गुहा/लेंणी मुख्यपान

ठाणाळ लेणी

अष्टविनायकांमध्ये स्थान प्राप्त झालेला पालीचा बल्लळेश्वर सरगडाच्या पायथ्याशी एका प्रशस्त देवालयात विराजमान झालेला आहे. रायगड जिल्ह्यात व मुधागड तालुका असलेले हे गणेशालय उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. पण याच पाली गावाच्या वायव्येस अवघ्या २६ किमी अंतरावर असलेली ठाणाळ लेणी भटक्या मंडळीच्या शिवाय इतर कोणालाही फारशी माहित नाहीत.

ठाणाळ लेणी नाडसूर(नाद्सुर) या नावाने देखील परीचित आहेत. तेवीस लेण्याचा हा समूह सर्वप्रथम मराठी मिशन मुंबई यांनी इ.स.१८९० मधील जानेवारी महिन्यात जाऊन पाहिला आणि सुप्रसिद्ध पुरातत्व तज्ञ हेनरी कझिन्स यांच्या संशोधक नजरेसमोर आणला. इ.स १८९० मध्ये कझिन्सने ठाणाळे लेण्यांना भेट दिली आणि इ.स.१८११ मध्ये त्याने "Caves at Nadasur and Kharasamla" ही पुस्तिका प्रकाशित केली.खडसामला लेणी समूह ठाणाळयाच्या दक्षिणेस अवघ्या ९ किमी अंतरावर असून तो नेणावली या नावाने ओळखला जातो ठाणाळ या शब्दामधील ठाण म्हणजे स्थान आणि स्थानाचा अर्थ ’पूजास्थान ’ असा केला जातो. यातील ’ठ’ हे अक्षर स्थानवाचक आहे.

ठाणाळयाच्या उल्लेख प्राचीन ग्रंथात आढळत नाही. पण कोरीव लेण्यातील एका शिलालेखात ठाणाळयाच्या ओझरता उल्लेख आहे. नाशिक जवळ असलेल्या पांडवलेणी समूहातील तिस-या क्रमाकांच्या लेण्यातील ब्राह्मी शिलालेखेत दुस-या ओळीत गौतमी पुत्र सातकर्णी याने जिंकून घेतलेल्या प्रदेशांचा उल्लेख आहे. त्यात विझ, छवत, परीचात, सह्य, कणहगिरी, मंच, सिरीटन, मलय, महद इत्यादी पर्वतांचा पती म्हणून गौतमीपुत्र उल्लेख येतो. जर त्यांचा भौगोलिक क्रम पाहिला तर दक्षिणेला ठाणाळयाचा डोंगर असून चौलहून वाघजाई घाटातून जाणारा मार्ग या लेणी समूहाच्या जवळून जातो. विझ म्हणजे विंध्य, छवत म्हणजे ऋक्षव्रत किंवा सातपुडा, परीचात म्हणजे पालिताना किंवा अबू पर्वत, साह्य म्हणजे सह्याद्री,काणहगिरी म्हणजे कान्हेरी, मंच म्हणजे राजमाची या क्रमाने दक्षिणेकडे सिरीटन येतो आणि त्यामुळे त्याची भौगोलिक स्थान निश्चिती ठाणाळयाच्या डोंगर अशी करता येणे अगदी शक्य आहे. ठाणाळे लेणीसमूहात एकूण चार श्री च्या म्हणजे लक्ष्मी देवीच्या प्राचीन प्रतिमा असल्यामुळे हे स्थान सर्वात जुने स्थान शक्यता आहे.

ठाणाळे येथील लेणी समूहातील सर्व लेणी पश्चिमभिमुख आहेत. या बौद्ध लेण्यांमध्ये एक चैत्यगृह, एक स्मारक स्तूप व एकवीस निवासी गुंफा आहेत. इ.स.वी.सन पूर्व दुस-या शतकात ठाणाळे लेण्याची निर्मिती केली या लेणीच्या दर्शनासाठी दक्षिणेकडून जावे लागते.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF