MarathiWorld - HomeServices
About Us About Marathi World Suggest a site Feedback Contact Site Map

एक शून्य शून्य


जादू बंगालीबाबांची ! (भाग २)

अचानक मॅडमना सायन येथील बाबा मलीकजींची आठवण झाली. त्या बाबांच्या कार्यालयात गेल्या. मलीकजींनी ध्यानधारणेनंतर त्यांच्या पतीच्या मनावर वाईट शक्तींनी कब्जा केल्याचे सांगितले व पुन्हा एक पूजा करण्यास सांगितले. खर्च केवळ रू. १०००/- असल्याने ती पूजाही पार पडली. परंतू त्याचा काही परिणाम दिसेना. एका भेटीत मलिकजींनी वाईट शक्तींना थोपविण्यास हवेत हात उभा धरला तेंव्हा त्यांच्या हातावर रक्ताच्या दोन रेषा दिसल्या. त्या दिवशी पूजेसाठी बाबांनी रू. ४०,०००/- ची मागणी केली. हिरमुसल्या होऊन मॅडम परतल्या. निघतांना बाबांनी त्यांना घरातील व्यक्तींना जपण्याचा सल्ला दिला व सर्वांनाच धोका असल्याचे सांगितले. रू. ४०,०००/- ची व्यवस्था कशी करावी हयाच विवंचनेत मॅडम घरी पोहोचल्या.
विवाहीत मुलीला जावयाने घरी आणून सोडल्याने व धाकटी मुलगी लग्नाची असल्याने, सेवानिवृत्त शिक्षक असलेले मॅडमचे वडील त्याकाळात सतत विवंचनेत असत. दोन दिवसांनंतर ते असेच विचारमग्न अवस्थेत चालत असतांना एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली व रूग्णालयात नेईपर्यंत त्यांचा अंत झाला. मॅडमना बाबा मलीकजींनी दिलेला सावधानतेचा इशारा आठवला. त्यांनी बाबांना फोन केला असतांना, बाबांनी वडीलांच्या मृत्यूबाबत, मॅडमनाच दोष देऊन यानंतर त्यांच्या मुलाचा नंबर लागण्याची शक्यता वर्तवली. ते ऐकल्यावर मात्र मॅडमचा धीर सुटला. त्यांना, त्यांच्या एका मैत्रिणीचे वडील सहाय्यक आयुक्त असल्याचे आठवले. लागलीच त्या त्यांच्या मैत्रिणीकडे पोहोचल्या. तेव्हा त्यांना धारावी पोलिस ठाण्यात जाण्याचा सल्ला मिळाला.
ही सर्व चित्तथरारक हकीगत ऐकल्यावर, मी पुढील कामांची मनाशीच आखणी करून मॅडमना फिर्याद देण्याबद्दल सुचवले. परंतु त्या स्थितीत मॅडमच्या मनाची तयारी होईना. तेव्हा त्या समस्येचे सामाजिक महत्त्व लक्षात घेऊन फिर्याद दिल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही असे मॅडमना समजावून सांगितले व त्यांची फिर्याद नोंदवून घेतली. बाबा मलीकजींशी फोनवरून संपर्क साधून पैशांची व्यवस्था झाल्याचे सांगण्यास मॅडमना सांगताच, बाबांनी ''मॅडमच्या मागे लागलेल्या, सर्व शक्ती, त्यांच्या खोलीत एकवटलेल्या आहेत व मॅडमनी दरवाजा उघडताच त्या त्यांच्यावर झडप घालतील'' असे सांगून सायन स्टेशनच्या बुकींग ऑफिसजवळ त्यांचा सहाय्यक पाठवतील त्याच्याकडे पैसे द्यावे असे सांगितले.

त्यानंतर मी रू. १०० च्या नोटांच्या आकाराच्या को-या कागदाची बंडले, बाजूच्या प्रेसमधून कटिंग करून घेऊन, त्या बंडलांच्या वर व खाली रू.१०० च्या ख-या नोटा लावल्या. दोन साक्षीदारांना बोलावून नोटांच्या खालच्या कागदावर त्यांच्या सहया घेतल्या व अशी चार बंडले तयार केली व ती एका प्लास्टीकच्या पिशवीत गुंडाळून साक्षीदारांसमक्ष मॅडमकडे सोपविली. त्यानंतर मॅडम पुढे व त्यांच्या आजूबाजूला मी व माझा स्टाफ, साध्या कपडयात, आणि दोन साक्षीदारांना घेऊन सायन स्टेशन परिसरात पोहोचलो आणि मॅडमकडून पैशांचे बंडल घेणा-या बाबांच्या सहाय्यकास ताब्यात घेतले.
तेथून आमचा लवाजमा बाबांच्या कार्यालयात पोहोचला. बाबा मलीकजी आणि त्यांच्या सोबत असणारा त्यांचा साथीदार व ठाण्यामध्ये मॅडमकडून तब्बल रू.९६,०००/- उकळणारा बाबा नवरत्न बंगाली ह्यांना अटक करण्यात आली.
त्यांच्या ऑफिसची झडती घेतली असता बाबांच्या व्यवसायाची आयुधे सापडली. बाबा बंगालीचा धुर्तपणाचे व नागरिकांच्या अंधश्रध्दाळूपणाचे नवल आणि दु:ख वाटले. त्या सर्व साहित्याचा वापर कसा केला जातो हे बाबांच्या तोंडून ऐकल्यावर फिर्यादी डॉक्टर मॅडमही हतबध्द झाल्या होत्या.

सदर तीन आरोपींच्या जबाबातून उघड झालेली माहिती मी थोडक्यात वाचकांच्या माहितीसाठी देत आहे.
१. त्यावेळी ह्या बाबा बंगालीसारखे २१ बाबा मुंबईत धंदा करीत होते.
२. ह्यांच्यापैकी कोणीही बंगालशी संबंधित नाहीत हे सर्व मेरठ आणि आजूबाजूच्या गावांमधील आहेत व त्यांचे एकमेकांबराबर लागेबांधे असतात.
३. प्रत्येक बाबा गावी गेला की गावातील उनाड नातेवाईक मुलांना मुंबईत आणतो. काही दिवस बाबाकडे उमेदवारी केल्यावर तो स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय सुरू करतो.
४. त्यांना रसायन शास्त्राचे जुजबी ज्ञान आवश्यक असते. त्यामुळे कागदात हातचलाखीने तांदुळाच्या जागी तांदुळाएवढेच पिवळया फॉस्फरसचे दाणे बांधून दिल्यावर कागद दोन दिवसात करपतो.
५. पर्गोगोलॅक्सच्या (जुलाबाच्या गोळया) गोळयांत फिनॉलथॅलिन असते. त्या गोळया पाण्यात विरघळवून ते पाणी हातवर लावले व नखात थोडा चुना ठेवला की रक्तासारखी लाल रेघ उमटविणे सहज शक्य होते.
६. लालदिव्याच्या प्रकाशात मडक्याच्या गळयात बांधलेला काळा रेशमी दोरा, ग्राहकांना दिसत नाही व बाबाला मडके हलवणे (दो-यामुळे) सहज शक्य होते.
७. ग्राहकाला पुरेसे लुटून झाल्यावर, त्याला बोलावून एका मडक्यांत थोडे पाणी ठेऊन त्यात फुले व फळांसोबत, ग्राहकांच्या नकळत सोडियम धातूचे काही छोटे तुकडे टाकले जातात व सोडियमचा पाण्याशी सयोग झाल्यावर फटाका फुटल्यासारखा आवाज होतो व ग्राहकांना वाईट शक्तीचा अंत झाल्याचे समाधान मिळते.

बाबांच्या कार्यालयात मिळालेल्या अनेक वस्तूंमध्ये कॉलेजच्या पिकनिकच्या ग्रुप फोटोमधील एखाद्या मुलीचा फोटो कापून वेगळा केलेला फोटोचा तुकडा होता, असे असंख्य तुकडे आढळले, काही परीक्षांची हॉल तिकिटस् सापडली. या वस्तू मुलीवर एकतर्फी प्रेम करणा-या मुलांनी वशीकरणासाठी तसेच विविध परीक्षेत दैवी शक्तीच्या सहाय्याने पास होण्यासाठी दिलेल्या होत्या!
विशेष बाब म्हणजे हे बाबा बंगाली आमच्या कोठडीत असतांना काही बारबाला त्यांच्यासाठी जेवण घेऊन येत असत. त्यांच्याकडे चौकशी केली असता हे बाबा बंगाली रोज संध्याकाळी डान्सबारमध्ये 'ध्यानधारणा' करीत असत व नडलेल्या भोळया भाबडया लोकांकडून उकळलेले पैसे बारमधील अप्सरांवर उधळीत असत. पैसे खर्च करणारी ग्राहक असल्याने त्या बारबाला पोलीस कोठडीत त्यांच्यासाठी नियमित जेवण आणीत असत.
ह्या गुन्ह्याच्या तपासावेळी प्रकर्षाने जाणवलेली उणीव म्हणजे अशा भोंदू व्यक्तीविरूध्द कारवाई करता येईल असा कोणताही परिणामकारक कायदा नाही. जादूच्या सहाय्याने उपचार करून काही ठराविक आजार बरे करण्याचा दावा करणा-या 'आक्षेपार्ह' जाहिराती दिल्यासच लागू होणारा विशेष कायदा आहे. त्यामुळे अंध्दश्रध्दा निर्मूलनासाठी कायदा असणे, खरोखरच आवश्यक आहे. त्यामुळे गुन्हे नोंदवितांना किंवा दोषारोप पत्र सादर करतांना मला भारतीय दंड सहितेच्या खंडणी विरोधी कलमांसह कलम ५०८ (दैवी प्रकोपाची भिती दाखवून एखाद्या व्यक्तीस काही करण्यास भाग पाडणे) ह्याच कलमाचा आधार घ्यावा लागला.
ह्या घटनेनंतर ब-याच वाचकांना सदर महिला उच्च शिक्षित असूनही ह्या दडपणाला बळी कशी पडली? हा प्रश्न पडेल. पण ह्या सुशिक्षित महिलेने एका गाफील क्षणी सदर जाहिरात वाचून बाबांशी संपर्क साधण्याची चूक केली होती. पण त्यानंतर बाबा बंगालीच्या वाईट शक्तीच्या दडपणाला बळी पडली ती डॉक्टर महिला नाही तर एक भारतीय पत्नी व माता एवढीच तिची ओळख होती! प्रेक्षकांनी/वाचकांनी स्वत:च्या नीरक्षिर विवेक - तारतम्य राखून प्रचाराकडे दुर्लक्ष करणे ही काळाची गरज आहे. सुशिक्षित असल्याचे गमक आहे.


- सुहास गोखले

कृपया लेखांबाबत वाचकांनी प्रतिक्रिया feedback@marathiworld.com वर ईमेलने कळविल्यास यानंतरही काही संस्मरणीय प्रकरणांची माहिती देता येईल. सदर हकीगत कथनकर्ता, लेखक नसून सामाजिक जाणीवा जागृत ठेवण्याचा प्रयत्न करणारा पोलीस अधिकारी आहे हे विचांरात घ्यावे ही विनंती.