मराठी कोश वाड्मय मुख्यपान

 

भारतीय व्यवहार कोश


'भारतीय व्यवहार कोश' आणि 'भारतीय कहावत संग्रह' (तीन खंड) ही कोशवाङ्मयातील अतिशय अपूर्व स्वरूपाची कामे आहेत. पुण्याचे रहिवासी विश्वनाथ दिनकर नरवणे यांनी या कोशांचे संपादन केलेले आहे. भारतात अनेक भाषा बोलल्या जातात. एका प्रांतीयाला दुस-या प्रांतीयाची भाषा मात्र येत नाही असेच आढळते. मराठी माणसे जर्मन, फ्रेंच, रशियन, जपानी या भाषा आवर्जून शिकतात पण कुणी गुजराथी, कन्नड किंवा तामिळ भाषा शिकायला जात नाही. पण व्यवहारात मात्र इतर प्रांतांची भाषा येत नसल्याने अडते. ही अडचण दूर करण्याच्या कामी 'भारतीय व्यवहार कोश' या कोशाने बहुमोल मदत केली आहे. या कोशात फळे, धान्य, फुले, घरगुती वस्तू, अवयव अशा वेगवेगळया प्रकारच्या गोष्टींना वेगवेगळया भाषेत काय म्हणतात, यांची माहिती दिलेली आहे. त्याखेरीज घरात, बाजारात, कचेरीत, रेल्वे स्टेशनवर बोलल्या जाणा-या वाक्यांचे सर्व भारतीय भाषांत अनुवाद दिलेले आहेत. शंभर प्रकारची व्यवहारोपयोगी वाक्ये चौदा भाषांत पाठ करता आली तर कुणीही बहुभाषिक बनू शकेल. तथापि एखाद्याने स्वत:ची मातृभाषा सोडून इतर भारतीय भाषा शिकण्याची इच्छा व्यक्त केली तर त्याला सर्व भाषा जुजबी का होईना, पण येईल अशी सोय 'भारतीय व्यवहार कोश' या कोशामुळे झालेली नाही.

या कोशाचे प्रकाशन १९६२ साली भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले.

प्रकाशक - विश्वनाथ दिनकर नरवणे, त्रिवेणी संगम,विश्वगंगा,११२/५ प्रभात पथ,पुणे ४११००४.फोन-५६६२२६३

प्रमुख संपादक - विश्वनाथ दिनकर नरवणे

एकूण खंड - एक

पृष्ठ संख्या - २७०

किंमत - रु.३००/-

मिळण्याचे ठिकाण - विश्वनाथ दिनकर नरवणे, त्रिवेणी संगम,विश्वगंगा,११२/५ प्रभात पथ,पुणे ४११००४.
फोन-५६६२२६३

 

म्हणींचा कोश

'भारतीय कहावत संग्रह' हा तीन खंडातील म्हणींचा कोश तर फारच विलक्षण आहे. आपल्याला मराठी म्हणी माहित असतात, काही हिंदी 'कहावते' आणि संस्कृत सुभाषितेही शाळेत शिकली जातात. परंतु तीच किंवा त्याच प्रकारची म्हण इतर भारतीय भाषांत असते हे आपल्याला माहीत नसते. ही उणीव या कोशाने भरून काढली आहे. 'गाढव्या गावात गाढवी सवाष्ण' ही म्हण किंवा 'निरस्तपादपे देशे एरंडोपिद्रुमायते' ही संस्कृत उक्ती आपल्याला माहिती असेल. त्या प्रकारच्या म्हणी सर्व भारतीय भाषांत आहेत. हिदींतील 'अंधोमे काणा राजा' अशी म्हण उर्दू, सिंधी, इंग्रजी, गुजराती, बांग्ला, ओडिया, तेलगू, कन्नड या सर्व भाषांत सापडेल. 'सौ कौओमे एक बगला नरेस' ही म्हण इंग्रजीतही आहे.

या कोशातील कुठलेही पान उघडले तरी त्यात गंमती आढळतात. 'खाणे थोडे मचमच फार' या म्हणीचे पर्याय शोधून पाहा. 'झूठा आडम्बर' या विषयातील म्हणींनी त्रेपन्न पाने भरलेली आहेत. त्या प्रकारातील 'घरात नाही दाणा आणि पाटलीण म्हणा' ही म्हण तुम्ही ऐकली असेल, पण त्या प्रकारच्या त्र्याऐंशी मराठी म्हणी आहेत. आळशीपणा, कंजूषपणा, दुबळेपणा, गरिबी असे विषय शोधून पाहा. जातींविषयीच्या म्हणी तीस पाने आहेत. त्या पाहिल्यात तर वेगवेगळया समाजांबद्दल काय समजुती होत्या ते कळेल.

प्रकाशक - वि.दि. नरवणे, त्रिवेणी संगम, 'विश्वगंगा', ११२/५ प्रभात पथ, पुणे ४१ १००४.फोन-५६६२२६३

प्रमुख संपादक - विश्वनाथ दिनकर नरवणे

एकूण खंड - ३

पृष्ठ संख्या - ८२४,८०४ व ८०० पाने (१,२,३ खंडांची अनुक्रमे)

किंमत - रु. १५० प्रत्येकी

मिळण्याचे ठिकाण - वि.दि. नरवणे, त्रिवेणी संगम, 'विश्वगंगा', ११२/५ प्रभात पथ, पुणे ४११००४.
फोन-५६६२२६३

 

संख्या संकेत कोश

श्रीधर श्यामराव हणमंते यांचा 'संकेतकोश' हा ग्रंथ मराठीतील एक विलक्षण स्वरूपाचा कोश आहे. श्री. हणमंते हे रेल्वेत स्टेशनमास्तर म्हणून नोकरी करीत. संदर्भ म्हणून उपयोगी पडणा-या ग्रंथाची त्यांनी अनेक कामे केली आहेत. प्रथम बिचकत बिचकत प्रकाशित केलेल्या संकेतकोशाची सहा वर्षात दुसरी आणि आणखी बारा वर्षात तिसरी आवृती निघाली. शिवाजी महाराजांच्या काळात जनार्दनपंत हणमंते आनि रघुनाथपंत हणमंते असे मुत्सद्दी बंधू होते. त्याच घराण्यातील हे कोशकार. त्यांच्या तिस-या आवृतीला 'संख्या संकेतकोश' असे नाव दिलेले असून त्यात दहा हजारापर्यत संख्याचे वेगवेगळे  संदर्भ दिलेले आहेत.

'साडेतीन शहाणे' हा शब्दप्रयोग आणि त्यात नाना फडणीस अर्धा शहाणा, हे तुम्हाला माहिती असेल, पण राहिलेल्या तीन शहाण्यांची नावे या कोशात सापडतील. ते तिघे म्हणजे सखारामबापू बोकील, देवाजीपंत चोरघडे, आणि विठ्ठल सुंदर. सखारामबापू बारभाईच्या कारस्थानातील मुत्सद्दी , विठ्ठल सुंदर निजामाच्या दरबारातील मुत्सद्दी आणि देवाजीपंत चोरघडे नागपूरकर भोसल्यांच्या दरबारातील मुत्सद्दी म्हणून गाजले होते. आता बारभाई शोधण्याचा प्रयत्न केला तर ते कोशात सापडणार नाहीत; पण शोधता शोधता बारा बलुतेदार, बारा अलुते, बारा इमाम, बारा कडधान्ये सापडतील; मात्र बारा मावळे, बारा धान्ये सापडणार नाहीत. साडेतीन शहाणे पाहताना तुम्हाला साडेतीन मुहूर्त कोणते ते समजेल.

या प्रकाराने कुठलीही संख्या घेतली तरी अनेक गमतीजमती सापडतील. वेगवेगळया प्रकाराचे श्लोक किंवा सुभाषिते मिळतील. तीन संख्येबद्दल 'पुस्तकं वनिता वित्तं परहस्तगतं गतम् | यदिचेत्पुतरायाति नष्टं भ्रष्टंच खंडितम् |' (म्हणजे पुस्तक, स्त्री व पैसा या तीन गोष्टी जर परक्याच्या हाती गेल्या व परत मालकाकडे आल्या तर त्या भ्रष्ट, मोडलेल्या अशा अवस्थेतच येतात), चार संख्येबद्दल 'तैलाद्रक्षेत जलाद्रक्षेत रक्षेत शिथिल बंधनात | मूर्खहस्ते न दातव्यम् एतद् वदतिपुस्तकम् |'( तेल, पाणी किंवा सैल बांधणी या तिन्ही गोष्टींपासून एखाद्याचे रक्षण करणे शक्य आहे, परंतु ती वस्तू जर एखाद्या मूर्खाच्या हाती पडली तर त्याचे रक्षण करणे अशक्य आहे . म्हणून मूर्खाच्या हाती ती लागू देऊ नये) असे श्लोक सापडतील. प्रत्येक संख्येबद्दलचे असे निवडक श्लोक पाठ करण्यासारखे आहेत.

चौदा विद्या, चौसष्ट कला, षड्रस म्हणजे सहा चवी, नाटकातील नवरस, बारा ज्योतिर्लिंगे, बत्तीस लक्षणे, छत्तीस गुण, बहात्तर रोग, शंभर कौरव असे संख्यावाचक संदर्भ वेळोवेळी आपल्या वाचनात, ऐकण्यात आलेले असतात; पण ते नेमके माहिती नसतात.

या कोशात साडेतीनशे विषयांवर पाच हजारांपेक्षा जास्त संकेतांची माहिती दिलेली आहे. अष्टप्रधान, सप्त पाताळ, अकरा नरक अशा प्रकारे शोधत जा किंवा कुठलेही पान उघडून वाचायला सुरुवात करा. तुमच्या ज्ञानभांडारात सतत भरच पडत राहील.

प्रकाशक - मनोहर यशवंत जोशी, 'प्रसाद प्रकाशन',१८९२ सदाशिव पेठ, पुणे ४११०३०. फोन-४४७१४३७

प्रमुख संपादक - श्रीधर श्यामराव हणमंते

एकूण खंड - एक

पृष्ठ संख्या - ५७५

किंमत - रु. ५०

मिळण्याचे ठिकाण - मनोहर यशवंत जोशी, 'प्रसाद प्रकाशन',१८९२ सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.
फोन -४४७१४३७

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा