सप्तश्रृंगी देवी वणी


हिंदू पंचागांप्रमाणे साडेतीन मुहूर्त महत्वाचे आहेत. गुढीपाडवा, दसरा, दिवाळीचा पाडवा व अक्षयतृतीया. तसेच महाराष्ट्रातील देवींची पुढील प्रमाणे साडेतीन पवित्र स्थाने प्रसिध्द आहेत. तुळजापूरची तुळजा भवानी, कोल्हापूरची अंबाभवानी, माहूरची कुलस्वामीनी ही तर भाविकांच्या श्रध्देची स्थाने आहेत. साडेतीननावे पवित्र क्षेत्र सप्तश्रृंग गडाची देवी भगवती, महाराष्ट्रातील श्रध्दाळूंचे हे जागृत दैवत नाशिकपासून ५५ किलोमीटर्स दूर आहे. नांदूरी गांव सप्तश्रृंग गडाच्या पायथ्याशी आहे. वर जायला ११ किमी. चा रस्ता घाटातून जातो. ज्या गडावर देवीचे देऊळ आहे. त्या गडाला सात शिखरे आहेत. सप्तश्रृंगीगड निवासीनी म्हणून भगवतीचा उल्लेख होतो. देवीच्या समोर मार्कंडेय ऋषींचा डोंगर उभा आहे. सप्तश्रृंग गडावर अनेक औषधी वनस्पती व पवित्र कुंडे आहेत. रामायणातील एका ऋचेनुसार हनुमानाने याच डोंगरावरून जखमी लक्ष्मणाच्या उपचारासाठी एक मुळी नेली होती. वणीच्या गडावर शिवालय तीर्थ, शीतला तीर्थ, व कोटी तीर्थ अशी एकूण १०८ पवित्र कुंडे आहेत.

प्रचंड शीतकडा

Sheetakadaतीर्थाच्या पुढे एक प्रचंड दरी शीतकडा म्हणून उभी आहे. ती सुमारे १५०० फूट खोल असावी. एका सवाष्णीने ‘मला पूत्र होऊ दे भगवती, मी कडयावरून बैलगाडीत बसून उडी घेईन’ असा नवस देवीस केला होता. देवीच्या कृपेने तिला पुत्रप्राप्ती झाली. त्या स्त्रीने आपल्या पुत्रासह बैलगाडीत बसून शीतकडयावरून खोल दरीत उडी घेतली. या बैलगाडीच्या चाकाच्या खुणा अजुनही शीतकडयावर पाहता येतात. हा प्रसिध्द शीतकडा समुद्र सपाटीपासून ४६३८ फूट उंच आहे. वणीच्या देवीच्या मंदिरात जाण्यासाठी ४७० पाय-या चढून जाव्या लागतात. इ.स. १७१० मध्ये या पाय-या उमाबाई दाभाडे यांनी बांधून घेतल्याची नोंद आहे.

देवीची मूर्ती

Saptashrungidevi Temple Vani सप्तश्रृंगी देवी खानदेशी देवी म्हणून प्रसिध्द आहे. विशेषत: चाळीसगाव, जळगाव, मालेगाव व धुळे या भागातून भाविक फार येतात. मंदिरात उच्चासनावर उभी असलेली देवीची मूर्ती नऊ फूट उंच आहे. तिला १८ हात आहेत. ती पाषाण मुर्ती स्वयंभू आहे. पाणीदार नेत्र, सरळ पण किंचीत कललेली मान, आठरा हातात आठरा विविध आयूधे असा देवीचा थाट आहे. ४७० पाय-या चढल्याचे देवीच्या प्रसन्न दर्शनाने सार्थक होते. हात नतमस्तक होऊन आपोआप जोडले जातात. दर पौर्णिमेला व नवरात्रात येणा-या भविकांनी गड गजबजून जातो. चैत्री पौर्णिमेला सुमारे एक लाखाच्या वर भाविक गोळा होतात. मोठी यात्रा भरते. जत्रेचा आनंद भक्तगण लुटतात. देवीचा गाभारा ओटीचे खण, नारळ व साडयांनी भरून जातो. महिषासुराचा वध करण्यासाठी मार्कंडेय ऋषींनी यज्ञ केला होता. त्या यज्ञातून देवी प्रकट झाली होती. सिंहासनावर आरुढ झालेल्या देवीच्या अठरा हातात निरनिराळी अस्त्रे होती. तिने त्या राक्षसाचा नि:पात केला. म्हणून या देवीला ‘महिषासूरमर्दिनी’ असेही म्हणतात.

ध्वज महात्म्य चतुर्दशीला मध्यरात्री १२ वाजता भगवतीच्या देवळावर ध्वज फडकला की भाविकांची दर्शनासाठी रीघ लागते. ध्वज फडकविण्याचे काम कळवण तालुक्यातील एका गवळी घराण्याकडे आहे. ध्वज नेणारा कोठून, कसा जातो, एवढया उंचीवर ध्वज कसा लावतो व त्याचे नवे कोरे कपडे कसे फाटतात याचे त्यालाही आकलन होत नाही. सप्तश्रृंगी मातेचा ध्वज नेहनी उत्तरेकडे फडकत राहतो. स्वामी प्रकाशानंद सरस्वती यांनी धर्मशाळेसमोर बांधलेल्या होमकुंडात नवचंडी, शतचंडी आदि यज्ञ होतात. देवीसमोर भक्तांचा गोंधळ चालू असतो. भगवती नवसास पावते म्हणून भक्तांचा सतत ओघ येथे येतो. विशेषत: पुत्रप्राप्तीसाठी स्त्रीया नवस करतात. तसेच इतर पिडा टळावी म्हणून देवीला सांकडे घालतात.

Saptashrungidevi Vani नवीन सुविधा गेल्या पाच वर्षात सप्तश्रृंग गडाचा कायापालट करण्यात आला आहे. पाय-यांवर छप्पर आले आहे तर आजूबाजूला कठडे बांधण्यात आले आहेत. वर जायचा व यायचा रस्ता वेगवेगळा आहे. वर चढतांना दम लागल्यानंतर थांबायला विश्रांतीसाठी जागा तयार करण्यात आल्या आहेत. धर्मशाळेत उतरण्याची चांगली सोय आहे. गाद्या व ब्लकेटस् पुरविली जातात तर नाममात्र किंमतीत जेवण्याची सोय ट्रस्टने केली आहे. सप्तश्रृंग गडावर एक छोटे नगर वसले गेले आहे. पाण्याची नवी टाकी तयार करण्यात आलेली आहे तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने निवासासाठी खास विश्रामगृहे बांधली आहेत. देवीची फोटो, पुस्तके, प्रसाद तसेच पुजेचे साहित्य या सर्व गोष्टी लगेच मिळतात. पूजा सांगायला तसेच विविध विधी करायला पुरोहीत वृंद हजर असतो. घरगुती जेवणही गुरुजींकडे मिळू शकते. एकूण काय भक्त मंडळी प्रसन्न होऊनच परत जातात.