आवळा कॅन्डी
साहित्य -
१ किलो आवळे, ७५० ग्र. साखर, पीठी साखर
कृती -
चांगले निवडलेले आवळे स्वच्छ धुवून, पुसून, पाणी न घालता बंद डब्यात भरावे. आता हा डबा कुकरमध्ये ठेवून ३-४ शिटट्या होऊ द्याव्यात. पूर्णपणे गार झाल्यावर आता आवळ्याच्या पाकळ्या सहजपणे वेगळ्या करता येतील. बी काढून टाकून सर्व आवळ्यांच्या पाकळ्या वेगळ्या करुन घ्याव्या. हे आवळे भांडयात काढून त्यावर साखर पेरावी अश्या त-हेने आवळे पूर्णपणे साखरेने झाकले जातील. आता हे भांडे उन्हात ठेवावे. आठ तासांनी साखरेचा पूर्णपणे पाक झाला असेल. हे भांडे पुढील दोन दिवस उन्हातच राहू द्यावेत. तिस-या दिवशी आवळे पूर्णपणे पाकाच्या तळाशी जातील. आता चाळणीवर हा पाक गाळून घ्यावा. वर उरलेल्या कॅन्डी उन्हात अजून २-३ दिवस वाळवायला ठेवाव्यात. पूर्णपणे वाळल्यावर अधिक गोड हवी असल्यास कॅन्डीवर पिठी साखर चोळावी. वाळलेल्या कॅन्डी बंद डब्यात भराव्यात. उरलेला पाक हा आवळा सरबत म्हणून उपयोगात आणता येतो. पाक बाटलीत भरुन, फ्रीज मध्ये ठेवावा. सरबत प्यायच्या वेळेला एक ग्लास पाण्यात २-३ चम्मचे पाक मिसळल्यास आवळा सरबत तयार.
- भाग्यश्री केंगे
shree@marathiworld.com
|