कृष्णमूर्ती ज्योतिष


शुभमंगल, पण…… सावधान !!!

सुजाता – सुजीत आणि अमिता – अमित या दोन जोडप्यांची लग्न एकाच दिवशी झाली. सुजाता – सुजीत हे दोघेही ऊंची, शिक्षण, पैसा, दिसणं इत्यादी बाबतीत एकमेकांना अगदी ‘अनुरुप’ होते, अगदी मोजून – मापून केलेलं लग्न! याच्या अगदी उलट अमिता – अमित होते. दोघांच्यात ब-याच बाबतीत खुपचं फरक होता. ऊंची, शिक्षण, पैसा, दिसणं अशा अनेक गोष्टीत तफावतच होती दोघे एकमेकांना ‘अनुरुप’ असे नव्हतेच. लग्नाला काही वर्षांचा काळ उलटला आणि धक्कादायक चित्र डोळयासमोर आलं. ऊंची, शिक्षण, पैसा, दिसणं या सर्वच बाबतीत एकमेकांना अगदी ‘अनुरुप’ असलेले सुजाता – सुजीत घटस्फोट घेण्याच्या विचारात होते. ‘आपण एकमेकांबरोबर का राहतोय?’ इथपर्यंत गोष्टी आलेल्या होत्या. याउलट, एकमेकांना अजिबात ‘अनुरुप’ नसलेले अमिता – अमित अत्यंत सुखात नांदत होते ‘लग्न’ ही प्रत्येकाच्या आयुष्यातली एक महत्वाची गोष्ट आहे, पण, त्याहुनही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे, ‘ विवाहसौख्य’ ‘लग्न’ अनेकांची (जवळजवळ सगळयांची) होतात, पण ‘विवाहसौख्य’ नावाची गोष्ट थोडयाच लोकांच्या नशीबात असते.

‘लग्न’ आणि ‘पत्रिका’ यांचा एक घनिष्ठ संबंध आहे लग्नाचीही ‘पत्रिकाच’ असते आणि लग्न ठरविण्याआधी दाखवायचीही ‘पत्रिकाच’ असते. आयुष्यात कधीही ज्योतिषाला पत्रिका दाखवायची वेळ न आलेल्या माणसाला देखील लग्नाच्या वेळी पत्रिकेची आठवण होते. ‘लग्न’ आणि ‘जन्मपत्रिका’ या बाबतीत लोकांच्या मनात प्रचंड प्रश्न असतात. त्याबाबतीत, सगळयात महत्वाचा प्रश्न म्हणजे, ‘लग्न करताना पत्रिका बघावी का बघु नये?’ कारण, पत्रिका बघुनचं लग्न करावं असं असेल, तर मग, पत्रिका न बघता केलेली लग्न कुठे अपयशी ठरतात?, असा मुद्दा उपस्थित होतो. या प्रश्नाच उत्तर असं की, मुळात आधी, एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत ‘विवाहसौख्य’ नावाची गोष्ट किती प्रमाणात आहे हे बघणं महत्वाच ठरतं जर, एखाद्या मुलाच्या किंवा मुलीच्या पत्रिकेत विवाहसौख्य बेताचं असेल किंवा अजिबात नसेल तर कितीही प्रयत्न केले तरी ते मिळणारच नाही. तुम्ही म्हणाल की, मग लग्नाच्या आधी पत्रिका बघुचं नये का ? तर, असंही नाही. समजा, मरणाच्या दारात असलेल्या एखाद्या रुग्णाला तुम्ही हॉस्पीटल मध्ये घेऊन गेलात, तर डॉक्टर असं म्हणेल की, ‘जाऊ दे हो, नाहीतरी मरणारच आहे, औषधं वगैरे दयायची काही गरज नाही, तर याउलट, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत डॉक्टर प्रयत्नाची पराकाष्ठा करतील. रुग्ण नक्की मरणार आहे, हे माहित असुन सुध्दा शेवटच्या क्षणापर्यंत डॉक्टर आपले प्रयत्न सुरुचं ठेवतात. तसचं, प्रत्येक पत्रिका जुळते का नाही हे बघणं हा चांगल स्थळ मिळविण्याचा एक प्रयत्नच आहे. पण, शेवटी, मुळात एखाद्याच्या पत्रिकेत असलेली ‘विवाहसौख्य’ची सीमारेषा आपण ओलांडू शकत नाही हे देखील एक सत्यचं आहे. दुसरं म्हणजे, विवाहसौख्यला वयाची अट नसते. 19 सा व्या वर्षी लग्न होऊन देखील घटस्फोट होऊ शकतो आणि 42 सा व्या वर्षी लग्न होऊनही संसार सुखाचा होऊ शकतो. अशी दोन्हीही उदाहरणं मला महिती आहेत. ‘लग्नाचं वय’ आणि ‘विवाहसौख्य’ या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे.

लोकांच्या मनात आणखी एका गोष्टीविषयी संभ्रम असतो तो म्हणजे ‘पत्रिका जुळविण्याच्या पध्दतीविषयी ‘ बरेच ज्योतिषी हे वेगवेगळया पध्दतीने पत्रिका जुळवतात. काही जण फक्त ‘गुण’ बघतात, काही जण दोघांचे सर्व ग्रह मॅच करतात वगैरे वगैरे. मी माझ्या मागच्या एका ‘ऋणानुबंधाच्या गाठी’ या लेखात ‘पत्रिका जुळविणे’ हा विषय घेतलाच आहे त्यामुळे परत त्यावर लिहित नाही पण अगदी थोडक्यात सांगायचं, तर, ऊंची, शिक्षण, पैसा, दिसणं यापेक्षा दोघांचे ‘स्वभाव’ जुळतात की नाही हे बघण महत्वाचं ठरतं कारण, जर दोघांच्या स्वभाव जुळला तर ऊंची, शिक्षण, पैसा, दिसणं या आणि इतर बाबतीत कितीही फरक असले तरी, ते सर्व फरक भरुन निघु शकतात पण ‘स्वभावाचा’ फरक भरुन निघणं खूप अवघड असतं त्याचप्रमाणे, फक्त ‘गुणं’ बघुन पुढे जाऊ नये. दुसरं म्हणजे, ‘पत्रिका जुळवणं’ हे दोन वस्तु एकमेकांशी किती जुळत आहेत, असं जुळवणं नसुन, दोन्ही पत्रिकांचा साधक बाधक विचार करणं, असं आहे. समोरुन आलेल्या मुलाच्या किंवा मुलीच्या पत्रिकेत काही अत्यंत वाईट किंवा आक्षेपार्ह बाब नाही ना? याचा विचार करणं देखील महत्त्वाच ठरतं.

‘लग्नाच्या गाठी स्वर्गात मारल्या जातात का?’ थोडक्यात ‘ठरलेल्या व्यक्तीशीच विवाह होतो का?’ हा आणखी एक प्रश्न लोकांच्या मनात असतो. या प्रश्नाच उत्तर होकारार्थी द्यावं लागेल कारण, अगदी ठरत आलेले विवाह मोडतात आणि नंतर तिस-याच व्यक्तीबरोबर लग्न होतं. अगदी, साखरपुडयाच्या अंगठयाही परत केल्या जातात आणि नवीनच स्थळाशी नाते संबंध जुळतात काही ठिकाणी, मुलगा मुलगी दोघंही एकमेकांशी लग्न करायला तयार असताना सुध्दा काही गोष्टी अशा अचानक घडतात की होत्याचं नव्हतं होतं आणि त्या दोघांच्याही आयुष्याचे मार्ग वेगळे होतात. काही व्यक्तींच्या पत्रिकेत ‘घटस्फोट’ होण्याचे योग अत्यंत तीव्र असतात. अशा व्यक्तींचा प्रश्न असतो की, मग ‘लग्नचं केलं नाही तर काय होईल?’ म्हणजे पुढचा त्रासचं नको. या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं आहे. जर ‘घटस्फोट’ होण्याचा योग असेल तर लग्नाचा योग असलाच पाहिजे, नाहीतर मग ‘घटस्फोट’ कसा होणार? हे म्हणजे ‘व्हिसा मिळेल’ असं सांगितल्यावर ‘मला पासपार्ट मिळेल का?’ असं विचारण्यासारखं झालं. ज्या व्यक्तींच्या पत्रिकेत पुर्नविवाहाचे योग असतात. त्या व्यक्तींच्या बाबतीत पहिल्या विवाहाच्या वेळी निवड ‘चुकण्याची’ शक्यता खूप जास्त असते, कारण, त्याशिवाय पहिल्या विवाह मोडून दुसरा विवाह कसा होणार? ही निवड चुकण्यासाठी काहीही कारण होऊ शकतात. जसं मनापासून स्थळ न आवडून सुध्दा केलेलं लग्नं, स्थळाची फारशी माहीती न काढता केलेलं लग्न, घरातील मोठया व्यक्तींच्या दबावाखाली येऊन केलेलं लग्न, स्थळाचा स्वभाव ओळखण्यात झालेली चूक, करायचं म्हणून केलेलं लग्न, अशी अनेक कारणं असू शकतात. पहिला फसलेला विवाह हा जर प्रेमविवाह असेल तर त्यात लग्न होण्याच्या आधी एक वाक्य ठरलेलं असतं की, मी लग्न करीन तर ह्याच व्यक्तीशी करीन’ पण सगळयात ‘प्रेमविवाह’ वाईट आणि ‘ठरवून केलेलं लग्न चागलं असं मुळीचं नसतं ‘प्रेमविवाह’ देखील यशस्वी होऊ शकतात आणि ‘ठरवून केलेली लग्नं’ अपयशीही ठरु शकतात, कारण, मी मघाशी म्हटल्याप्रमाणे, त्या व्यक्तीच्या पत्रिकेत ‘विवाहसौख्य’ किती आहे, यावर पुढचं सगळं अवलंबून असतं

‘मुहुर्त किती महत्वाचा?’ हा असाच आणखी एक प्रश्न यासाठी आधी ‘मुहुर्त’ म्हणजे काय? हे लक्षात घेतलं पाहिजे. मुहुर्त म्हणजे ‘शुभ काळ’ किंवा ‘अनुकूल काळ’ पण, एखाद्या व्यक्तीच्या मुळ पत्रिकेतल्या सगळया गोष्टी डावलुन फक्त ‘शुभ’ वेळेनुसार केलेल्या गोष्टी यशस्वी होत नाहीत जवळजवळ सगळी लग्नं ही मुहुर्त पाहुनचं केली जातात, तरीही त्यातली काही अपयशी आणि काही यशस्वी ठरतात. अगदी कुठलाही मुहुर्त न बघता केलेली लग्न तरी अपयशी ठरतात असं कुठेय? पण, म्हणून मुहुर्त बघुचं नये असं अजिबात नाही भुक लागलेली एखादी व्यक्ती समजा पहाटे ४ वाजता जेवली तर अन्न पचणार नाही का? अन्न नक्कीच पचेल पण म्हणून पहाटे चार वाजता जेवणं हे अपेक्षीत नक्कीच नाही. प्रत्येक गोष्टीची वेळ ही निर्सगाच्या अनुकुलतेनुसार साधारण ठरवून दिलेली आहे. शक्यतो त्यात बदल करु नये, पण, अगदी निकडीच्या काळात एखादा केला, तरी चालतो.

तर, असा हा सगळा लग्नाच्या आणि मुख्य म्हणजे विवाहसौख्याबाबतचा उहापोह! कुणाचे फासे सुलटे पडतात तर कुणाचे उलटे ! पण मार्ग कितीही सुकर असला तरी डोळयावर पट्टी बांधुन मात्र चालू नये, हे निश्चित, म्हणूनच शुभमंगल, पण…….. सावधान !!!

Astrologer अभय गोडसे,
http://www.abhaygodse.com