|
मराठीवर्ल्डच्या मराठी रसिकांनी पाठवलेल्या 'कविता' |
आई
तुमचं आमचं नातं कधी
एका जन्मचं गुलाम नव्हतं
ऋण आपली फेडता फेडता
बंध गुंतले गाढ दृढता ।।१।।
मनाचा कुठला असा कोपरा काही
जिथे तुमचा ठसा नाही
तुम्ही लावल्या वळणांनी
सरळ झाले मार्ग जीवनी ।।२।।
दुर्धर दुर्गमशा वाटेवरती
काजळलेल्या निराश राती
संस्कारांचा दीप सोबतीला
आर्शिवादाचा कवडसा ओला।।३।।
तुम्ही आम्हां दिलं नाही
असं काही उरलं नाही
ज्याने ओतावी कृतार्थ भरपाई
माप शोधून मिळत नाही।।४।।
आयुष्यभर पळता पळता
विराम खचित येणार खरा
मोकळा श्वास घेऊन मांडू
पुन्हा एकदा डाव सारा ।।५।।
गळयात आपले घालून गळे
मनाला करू कणकण मोकळे
छोटया मोठया आठवणींचे
आनंद मोहोळ कल्लोळमळे ।।६।।
पांग आम्ही फेडावे कसे
ऋणांतून होऊन उतराई
जन्म पुढील बदलून पाहू
होऊनिया तुमची आई।।७।।
- यतीन सामंत
|
|
|
|
|
|
|
|