अष्टविनायक

महाराष्ट्रातील ठिकाणे

महाराष्ट्रातील आठही मंदिरे अंतराच्या दृष्टीने जवळपास आहेत. केवळ आठ गणपतींना भेट दिल्यास दोन दिवसात अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते. पुणे जिल्ह्यात मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, व लेण्याद्री येथे पाच गणपती आहेत. तर रायगड जिल्ह्यात महाड व पाली येथे दोन गणपती असून अहमदनगर जिल्ह्यात सिद्धटेक येथे एक गणपती आहे.

स्वस्ति श्री गणनायाकम गजमुखं मोरेश्वारम सिद्धीदम |
बल्लाळं मुरुडं विनायक मढं चिंतामणी थेवरम ||
लेण्यान्द्री गिरीजात्माजम सुवरदम विघ्नेश्वारम ओझरम |
ग्रामो रांजण संस्थितम गणपती कुर्यात सदा मंगलम ||

या श्लोकात महाराष्ट्रातील आठ स्वयंभु गणपतींचा उल्लेख केला आहे. या आठ गणपतींच्या तीर्थस्थानांचे दर्शन करणे म्हणजे अष्टविनायक यात्रा. अष्टविनायक ही महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपती देऊळे आहेत.

शास्त्रोक्त पद्धतीने अष्टविनायक यात्रा अशी केली जाते-

श्री. मोरेश्वर – मोरगाव

Moreshwar श्री गणेशाचे हे आद्यपीठ होय. हे क्षेत्र भूस्वानंद भुवन म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील साडे तीन गणेश पीठांपैकी हे आद्यपी. या स्थानाचे महात्म्य मुद्गुल पुराणातील सहाव्या खंडात समाविष्ट आहे. भृशुंडी ऋषींच्या सांगण्यावरून ब्रम्हा, विष्णू, महेश, शक्ती व सूर्य या पाच देवतांनी येथे अनुष्ठान करून गणेश पिठाची स्थापना केली. या स्थानी गणेशाने मोरावर बसून सिंधू व कमलासुर दैत्याचा संहार केला. या युद्धात गणेशाचे मोर हे वाहन होते. त्यावरून येथील गणेशास मयुरेश्वर वा मोरेश्वर असे म्हणतात. येथील मंदिराची उभारणी ब्रम्हदेवाने केली. चिंचवड येथील महान गणेश उपासक श्री मोरया गोसावी यांचे हे जन्म स्थान. येथे क-हा नदीच्या पात्रात त्यांना गणेश मूर्ती सापडली. त्यांनी त्या मूर्तीची चिंचवड येथे स्थापना केली. मोरगाव क्षेत्राचे व्यवस्थापन चिंचवड देव स्थानाकडे आहे. वर्षातून दोन वेळा गणेशाची पालखी चिंचवडहून येथे येते. चारशे वर्ष पूर्वी योगींद्र महाराजांचा येथे अवतार झाला. त्यांनी येथे योगींद्र मठाची स्थापना केली व संपूर्ण भारतात गणेश संप्रदायाचा प्रसार केला. गाणपत्य संप्रदायाचे हे प्रमुख केंद्र आहे. त्यांना २२८ वर्षाचे आयुष्य लाभले. येथील त्यांची समाधी व ध्यान मंदिर दर्शनीय आहे. मयुरेश्वर मंदिरात त्यांचा सुंदर पुतळा आहे. मयुरेश्वराचे दर्शन घेताना समर्थ रामदासांनी ’सुखकर्ता दुखहर्ता’ ही आरती उत्स्फुर्तपणे रचली. येथील विजया दशमीचा उत्सव रात्रभर चालतो. उत्सवात गणेशास तोफांची सलामी दिली जाते. नंतर गणेशाची पालखी गावात मिरवली जाते व गावातील सर्वांच्या वंशावळीचे वाचन होते.

पुरंदर तालुक्यात क-हा नदीच्या तीरावर उत्तराभिमुख असे हे मंदिर आहे. भोवती तटबंदी असून मंदिराच्या चारही दिशेला चार मिनारासारखे खांब आहेत. मंदिराला पाय-या असून तेथेच नगारखाना व बाजूला पायात लाडू धरलेला उंदीर आहे. पुढे अकरा पाय-या चढून गेल्यावर एका दगडी चौथर्यावर मोठा आता काळ्या पाषाणातला, गणपतीकडे तोंड केलेला नंदी आहे. त्या नंदीपुढे मोठे, चपटी व दगडी असे कासव आहे. या कासावापुढे मुख्य मंदीर लागते. ते दगडी पाषाणातले असून तेथेही एक मोठा उंदीर आहे. मंदिराच्या गाभा-यात डाव्या सोंडेची मयुरेश्वराची मूर्ती आहे. या मूर्तीला तीन डोळे असून डोळ्यात य बेंबीत हिरे बसवलेले आहेत. मूर्तीच्या बाजूला रिद्धी-सिद्धीच्या पितळाच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या आवारात शमी, मंदार, बेल यांची वृक्ष आहेत.

स्थान : तालुका बारामती, जिल्हा पुणे, पिन.- ४१२ ३०४

अंतर : पुणे-सासवड-मोरगाव ६४, पुणे-चौफुला-मोरगाव ७७, मुंबई २२५ कि.मी.

जवळची ठिकाणे : जेजुरी-खंडोबाचे देवस्थान,

लावथालेश्वर : येथील शिवमंदिरात समर्थ रामदासांनी शंकराची आरती रचली. हे ठिकाण जेजुरीपासून दोन किलोमीटर अंतरावर आहे.

साकुर्डे : पुरातन मंदिर,

सासवड : सोपानदेवांची समाधी, पुरातन मंदिरे, आचार्य अत्रे स्मारक

बोपगाव : कानिफनाथाचे मंदिर

नारायणपूर : नारायण महाराज आश्रम व दत्तमंदिर

भुलेश्वर : प्राचीन शिवमंदिर

बेत केडगाव : श्री नारायण महाराज माठ व दत्तमंदिर

कारंजे : सोमनाथ मंदिर