नवीन काय वाचाल? मुख्यपान

 

बायबल आणि वनस्पती

वनस्पतीचे अभ्यासक आणि वृक्ष मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री.शा.प्र.दिक्षित यांनी 'बायबल आणि वनस्पती' हया अतिशय वेगळया विषयावरचे पुस्तक लिहिले आहे. बायबलमध्ये ज्या विविध वनस्पतींचा उल्लेख विविध संदर्भानुसार करण्यात आलेला आहे, त्यांचा सखोल अभ्यास करून हे अनोखे पुस्तक लिहिण्यात आलेले आहे.

हया छोटेखानी 'पॉकेट बुक' मध्ये दिक्षितांनी दोन भागांमध्ये वनस्पतींचे वर्णन केलेले आहे. बायबलमध्ये उल्लेखलेल्या कथा व त्या कथामधील वेगवेगळया वनस्पतींचा संदर्भ याबद्दल तर लेखकाने अनेक प्रसंग पुस्तकातून मांडले आहेत. पण केवळ बायबलमधील कथा व वनस्पतींची नावे याही पलिकडे जाऊन सर्व वनस्पतींची शास्त्रीय माहिती, ज्या भागात हया वनस्पती वाढतात, तथील भौगोलिक वैशिष्टये, भारतात आढळणा-या तत्सम वनस्पती ही सर्व माहिती अगदी सोप्या शब्दांत देण्यात आली आहे.

पुस्तकाच्या पहिल्या भागात एका विशिष्ट वनस्पतीच्या पानातून झिरपणा-या ज्वलनशील तेलाचे ज्वलन झाल्यानंतर ते मूळ स्वरूपात कायम राहत असल्याचा उल्लेख आढळतो. मँट्रेक वनस्पतीच्या मुळया खाल्याने मनातील इच्छा पूर्ण होते, हयाबद्दल रेचेल व लेह हया बहिणींची बायबलमधील रंजककथाही लेखकाने सांगितली आहे. जटामांसी झाडाच्या सुगंधी तेलाने येशू ख्रिस्ताच्या पायांना मसाज करणा-या महिलेची गोष्ट सांगून जटामांसीच्या तेलाचे महत्व विशद केले गेले आहे. 'अथेले' हया मोठया क्षारवृक्षाची कथा व अशाच प्रकारचे, जातीचे वृक्ष आपल्या खान्देशात नदीच्या पात्रात कसे वाढतात, हे वाचून नक्कीच विस्मय वाटतो. ऍ़डम- ईव्ह व ज्ञानवृक्षाची फळे, ईडलिंबाची कथा, पॅपीरस नावाच्या नवस्पतीपासून बनविण्यात येणारा टिकाऊ कागद हया सर्व सदंर्भामुळे ज्ञानात मोलाची भर पडते. पॉलियुरस स्पायना हया काटेरी वनस्पतीचा मुकूट येशूला मृत्यूच्या वेळी घातला गेला होता. ख्रिसमसच्या कालावधीत बहर येणा-या अकरा फुलांचे वर्णनही शेवटच्या प्रकरणात आढळते.

दुस-या भागात देवदूत व सैतान वर्गीय फळांचा बायबलमधील उल्लेख खूपच माहितीपूर्ण असा आहे. देवदूत वर्गातील फळांचे चार प्रकार आणि सैतान वर्गातील बारा प्रकार यांची सखोल माहिती लेखकाने दिली आहे. पुस्तकाच्या शेवटच्या भागात बायबलमध्ये नाममात्र उल्लेख असणा-या कॅथड्रेल, विंडोज, जोशुआ, कँडल अशा वनस्पतींची उत्कंठावर्धक माहिती देण्यात आली आहे. एका वेगळया विषयावरील माहितीपूर्ण पुस्तक म्हणून शा.प्र.दिक्षितांचे हे 'पॉकेटबुक' नक्कीच वाचनीय आहे.

- प्राची पाठक

पुस्तक - बायबल आणि वनस्पती
देणगी मुल्य - २०/-
लेखक - श्री. शा.प्र.दिक्षित

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा