रिसॉर्ट मुख्यपान

विक्रमगड रिसॉर्ट

मुंबईपासून बेताच्या अंतरावर असणारं एक निसर्गरम्य ठिकाण म्हणजे, विक्रमगड येथील रिसॉर्ट. व्यस्त दिनचर्या सांभाळूनही चार घटका सुखाच्या अगदी आरामदायी जाव्यात असं वाटत असेल तर एकदा विक्रमगड येथील रिसॉर्टला जरूर भेट द्या. वाडा-मोखाडा मार्गावरती ही जागा आहे. या रिसॉर्टला गावाचेचे म्हणजे 'विक्रमगड' रिसॉर्ट असे नाव दिलेले आहे. हे एक शांत, कुणालाही आवडेल असे ठिकाण आहे. हे ठिकाण श्री. दिवेकरांनी डेव्हलप केले आहे. फुलांचे 'ग्रीन हाऊस', जरबेराच्या फुलांचे मोठमोठे ताटवे परिसराची शोभा वाढवतात. खुली हवा, मोकळा परिसर यामुळे काही क्षणांतच चित्तवृत्ती प्रसन्न होतात. इथे जाण्यासाठी योग्य सीझन म्हणजे, पावसाळा. पावसाळयात या ठिकाणी सगळं हिरवंगार वातावरण असतं. पाण्यात मोठमोठी बदकं सोडली आहेत. निरनिराळया प्रकारची झाडं इथे लावली आहेत. चिंतन-मनन करण्यासाठीसुध्दा ही चांगली जागा आहे. गप्पांचा किंवा एकत्र येण्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी वरिष्ठ नागरिकांना बसायला इथे मंडप केला आहे.

इथे टारझन जंप नावाचा एक गमतीशीर प्रकार आहे. कृत्रीम दोरीच्या साहाय्याने या किना-यावरून त्या किना-यावर उडी मारण्याची सोय केली आहे. मध्ये भलीमोठी घळ असून त्या घळीवरून टारझनसारखे या किना-यावरून त्या किना-यावर जाताना वडाच्या पारंब्यांची वर्षानुवर्षं जाणवलेली कमी काही प्रमाणात तरी भरून निघते.

विक्रमगडच्या ७ किमी. अलिकडे सजन पार्क म्हणून एक विश्राम जागा दिवेकरांनीच डेव्हलप केली आहे. या ठिकाणी झाडांवर झोपडया बांधलेल्या आहेत. ट्री-हाऊसचं स्वप्नंच जणू इथे साकार होतं. या ट्री-हाऊसच्या आवारात जेवणासाठी मंडप आहे. या मंडपामध्ये जेवण, नाश्ता असं सर्व काही मिळतं. जेवण व नाश्त्यामध्ये देखील 'बफेट्' ची सोय आहे. गुलाबजाम, जिलबी असे त-हेत-हेचे प्रकार उपलब्ध करून देतात. शिवाय चायनीज भेळ वगैरे विविधता देखील असते. 'सजन पार्क'मध्ये हॅमॉक्स (दोन झाडांच्या बुंध्यांचा आधार घेऊन लटवकलेले दोरीचे किंवा इलॅस्टिकचे आरामदायी झुले) लावले आहेत. जेवण व इतर सोयी सुविधा पाहता हे ठिकाण तसं खूप महागडं नाही, पण स्वस्त देखील नाही. मराठमोळया पध्दतीचं जेवण, चायनीज, कॉन्टिनेंटल असे आहाराचे सर्व प्रकार इथे उपलब्ध आहेत. डाळी उसळी यांचा सुयोग्य वापर केल्यामुळे इथलं जेवण पौष्टिक, रूचकर असतं. सगळया स्वयंपाकाची व्यवस्था सौ. दिवेकर स्वत: जातीनं पाहतात. शाळेच्या अनेक सहली इथे येतात. मुलांच्या आवडीप्रमाणे नाश्ता वगैरेची सगळी सोय करतात.

आधुनिक सुखसोयी व निसर्गाचा सहवास यांचा सुंदर मेळ असल्यामुळे विक्रमगडची रिसॉर्टस् मला फार आवडतात. कोजागिरी, कवी-संम्मेलने, काही घरगुती छोटेखानी कार्यक्रम यांसाठी देखील हे ठिकाण निवडता येईल. माझे आई-वडील, प्रेमळ शिक्षक, अभिनयाच्या वाटचालीत भेटलेली बुजुर्ग, आपणहून फोन करणारे आप्तजन या सा-याना घेऊन एखाद्या गुरूपौर्णिमेला विक्रमगडच्या रिसॉर्टवर जाण्याची माझी इच्छा आहे.

संपदा जोगळेकर

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF