गेली २ तपे जनजागृतीचे मंगलकार्य करणा-या या महाराष्ट्र शारदेच्या मानसपुत्राचा महाराष्ट्राला व भारताला अभिमान वाटतो.