पुष्परचना

Ekebana मनमोहक फुले बघताना अबालवृध्द सर्वच मोहून जातात. जणू फूल म्हणजे, आनंद, प्रसन्नता हे समीकरणच ! सत्यनारायण, गणपती, दसरा, दिवाळी अशा सणासमारंभात फुलांच्या माळा, तोरणे, रांगोळया यांनी परिसर सुशोभित होतो. पुष्पगुच्छांनी प्रियजनांचे स्वागत होते. हयातच घराचे सौंदर्य खुलविणा-या पुष्परचनांची भर पडली आहे. पुष्परचना म्हणजे तरी काय?

पानाफुलांची कलात्मक, रेखाबंध रचना करणे म्हणजे पुष्परचना.

एक सुंदर पुष्परचना बैठकीच्या खोलीचे रूप बदलते. तसेच जेवणाच्या टेबलावर एका फुलदाणीत फुलं ठेवून त्या टेबलाची शोभा वाढवते, व घरी येणा-या पाहुण्यांना मोहून टाकते. आजकाल आपल्याला व्यासपीठावरही सुंदर पुष्परचना बघायला मिळतात. लग्न-समारंभाच्या व्यासपीठावर, ऑफीस व घराच्या कानाकोप-यात अशा सर्व ठिकाणी सुंदर पुष्परचनेने प्रसन्नता आणता येते. एखाद्या चित्रकाराला जसे चित्र तयार करण्यासाठी रंग, कुंचला, पॅलेट, कॅनव्हास, कागद आणि सर्वात महत्त्वाचे नजर व कौशल्य आवश्यक असते. तसेच कौशल्यपूर्ण पुष्परचनेसाठी आवश्यक साहित्य म्हणजे, वेगवेगळया प्रकारच्या फुलदाण्या, वेगळया आकाराच्या, रंगांच्या, वेगळया माध्यमातल्या.

साहित्य :

पाणी – स्वच्छ पाणी हेच फुलांचे जीवन होय. फुलांचे देठ कापताना पाण्यात धरून कापली तर फुलांना लगेच पाणी मिळते.
कात्री – पाने, फुले कापायला विशिष्ट प्रकारची, उत्तम धारेची कात्री हवी. फांदी कापताना खोडाचा तिरका छेद घ्यावा म्हणजे त्यातून जास्तीत जास्त पाणी फांदीला शोषले जाते.
पिनहोल्डर – फुलदाणी पसरट असेल तर, पाने, फुले हव्या त्या आकारात, कोनात बसविण्यासाठी पिनहोल्डर वापरावा लागतो. चपटया, लोखंडी, जड चकतीवर पितळी टोकदार काटे बसविलेले असतात. हयाच टोच्यात फांद्या, फुलं घट्ट व कोनात बसवता येतात. आजकाल पिनहोल्डरला पर्याय म्हणून ओऍसिर (Spung) किंवा उभ्या फुलदाणीत चिकनमेश वापरता येते. (हार्डवेअरच्या दुकानात मिळते) हया सगळयाबरोबर महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे, पाने, फुले, फांद्या,तुरे, गवत, वेली इ.
फुले – निवडताना रचनेसाठी योग्य अशी निवडावीत. फुलं आणल्यावर ती व्यवस्थित कटिंग करून, साफ करून मगच वापरावीत. हयाने फुलं जास्त दिवस टिकण्याचा संभव असतो.
पाने-फांद्या – पाने, फांद्या निवडताना, त्यांचा आकार व रेषा आकर्षक असणे महत्त्वाचे आहे. पाने, फांद्या जास्त दिवस टिकण्याकरिता ते पाण्यात ठेवणे (डुंबवून) खूप आवश्यक आहे. रचनेमध्ये वाळलेल्या, आकर्षक आकारांच्या फांद्या, शेंगा, गवत, कणसे, तुरे यांचा वापर करून विविधिता आणता येते.
स्प्रे – फुलं ताजी राहण्यासाठी त्यावर पाण्याचा फवारा दिवसातून 2-3 वेळेला मारल्यास, फायदेशीर ठरतो.

आता आपण त्याच्या पुढील मुद्दयांवर चर्चा करूया.

१. रंगसंगती –
Ekebana पुष्परचनेत रंगसंगतीला विशेष महत्त्व आहे. कमीत कमी रंगांची फुलं वापरून आकर्षक रचना करता येते. शाळेच्या वयापासूनच आपण चित्रकलेतील प्रायमरी, सेकंडरी, कूल-वॉर्म इ. रंगसंगतींशी परिचित असतो. पुष्परचनेतही या सगळया प्रकारांबरोबरच परस्परविरोधी (कॉन्ट्रास्ट), परस्परपूरक (कॉम्प्लीमेंन्टरी), मोनोक्रोमॅटिक (एकरंगी) इ. रंगसंगतीचे प्रकार वापरून रचनेत आकर्षकता आणता येते. उदाहरणार्थ, एकरंगी रंगसंगतीत एकाच रंगाच्या छटा असलेली फुले वापरून उठावदार पुष्परचना करता येते. तर जांभळा व पिवळा असे परस्परविरोधी रंग वापरूनही कलात्मक रचना करता येते.

२. फुले व पानांचे विविध प्रकार
आजकाल बाजारात विविध प्रकारची फुले व पाने मिळू शकतात पण त्यापैकी पुष्परचनेसाठी लागणारी फुले व पाने ही ठराविक असतात. उदा. फुले: ग्लॅडिओली, गुलाब (चायनाज) जरबेरा, कार्नेश, ऍन्थुरियम, लास्पर व शेवंती इत्यादि.
पाने – अरेका पाम, अम्ब्रेला पाम, शोभेची अळूची पाने, झिप्रि, फर्नचे विविध प्रकार, लीलीची पाने, ऍस्परॅगस, सायकस, शोभेचा केवडा.

३. फुले व पाने यांची उपलब्धता
शहरातील फुलांच्या बाजारात आणि आजकाल तर रस्त्यावरही ठिकठिकाणी जिथे फुलांचे गुच्छ (बुके), परडया इ. मिळतात, तिथे ही फुलेही मिळू शकतात. दादरच्या फुलांच्या बाजारात ऋतुंप्रमाणे वरीलपैकी सर्व प्रकारची पाने व फुले मिळतात.

४. पुष्परचानांचे प्रकार
Ekebana इकेबाना ही जपानी पुष्परचना आहे. तर व्हिक्टोरियन हा युरोपियन पुष्परचनेचा प्रकार आहे. या दोन प्रमुख रचनांशिवाय अनेक प्रकारच्या मुक्त रचनाही करता येतात.
जपानी पुष्परचनेत मर्यादित रंगाच्या कमीत कमी फुलांचा वापर करायचा असतो. या उलट व्हिक्टोरियन पुष्परचनेत रंग आणि फुलं यांच्या वापरावर मर्यादा नसते. मुक्त रचनेतही रंग आणि फुलांचा मुक्तपणे वापर करता येतो. तसेच या रचनेंत कुठलेही साहित्य वापरण्यावरही मर्यादा नसते.

५. पुष्परचनेविषयक अभ्यासक्रम
पुष्परचनेचे अभ्यासक्रम मुंबई शहरात गिरगाव, कफपरेड, खार, दादर इ. ठिकाणी घेण्यात येत असून जपानमधील ओहारा स्कूलतर्फे इकेबानाच्या एकूण दहा परीक्षांचा अभ्यासक्रम असतो. या पैकी पाच परिक्षा पूर्ण केल्यावर शिक्षकाचा दर्जा प्राप्त होतो. पुष्परचना शिकताना व प्रत्यक्ष करताना एखादा छंद जोपासण्याचा आनंद मिळत असला तरी हा छंद तसा खर्चिक आणि बराच वेळ घेणारा आहे. मात्र या पुष्परचानांना प्रदर्शनात, स्पर्धांमध्ये, मोठया हॉटेल्सच्या सजावटीमध्ये किंवा लग्न समारंभात विशेष स्थान असून व्यावसायिक दृष्टयाही तितकेच महत्त्व आहे.