दादा कोंडके हे बहुरंगी व्यक्तिमत्व

dada-kondke कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके (८ ऑगस्ट १९३२ – १४ मार्च १९९८) हे मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते होते. मराठी चित्रपटांतल्या विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेतील व सोबतच हिंदी व गुजराती भाषांतील चित्रपटांची निर्मितीही केली. प्रेक्षकांना नेमके काय हवे आहे याची चांगलीच जाण त्यांना होती. कमरेखालचे विनोद असे हिणावणारे सुद्धा त्यांचे चित्रपट मिटक्या मारत बघत / बघतात.

विच्छा माझी पुरी करा या वसंत सबनीस लिखित वगनाट्यामुळे कोंडके अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले. इ.स. १९६९ साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. सोंगाड्या (इ.स. १९७१), आंधळा मारतो डोळा (इ.स. १९७३), पांडू हवालदार (इ.स. १९७५), राम राम गंगाराम (इ.स. १९७७), बोट लावीन तिथे गुदगुल्या (इ.स. १९७८) हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट होत. ‘अपना बझार’ मध्ये काम करता करता दादा सेवादलाकडे आकर्षित झाले.

दादांचे पितासमान गुरु बाबा उर्फ भालजी पेंढारकर यांचा तांबडी माती हा त्यांचा पहिला चित्रपट. ह्या चित्रपटानंतर दादांनी कधीच मागे वळून बघितले नाही. ‘सोंगाड्या’ ही दादांची पहिली निर्मिती. हा चित्रपट खुप गाजला व त्यांचा जीवनातील मैलाचा दगड ठरला. दादांनी मराठीत एकुण १६ चित्रपटांची निर्मिती केली. विशेष म्हणजे सर्व चित्रपट रौप्यमोहोत्सवी ठरले. हा विक्रमामुळे त्यांचे नाव गिनीज बुकात नोंदले गेले. त्यांनी हिंदीत सुद्धा ४ चित्रपटांची निर्मिती केली. उषा चव्हाण ही त्यांची आवडती तारका त्यांच्या अनेक चित्रपटात नायिका होती. त्यांचा बर्‍याच वेळा सेंसार बोर्डाशी वाद झाला. त्यांचे व्यक्तिमत्व राजकीय तसेच खाजगी गोष्टींमध्ये सुद्धा वादग्रस्त राहिले.

dada-kondke दादांचा जन्म लालबागचा, गिरणी-कामगाराच्या पोटी. ८ ऑगस्ट, १९३२ रोजी, गोकुळाष्टमीच्या शुभप्रसंगी लाभलेल्या या पुत्र’रत्ना’चे कृष्णा म्हणून नामकरण करण्यात आले. पोरक्या वयातच या कृष्णाच्या लीला उसळून बाहेर येऊ लागल्या. शाळकरी वयातच त्यांना गल्लीतले ‘दादा’ म्हणून ओळखले जात असे. ही ‘बिरुदावली’ नंतर कायम राहिली. जेष्ठ बंधूंच्या अपकाली निधनामुळे घर सांभाळायची जबाबदारी आली. ‘अपना बाजार’ मध्ये दरमहा साठ रुपयाने कामावर असतानाच दादा सेवादलाच्या बँडमध्ये काम करू लागले. कलेचा नाद शांत बसू देईना, म्हणून प्रसिद्ध गाण्यांची विडंबने करणे, विचित्र गाणी रचणे, त्यांना चाली लावणे हे फावल्या वेळेतले छंद त्यांनी जोपासले. सेवादलात असतानाच त्यांची गाठ निळू फुले, राम नगरकर यांच्याशी पडली. आणि सेवादलाच्या नाटकांत दादा छोटी-मोठी कामे करू लागले. लहानपणापासून खोड्याळ (काहीसे मवाली) असलेल्या दादांनी ‘अपना बाजार’ येथे नोकरी केली. सोडावॉटर बाटल्या, दगड- विटांनी मारामारी केल्याचे दादांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. एका वर्षातच त्यांच्या कुटुंबातल्या प्रमुख व्यक्तींशी ते काळाने दुरावले व तेव्हा पासून एकटे पडलेल्या दादा कोंडकेंनी जीवन हे खेळकरपणे घालवण्याचा निश्चय केला. नायगाव परिसरात – “बॅंडवाले दादा” ह्या नावाने त्यांना लोकं ओळखू लागले. तेथेच त्यांना जीवाभावाचे मित्र मिळाले. सुपरस्टार झाल्यावरही दादा तेथे जात व जुन्या मित्र मंडळीत रमत.

dada-kondke पथ-नाट्यात आपल्या विनोदाच्या टाईमिंगवर हशा उसळवणा-या दादांचे प्रसिद्ध होणे त्यांच्या सेवादलातील साथीदारांना पाहवले नाही. ‘खणखणपुरचा राजा’ मधील गाजणारी भूमिका सोडून, सेवा दलातून फारकत घेत दादांनी स्वतःचा फड उभारला. आता शाहीर दादा कोंडके वसंत सबनिसांच्या ‘विच्छा माझी पुरी करा’ नाटकातून पुन्हा रंगभूमीवर उतरले. दादांच्या आयुष्यातील हे वळण दादांच्या आणि एकूणच महाराष्ट्राच्या भविष्यावर फार मोठे उपकार करून गेले. दादांनी परत मागे वळून कधी पाहिलेच नाही. ‘विच्छा’चे १५०० हून अधिक प्रयोग झाले. आणि दादांसारखे रत्न भालजी पेंढारककरांसारख्या पारख्याच्या नजरेत पडले.

१९६९ साली भालजी पेंढारकरांच्या ’तांबडी माती’ ह्या चित्रपटातून पदार्पण केलेल्या दादांनी मग मागे वळून बघितले नाही. जून १९७१, ‘सोंगाड्या’ प्रदर्शित झाला. सोंगाड्याला सुरुवातीला सिनेमागृह मिळत नव्हते. बाळासाहेब ठाकरे, जे तेव्हा फक्त ‘मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारे’ होते, त्यांनी सोंगाड्याला सिनेमागृहाची सोय करून दिली आणि सोंगाड्या तुफान गाजला. इतका की ब-याच सिनेमागृहांनी जेमतेम चालत असलेला देव आनंदचा ‘तेरे मेरे सपने’ उतरवला आणि सोंगाड्या लावला. महाराष्ट्राने सोंगाड्या डोक्यावर उचलून घेतला. खुद्द दादा कोंडके मिळालेल्या अभूतपूर्व यशाने भारावून गेले होते. मिळालेल्या लोकप्रियतेचा पुरेपूर वापर करून घेत दादांनी लगेच पुढल्या चित्रपटाची घोषणा केली.

dada-kondke १९७२ साली ‘एकटा जीव सदाशिव’ प्रदर्शित झाला. या चित्रपटाची हाईप इतकी झाली होती, की खुद्द राज कपूरने आपल्या पोराला लाँच करताना चित्रपटाची तारीख पुढे ढकलली आणि ‘बॉबी’ पाच महिने उशिरा प्रदर्शित झाला. असे म्हणतात की बॉबी प्रदर्शित करताना राज कपूरला सिनेमागृहांना ‘एकटा जीव सदाशिव’ उतरवण्याची विनंती करायला लागली होती. बॉबी गाजलाच, पण त्यामागोमाग आलेल्या ‘आंधळा मारतो डोळा’ने लाईम-लाईट पुन्हा दादा कोंडकेंवर आणला.

१९७५ मध्ये पांडू हवालदारच्या रुपात दादा पुन्हा पडद्यावर आले. पांडू हवालदार मध्ये दादांनी ‘अशोक सराफ’ या उमद्या कलावंताला संधी दिली. यातूनच दादांची दूरदृष्टी दिसून येते. मुंबई पोलिसांचा हा हवालदार तिकीट्बारीवर MI6 च्या एजंटला भारी पडला. पांडू हवालदारमुळे मुंबईत MGM ला The Man With The Golden Gun लावायला सिनेमागृहे मिळेनात. कधी नव्हे ते जेम्स बॉंडचा सिनेमा महाराष्ट्रात फ्लॉप गेला. त्याचबरोबर दादांचा आलेख मात्र चढत गेला.