कृष्णमूर्ती ज्योतिष


ग्रहमालेतील बिरबल

‘एका दोरीवर १ शर्ट व १ पँट वाळायला १० मिनिटे लागतात तर, २ शर्टस् व २ पँट वाळायला किती वेळ लागेल? ‘
‘सोपं आहे, १ शर्ट व १ पँट वाळायला १० मिनिटे लागतात तर 2 शर्टस् व 2 पॅण्ट वाळायला २० मिनिटे लागतील. ‘
‘बरोबर ना? ‘

तुमचं उत्तर जर का २० मिनिटे हे असेल तर तुमचं उत्तर साफ चूक आहे. एका दोरीवर कितीही कपडे असतील तरी ते वाळायला सारखाचं वेळ लागेल कारण ते कपडे ‘एकाच वेळेला’ वाळणार आहेत. आज, जर बिरबल असता तर त्याने हया प्रश्नरचं उत्तर पटकन देऊन वर आणखीन दोन कोडी आपल्याला घातली असती, आणि निरूत्तर केलं असतं. बिरबलाकडे अशी एक गोष्ट होती जी अकबराच्या दरबारात फारशी कुणाकडे नव्हती आणि ती म्हणजे ‘बुध्दिमत्ता’ आणि ही प्रचंड बुध्दीमत्ता देणारा ग्रहमालेतील ग्रह म्हणजे अर्थात ‘बुध’.

आपल्या आजू-बाजूला जी काही बुध्दीमान, चतुर, चलाख, धुर्त मंडळी वावरत असतात त्यांचा अर्थातच ‘बुध’ चांगला असतो. बुध ‘चांगला’ म्हणजे काय? हे जाणून घेण्यासाठी मात्र तुम्हाला कृष्णमूर्ती ज्योतिष पध्दतीचा अभ्यास करावा लागेल, पण इथे मतितार्थ कळला तरी पुरेसं आहे.

‘बुध’ म्हटला की आपल्याला फक्त ‘बुध्दीचातुर्य’, धुर्तपणा एवढचं डोळयासमोर येतं पण हयाही पेक्षा कितीतरी अनेक गोष्टी हया बुधाशी संबंधित आहेत. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे ‘एकापेक्षा अधिक’ याचा अर्थ काय? एखादया व्यक्तीच्या बाबतीत तुम्ही बघितलं असेल की त्याला एकाच वेळेला नोकरीच्या दोन चांगल्या संधी चालून येतात आणि मग त्यातली कुठली निवडावी हा प्रश्न पडतो, किंवा लग्नाच्या वेळेला दोन उत्तम स्थळे एकाच वेळेला चालून येतात आणि मग इकडे होकार दयावा की तिकडे, हा प्रश्न पडतो. तसचं काही वेळेला एकच स्थळ हे ठराविक कालावधीने परत सांगुन येतं. हया ज्या सर्व घटना आहेत हया बुधाच्या अंमलाखाली येतात. त्याचप्रमाणे बुध हा जर एखादया व्यक्तीच्या व्यवसायासंबंधात येत असेल तर त्या व्यक्तीचे ‘एकापेक्षा अधिक’ उदयोगधंदे असतात, म्हणजेच धन प्राप्तीचे स्त्रोत (Source of income) हे ‘एकापेक्षा अधिक’ असतात. बुध हा बुध्दीमत्ता देतो हे आपण बघितलचं पण त्यात देखील उत्तम ‘आकलनं शक्ती’ (Grasping Power) आणि तर्कशास्त्र (Logic) देतो. त्याहीपुढे जाऊन विनोदबुध्दी , सर्व युक्त्या हया बुधाच्या अंमलाखाली येतात. ‘शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’!

एका वकिलाने एका इन्सपेक्टरला कोर्टात प्रश्न विचारला की, ‘तुम्ही तुमच्या बायकोला पूर्वी इतकीच मारहाण करता का? फक्त ‘हो’ किंवा ‘नाही’ मधेच उत्तर दया.’ इनस्पेक्टरचे बारा वाजले, ‘हो’ उत्तर दिलं तरी पंचाईत ‘नाही’ उत्तर दिलं तरी पंचाईत!

बुधाच्या अंमलाखाली येणारी कार्यक्षेत्रे म्हणजे सॉफ्टवेअर व त्या संबंधातील सर्व क्षेत्रं, कॉल सेन्टर्स, बीपीओ, इलेक्ट्रॉनिक्स. इथपासून ते लेखन, साहित्य, ज्योतिष इथपर्यंत अनेक आहेत. हा जो लेख तुम्ही आत्ता वाचत आहात याचा कारक देखील बुधचं आहे. बुध आणखी एक गोष्ट दर्शवितो आणि ती म्हणजे ‘बदल’. बुध हा सतत बदल घडविणारा ग्रह आहे. असे उदयोगधंदे की, ज्यात समोरचा ‘ग्राहक’ हा सारखा बदलत असतो. उदाहरणार्थ- दुकान किवां तत्सम व्यवसाय हे बुधच्या अंमलाखाली येतात. बुधाच्या अंमलाखाली येणारं सॉफ्टवेअरचं क्षेत्र हे सतत बदलणारं क्षेत्र आहे. त्याचप्रमाणे सॉफ्टवेअर क्षेत्रात नोक-या बदलण्याचं प्रमाण हे खूप अधिक आहे. ज्या व्यक्तीचं कामाचं स्वरूप हे सतत बदलत असतं ते देखील बुधामुळेच! शेअर बाजार हा देखील बुधाच्याच अंमलाखाली येतो. तिथे तर रोज नविन चित्र असतं. सतत बदल, बुधाचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे एकाच कामासाठी अनेक वेळा किंवा एकापेक्षा जास्तवेळा प्रयत्न करावे लागतात. पहिल्याच फटक्यात काम होत नाही. बुधवारी किंवा बुधाचं नक्षत्र असणा-या दिवशी एखादं काम करायला गेल्यास बहुतेकवेळा त्याच कामासाठी परत जावं लागतं. म्हणजेच पहिल्याच फटक्यात काम होत नाही. वाणी (बोलणे) हे देखील बुधाच्याच अधिपत्याखाली येतं. त्यामुळे वाक्चातुर्य, शब्दपांडित्य हे देखील बुधामुळेच.

बुधाच्या अधिपत्याखाली येणा-या दोन राशी म्हणजे ‘मिथून’ व ‘कन्या’ या दोन्ही राशी जरी बुधाच्याच अधिपत्याखाली येत असल्या तरी या दोन्ही राशीत बुधाच्या गुणधर्माची वेगवेगळी झलक पहायला मिळते. दोन्हीही राशी बुध्दीमान आहेत पण मिथून राशीत बुधाचा चलाखपणा, वाक्चातुर्य, विनोदबुध्दी, धुर्तपणा हया गोष्टी अधिक आहेत. तर कन्या राशीत बुधाची आकलंन शक्ती, चिकित्सकवृत्ती कुठल्याही गोष्टीचा अतिविचार, काही वेळेला या अतिविचारामुळे कन्याराशी निर्णय घ्यायला प्रचंड वेळ लावते. समोरचा माणूस वैतागून जातो, तरी यांचा निर्णय अजून झालेला नसतो. हयांना निर्णय घेण्यासाठी सतत कोणाच्या तरी आधाराची गरज असते. कन्या ही अत्यंत शास्त्रीय पध्दतीने विचार करणारी राशी आहे. प्रत्येक गोष्ट सिध्द व्हावी लागते. थोडीशी अतिशयोक्ती म्हणजे, समजा कन्या व्यक्तीने ‘पिवळा’ शर्ट घातलेला असेल तरी ते एकदा समोरच्या माणसाला विचारतील की मी कुठल्या रंगाचा शर्ट घातलाय? समोरच्या व्यक्तीने एकदा ‘पिवळा’ म्हटलं की मग हयांची खात्री पटते. मिथून ही सतत विचार ‘बदलणारी राशी’ आहे हे लोक त्याचे निर्णय सतत ‘बदलत’ असतात. आज म्हणतील ‘कन्याकुमारीला’ जाऊया तर उदया विचारतील पण आपण ‘काश्मीरला’ गेलो तर?

काही पत्रिकेत विवाह स्थानाशी एका विशिष्ट पध्दतीने संबंधीत असलेला बुध हा विवाहास विलंब करताना आढळतो, पण याच वैवाहिक सुखाशी काही संबंध असेलच असं नाही. ती एक वेगळी गोष्ट आहे. पण मी इथे फक्त विवाहाच्या वयासंबंधी म्हणतोय. बुध ग्रहाला ‘युवराज’ देखील म्हटलेलं आहे आणि या कारणामुळेच की काय तो त्या व्यक्तीला बराच काळ ‘कुमार’ किंवा ‘कुमारीका’ ठेवत असावा. इतर योगात मात्र बुध हा विवाह लवकर करताना आढळतो.

‘संदेशवहनाचा’ कारक देखील बुधच! त्यामुळे आपल्या हातातला ‘भ्रमणध्वनी’ (मोबाईल) हा देखील बुधाच्याच अधिपत्याखाली येतो. बुध हा बुध्दीचा कारक आणि बुध्दी जिथे साठवली जाते त्या मेंदुचे देखील ‘दोन’ भाग आहेत, मोठा मेंदू व छोटा मेंदू! हयात देखील बुधाचं ‘एकापेक्षा अधिक’ हे कारकत्व चुकलेलं नाही!

बुधा संबंधी इतक्या अनेक गोष्टी आहेत त्या सगळया गोष्टीचा एकाच लेखात उल्लेख करणंही अवघड आहे. त्यासाठी देखील एकापेक्षा अधिक’ लेख लिहावे लागतील बहुतेक!

‘रवि’ला ज्योतिषशास्त्रात ‘राजा’ म्हटलेलं आहे आणि ‘बुध’ हा रविच्या म्हणजे सुर्याच्या सगळयात जवळचा ग्रह आहे. अकबर बादशहा देखील बिरबलाला कायम त्याच्याबरोबर ठेवत असे, म्हणूनच बुध्दींच्या कारक बुधाला ‘ग्रहमालेतील बिरबल’ म्हटलं तरी वावगं ठरणार नाही!

Astrologer अभय गोडसे,
http://www.abhaygodse.com