थंड हवेची ठिकाण मुख्यपान

सापुतारा

गुजरातच्या दक्षिण  सीमेवर डांग  जिल्ह्यात सह्याद्री पर्वताच्या रांगामध्ये  वसलेले  हिलस्टेशन  म्हणजे  'सापुतारा'. सापुतारा समुद्रसपाटीपासून  ३६०० फूट उंचीवर आहे. शुध्द आणि थंड हवा असल्याने पर्यटक येथे उन्हाळ्यात गर्दी करतात.

नाशिकहून सापुता-याला जातांना वळवळांचा, घाटाचा रस्ता असल्याने मजा येते.  सापुतारा सर्कल वरून थोडं चालत गेल्यास गांधी शिखर लागते येथे सनसेट पॉईंट आहे . इथून दिसणारा सूर्यास्त एक अविस्मरणीय  अनुभव आहे.  सूर्योदय पाहण्यासाठी लोकं आवर्जून सरदार शिखरावर जातात.  खो-याच्या मध्यवर्ती भागात टेकड्यांनी वेढलेला  ७० फुट खोल तलाव येथील आकर्षण आहे. या तलावात बोटिंग करण्याचा  आनंद ही पर्यटकांना घेता येतो. डांग जिल्ह्यातील  रहिवासी असलेल्या लोकांची  जीवनशैली, परंपरा, दाग-दागिने, संगीत-वाद्ये, घरे अशी संस्कृती जपणारे संग्रहालय पाहण्यासारखे आहे. विविध गुलाबाची फुले असलेले रोझ गार्डन तसेच पाय-यांची रचना असलेले स्टेप गार्डन ही पाहण्यासारखे आहे. ऋतभरा विश्वविद्यालयापुढे असलेल्या एको पॉईंच्या पठारावर खेळायला मजा येते. जातांना वाटेत तुम्हाला भरपूर लालचुटूक स्ट्रॉबेरीज खायला मिळतात.

कसे जाल?

नाशिक ते सापुतारा हे अंतर साधारण ७७ कि. मी आहे. नाशिकहून दिंडोरी - वणी - बोरगाव मार्गे २ तासात सापुता-याला पोहोचता येते. तेथे बसेसची सोय आहे तसेच खाजगी वाहनाने ही जाता येते.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF