वादन

पारंपारिक वाद्य

शास्त्रीय गायक


बासरीवादन

bansuri चर्मवाद्ये, सुषिरवाद्ये, तंतुवाद्ये हे वाद्यांचे प्रकार आहेत. बासरी हे एक सुषिर वाद्य आहे. जुन्या ग्रंथांमध्ये वेणू, वंशी, पावरी, मुरली किंवा फिल्लगोरी या नावांनी बासरीचा उल्लेख झाल्याचे आढळते. पोकळ बांबूचा तुकडा तसेच लाकडी किंवा धातुची नळी यापासून हे वाद्य बनवितात. बांबूची बासरी सर्वात उत्तम मानली जाते. तसेच काही ठिकाणी पितळेची बासरी देखील वाजवितात. बांबूच्या बासरीतून जास्त मधूर स्वर निघतो, तसा धातुच्या बासरीतून निघू शकत नाही. बांबूची बासरी विशिष्ट सुराची मिळणे कठीण असते, आणि उष्ण हवामानात ती तडकून बेसूर होते. त्यामुळे पितळेची व लाकडी बासरी अधिक वापरात आहे.

आडवी धरून वाजवायची व सरळ धरून वाजवायची – असे बासरीचे दोन प्रकार आहेत. जी बासरी आडवी धरून वाजवितात तिला मुरली म्हणतात. ती वाजवायला जरा कठीण असते. सरळ धरून वाजवताना, बासरीचा वरचा भाग डाव्या हाताने व खालचा भाग उजव्या हाताने धरण्याची प्रथा आहे. मुरली वाजवताना हीच पध्दत सोयीची असते.

आपल्या भारत देशामधे, श्री.पन्नालाल घोष हे एक महान बासरीवादक होऊन गेले. आजच्या बासरी-वादकांमध्ये अग्रणी नाव म्हणजे, पंडित हरिप्रसाद चौरसिया हे होय.

तंबोरा

tambora आपल्या भारतीय संगीतात प्राचीन काळापासून वाजवले जाणारे वाद्य म्हणजे ‘तंबोरा’ होय. हा ‘तंबोरा’ हे अगदी महर्षी नारदांच्या हातातही कायम असे.तंबोरा हे वाद्य भारतीय संगीताचे मुलभूत वाद्य आहे, असे मानले जाते.

तंबोरा या वाद्याचे तुंबा व दांडी हे दोन भाग आहेत. तंबोरा या वाद्याचे तुंबा हे प्रमुख अंग आहे. त्यामुळे या वाद्याला तानपुरा, तंबूर, किंवा तंबूरा या नावाने ओळखतात. तंबोराच्या खुंट्या, तारा, भोपळा, ब्रिज, तबली, तारदन, दिंडी, तारगहन, जोड असे विविध भाग असतात. तंबोराचा भोपळा हा गोलाकार असतो, हा आतून पोकळ असतो. भोपळ्याच्या वरील भागावर एक लाकडी तबकडी बसवतात, तिला ‘तबली’ म्हणतात. तंबोराच्या तबलिवर हस्तीदंताची किंवा रक्तचंदनाची घोडी बसवलेली असते. तबलीच्या जोडावर घोडीपासून मागील बाजूला भोपळ्याच्या खालच्या बाजूला चार छिद्रे असलेली एक हस्तीदंती पट्टी जोडतात, तिला तारदान म्हणतात. त्यातूनच तारा ओवून समांतर रेषेने ब्रिजवर टेकून खुंट्याना बांधतात. तंबोराचा दुसरा महत्त्वाचा अवयव म्हणजे ‘दांडी’ होय. ही लाकडाची दांडी साधारणपणे ३ ते ४ फुट लांब असते. तंबोराचे सांधा, अट, तारगहन, खुंट्या, मनी, निवारी-सुत असे विविध भाग आहेत.

शास्रीय गायन करताना साथ-संगत करण्यासाठी हे वाद्य प्रथम वापरतात. तंबोराकरिता चार तारा वापरल्या जातात, त्या चार तारांना वेगवेगळी नावे असतात. खर्जा, पंचरसी अशी काही नावे आहेत. तंबोराच्या तारा मधल्या बोटाने व तर्जनीने छेडायच्या असतात. त्यातून ‘स्वर’ उमटतात. तंबोरा हे वाद्य शिकण्यासाठी सतत सराव, एकाग्रता, चिकाटी हे गुण अंगी असावे लागतात. तसेच परिश्रम घेण्याची तयारी असावी लागते. तंबोरा हे वाद्य शिकण्यासाठी रियाज करताना बैठक चांगली असावी लागते. अनेक स्वरपंडीत म्हणतात की, “कलावंताची खरी परीक्षा दोन सुरेल तानपुरामध्ये जाणकार रसिकांना मंत्रमुग्ध करण्यातच असते.” जर एखाद्या कलावंताचा गायनाचा मूड नसेल; तर तानपुराचा आवाज त्याच्या कानावर पडला, कि तो कलावंत लगेच गायला तयार होतो. असा उत्साह प्रत्येकाच्या मनात निर्माण करणारे ‘तंबोरा’ हे वाद्य आहे.