MarathiWorld - HomeServices
About Us About Marathi World Suggest a site Feedback Contact Site Map

एक शून्य शून्य


जादू बंगालीबाबांची ! (भाग १)

गुन्हे प्रकटीकरण अधिकारी म्हणून, दहा पोलीसांच्या मदतीने पो.ठाणे हद्दीत घडणारे खून, खूनाचे प्रयत्न, दरोडे, जबरी चो-या, बलात्कार अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची उकल करणे हे माझ्यावर सोपविलेले विशेष काम होते. त्या दिवशी सकाळी मी न्यायालयांत सादर करण्याच्या अहवालाचे काम करीत असतांना मला वरिष्ठ पो. निरीक्षकांनी बोलावले. मी त्यांच्यासमोर बसताच त्यांनी बोलायला सुरूवात केली. ''सहाय्यक आयुक्तांच्या, परिचयाच्या एका डॉक्टर महिलेला काही त्रास झाला आहे व प्रकरण अतिशय नाजूक हाताळणे आवश्यक आहे. ते एखाद्या विशेष अधिका-याच्या हातांत सोपवावे. बाकी माहिती त्या डॉक्टर स्वत:च देतील. तेव्हा तू त्यांना भेटून पुढील आवश्यक ती कारवाई कर''. थोडयाच वेळात डॉक्टर मॅडम आल्यावर, वरिष्ठ निरीक्षकांनी मला बोलावले.

प्राथमिक परिचयानंतर सदर डॉक्टर महिलेने अतिशय अडखळत पतीकडे कटाक्ष टाकीत निवेदनाला सुरूवात केली. ''मी ठाण्यात वैद्यकीय व्यवसाय करते. एका परिचित महिलेकडून, सौंदर्य प्रसाधने व इतर वस्तू खरेदी करीत असे. कारण तिच्याकडे परदेशी वस्तू सहजपणे उपलब्ध होत असत. बिलाबद्दल विचारले असता, बेफिकीरीने नंतर हिशोब करू असे म्हणत. एकदा मी बीलाबद्दल फारच आग्रह धरल्यावर, त्यांनी जी रक्कम सांगितली तेव्हा मला माझी फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पंरतू त्या वस्तू वापरायला सुरूवात केली असल्याने मला त्या महिलेने सांगितलेली रक्कम देण्याखेरीज पर्यायच उरला नव्हता. संध्याकाळी पतीनेही ''तुझ्यासारख्या सुक्षिशित बाईने तरी फसवले जायला नको होते''. असे म्हटल्यावर अधिकच मन:स्ताप झाला!

दुस-या दिवशी पती व्यवसायानिमित्त व मुलगा बालवाडीत गेल्यावर अस्वस्थपणे त्यांनी स्थानिक वृत्तपत्र चाळायला सुरूवात केली. अचानक त्यांची नजर एका जाहिरातीवर खिळली. बाबा नवरत्न बंगाली ह्या तांत्रिकाची जाहिरात त्यांना विचारात पाडून गेली. एकतर्फी प्रेम साकार होण्यासाठी, फसवणूक झाल्यावर नुकसान भरून काढण्यासाठी आणि अशा अनेक कारणांसाठी बाबाची बंगाली जादू 'अक्सिर इलाज' ठरणार होती. प्रचिती न आल्यास पैसे परत देण्याची हमी दिली होती. त्यांनी लगेच फोनवर संपर्क साधला. बाबांनी त्यांच्या फसवणूकीची माहिती घेतली. फसवणूक झालेली रक्कम रू १०,०००/ च्या घरात असल्याचे समजल्यानंतर बाबांनी सांगितले की केवळ एक पूजा करावी लागेल. फसवणूक करणारी व्यक्ती आपणहून जास्त घेतलेली रक्कम परत करेल. पूजेला साधारण रू.१२००/- खर्च येईल.

डॉक्टर मॅडमनी रू.१२००/- देऊन पूजा करून घ्यायचे ठरविले आणि बाबांच्या ऑफिसमध्ये रक्कम जमा केली. संपर्कासाठी आपला नंबर दिला. तिस-या दिवशी फोन आला. थोडयाशा भेदरलेल्या बाबांनी सांगितले की त्यांनी नियोजित पूजा केली. परंतू समोरची व्यक्ती कल्पनेपेक्षा जास्त प्रभावी असल्याने, त्यांची पूजा त्यांच्यावरच उलटली आहे. तेव्हा कार्यालयात येऊन भेटावे.

उलटलेल्या जादूचा मॅडम आणि त्यांचे कुटुंबीय ह्यांच्यावर काही परिणाम होणार आहे हे पडताळण्यासाठी, कागदात थोडे तांदूळ बांधून पुडी दिली व ती कपाटात उघडयावर ठेवावी. दोन दिवसानंतर ती पहावी. मधेच उघडू नये असे सांगितले. दोन दिवसानंतर पुडीचा कागद करपलेला आढळल्यावर, डॉक्टर हादरल्या व त्यांनी बाबांकडे धाव घेतली. बाबा विचारात पडला व त्याने आणखी एक पूजा करायला सांगितली. त्यासाठी लागणारी रू २०५०/- ची रक्कम निमूटपणे समोर ठेवली. पंरतु दुस-या दिवशी बाबांनी मॅडमना समोर बसवले. कार्यालयातील मुख्य दिवा बंद करून एक लाल दिवा लावला.

जमिनीवर काही आकृती काढून, त्यात एक गोल तळाचे छोटे मडके ठेवले व पूजा सुरू झाली. पूजेनंतर त्यांनी डॉक्टर मॅडमना सांगितले की त्यांच्या कुटूंबामागे लागलेल्या वाईट शक्ती त्या मडक्यात एकत्रित झाल्या आहेत. त्यांना काही प्रश्न विचारावे. होकारार्थी उत्तरासाठी मडके हलेल व नकारार्थी उत्तरासाठी स्थिर राहील.

''माझ्या कुटुंबियांना काही त्रास आहे का?'' मॅडमने विचारले आणि तत्काळ मडके हलू लागले. ''तुम्ही शांत रहावे. मी तुम्हाला कळकळीची विनंती केल्यास तुम्ही मान्य कराल कां?'' मडके स्थिर राहीले. ''यावर काही उपाय आहे कां?'' प्रश्नासरशी मडके हलू लागले. त्यावर बाबांचा चेहरा उजळला व त्यांनी मॅडमना धीर दिला व तिस-या पूजेचा उपाय सूचवला. मात्र त्यासाठी खर्च रू.५०००/- येणार होता.

ह्यानंतर त्याच स्वरूपाच्या घटना होत राहिल्या, मॅडम पूजांसाठी पैसे खर्च करीत राहिल्या. बाबांनी दिलेल्या ताकीदीप्रमाणे डॉक्टर ज्यांना ह्या प्रकाराबद्दल सांगतील ती व्यक्ती मरणार असल्याने त्यांना ह्याबाबत पतीलाही सांगण्याची हिमंत होत नव्हती. अशाच एका प्रसंगी आपल्या छोटया मुलाला तर काही त्रास होणार नाही ना ह्या शंकेने भेडसावल्यावर बाबांच्या आसनाजवळील काळया कापडाची बाहुली नाचून, त्यांना मुलाची शाश्वती नसल्याची प्रचिती देऊन गेली. त्या दिवशी प्रथमच मॅडमनी, पतीच्या कपाटात व्यापाराच्या व्यवहारासाठी ठेवलेली रक्कम बाबांकडे सुपूर्द केली! त्यानंतर एकदा बाबांनी मॅडम पुढे पूजा करतांना हवेत हात फिरवून मॅडमच्या भोवती घोटाळणा-या शक्तींना दूर ढकलले व पार्टीशनच्या दारावर कोणीतरी आपटल्याचा आवाज झाला. त्या दिवशी घरातील दागिने गहाण ठेवण्यास सुरूवात केली.

अशाच एका दिवशी बाबा नवरत्न बंगालीने, त्यांच्या कार्यालयात आलेले दुसरे गुरू बाबा मलीकजी ह्यांची ओळख करून देऊन ते महाज्ञानी असल्याचे व त्यांचे कार्यालय सायन येथे असल्याचे सांगितले. दरम्यानच्या काळात घरातील पैसे व दागिने नाहिसे होत असल्याने चिंतातूर झालेल्या पतीने, पोलिसांत तक्रार करायला पत्नी विरोध करते त्यामुळे पत्नीवरच संशय घेण्यास सुरूवात केली. शेवटी एक दिवस पत्नीच्या माहेरी चुनाभट्टी येथे तिला नेऊन सोडले व पैसे आणि दागिने ह्यांचे काय
झाले हे सांगितल्याशिवाय घरी न येण्याची ताकीद दिली....

(भाग २)

- सुहास गोखले

कृपया लेखांबाबत वाचकांनी प्रतिक्रिया feedback@marathiworld.com वर ईमेलने कळविल्यास यानंतरही काही संस्मरणीय प्रकरणांची माहिती देता येईल. सदर हकीगत कथनकर्ता, लेखक नसून सामाजिक जाणीवा जागृत ठेवण्याचा प्रयत्न करणारा पोलीस अधिकारी आहे हे विचांरात घ्यावे ही विनंती.