मंदिरे/तीर्थक्षेत्रे मुख्यपान

तुळजाभवानी देवी - तुळजापूर

tuljabhavaniभारतातील शक्तिदेवताच्या पीठापैकी साडे तीन पीठे महाराष्ट्रात आहे. त्यातील श्री क्षेत्र तुळजापूर हे पूर्ण व आद्यपीठ मानले जाते. महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले तुळजापूर हे महत्वाचे तीर्थक्षेत्र असून त्याठिकाणी तुळजाभवानी देवीचे प्राचीन मंदिर आहे. तुळजाभवानी देवीची महती तशी हिंदू पुराणातून खूपच विस्ताराने सांगितली गेली आहे. त्या माहितीनुसार असुरांचा, दैत्यांचा संहार करून विश्वात नीती व धर्माचरण यांची पुनर्स्थापना करण्याचे महत्त्वाचे कार्य तुळजाभवानी देवीने प्रत्येक युगामध्ये केले आहे.

स्वराज्य स्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज, भोसले घराण्याची ही कुलदेवता आहे. तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली होती. देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती, अशी आख्यायिका आहे.

देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगरमाथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्यावर देखील या मंदिराचा कळस दिसत नाही. मंदिराच्या काही भागाची बांधणी हेमाडपंती आहे. महाराष्ट्रात या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रीचा उत्सव जरी नऊ दिवसांचा असला तरी तुळजापूरला मात्र, हा उत्सव एकूण एकवीस दिवस चालतो.

तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेस होते. तत्पूर्वी देवीचे धार्मिक उत्सव भाद्रपद वद्य नवमीस सायंकाळपासून सुरू होतात. देवीची प्रत्यक्ष मूर्तीची शेजघरातील निद्रा वद्य नवमीस सायंकाळी सुरू होते. नवरात्रापूर्वी देवीची शेजघरातील निद्रा असते. या विधीस मोठे महत्त्व आहे. तसेच नवरात्रात प्रतिपदा ते अष्टमी कालावधीत रात्री भवानी मातेचा जागर होतो. प्रशाळपूजेनंतर देवीला विड्याच्या पानाचे घर बांधण्यात येते. नवमीला घटस्थापन करण्यात येते. दशमीला देवीचे पहाटे सीमोल्लंघन होते.

तुळजापूरस्थित भवानी मंदिराच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत चांगली व्यवस्था लावून मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. भवानी मातेचे मंदिर खोलगट भागात आहे. मंदिराकडे जाण्यासाठी उताराचा रस्ता आहे. या मंदिरात प्रवेश करताच डाव्या हाताला तीर्थकुंडे आहेत. एकशे आठ झ-यांचे उगमस्थान असणारी ही तीर्थकुंडं कल्लोळतीर्थ व अमृतकुंड या नावांनी ओळखली जातात. मंदिराच्या उजवीकडे गोमुख तीर्थकुंड आहे. भाविक मंदिरात प्रवेश केल्यावर या सर्व देवतांचे दर्शन घेत दत्तपादुकांजवळ येऊन पोहोचतात. गाभा-याजवळील गणेश मूर्तीचे दर्शन करून तुळजाभवानीच्या मुख्य निंबाळकर दरवाजामधून देवीच्या मंदिरात प्रवेश केला जातो. गणेशमूर्तीच्या पाठीमागे मार्कंडेय ऋषी आहेत. उजवीकडे तुळजाभवानीचा नगारखाना आहे. त्यानंतर गाभा-या समोरील पाच पाय-या उतरल्यानंतर देवीचे होमकुंड आहे. होमकुंडाचे मंदिर पुरातन हेमांडपंती पध्दतीचे आहे. होमकुंडावर उजव्या बाजूस टेकून गणेशमूर्ती आहे. होमकुंडाच्या पायाशी भैरवाची मूर्ती आहे.

नवरात्रीच्या काळात भक्त राज्यभरातून ठिकठिकाणांहून पायी पालख्या घेऊन येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी चरणी अर्पण केलेली सोन्याच्या पुतळ्याची माळ आजही देवीच्या मुख्य अलंकारांपैकी एक आहे. श्री तुळजाभवानी ही आदिशक्ती म्हणून सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF