मंदिरे/तीर्थक्षेत्रे मुख्यपान

नरसिंहवाडी

पुरातन काळी इथे घनदाट जंगल होते. नरसिंह सरस्वती स्वामी हे भगवान दत्ताच्या १६ व्या अवतारांमधील एक. कुरूंदवाड ही त्यांच्या तपश्चर्येची जागा. इ. सन १०३४ ते १९८२ या दीर्घ कालावधीमधे, रामचंद्र योगी, नारायण स्वामी, मौनी महाराज, टेंबे स्वामी, महादबा पाटील या तपस्वी जनांच्या समाधी 'वाडी' येथे बांधल्या गेल्या. हया ठिकाणी कृष्णा-पंचगंगेच्या संगमावरती असलेल्या मंदिरास ५०० ते ६०० वर्षांची परंपरा लाभली आहे.

नित्य उपासनेमधे सोन्याचा मुकुट मूर्तीला घालून, पाने ग्रहण करण्याचा विधी असलेली, रोज पहाटे होणारी 'महापूजा' पाहण्यासारखी असते. चातुर्मास वगळता रोज रात्री देवाच्या पालखीची मिरवणूक निघते. हया मिरवणूकीच्या पूर्वी निरनिराळया मंत्रांचे उच्चारण होते, तेंव्हाचे मंगल, धार्मिक वातावरण प्रभावशाली असते.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या 'भक्त मंडळा'मार्फत, हया मंदिराची सर्व व्यवस्था ठेवली जाते. दत्त संप्रदायाच्या वस्तूंची दुकाने तसेच मिठाईची दुकाने नरसिंहवाडीला आहेत. पैठण प्रमाणेच या ठिकाणचा घाट देखील संत एकनाथांनी बांधून घेतला. कान्यगत अवसर असताना, तसेच प्रत्येक पौर्णिमेस इथे जत्रा भरते. हे ठिकाण कोल्हापूरपासून, ४० किमी. वर आहे. आदिलशहा भाविक होता, व त्याने अनेक भू-भाग दान केल्याविषयी माहिती इथे सापडते. दरवर्षी १० लाख भाविक या जागेस भेट देतात. इथे ग्राम पंचायत असून, दळणवळणाची सुविधा आहे.

त्रयंबोली मंदिर

करवीरच्या पूर्वेकडे एका उंच टेकडीवर, रम्य मंदिरामधे वास करून देवीने अनुग्रह दिला आहे. जवळच 'तर्क-तीर्थ' नावाचे कुंड होते. आजही ते थोडे फार वापरात आहे. 'टाकळ' हे त्याचे अलिकडचे नाव. मूळचे मंदिर लहान असून, आतील मूर्ती स्वयंभू आहे. काळया पाषाणातील ही मूर्ती चतुर्भुज आहे. येथली मूर्ती, महालक्ष्मी मंदिर ाकडे पाठ करून आहे. 'त्रयमाली' हे या देवीचे दूसरे नाव आहे. अनेक करवीर वासीयांचे हे श्रध्दास्थान आहे. मंदिराच्या पायऱ्यांवर जलधारांचा अभिषेक करण्याचा धार्मिक विधी या ठिकाणी दर आषाढ महिन्यात मोठया उत्साहाने पार पडतो. जवळच यमाई मंदिर आहे. देवस्थान कमिटीने छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारला आहे. या मंदिराची चोख व्यवस्था गुरव कमिटी ठेवते.

कात्यायनी देवी मंदिर

एक आकर्षक ठिकाण: नानाविध प्राचीन मंदिरांमुळे कोल्हापूर हया श्री. क्षेत्राचा एक विवक्षित सांस्कृतिक प्रभाव आहे. देवी महालक्ष्मीच्या रक्षणार्थ महालक्ष्मी मंदिरासभोवती, इतर देवतांची मंदिरे सुरवातीला स्थापन केली गेली. पूर्वेकडे सिध्द बटुकेश्वर, पश्चिमेकडे त्रयंबोली, उत्तर दिशेला ज्योर्तिलिंग तर दक्षिण दिशेला कात्यायनी. 'करवीर माहात्म्या'मधे हया देवतेचा उल्लेख आहे.

फार प्राचीन काळी कोल्हासूर राक्षसाने रक्तबीज नामक दैत्याला प्रस्तुत परिसराच्या रक्षणार्थ, इथेच ठेवले. या दरम्यान कोल्हासूराविरूध्द महालक्ष्मीने युध्द पुकारले आणि, रक्तबीजाचा नि:पात करण्यासाठी तिने भैरवाला पाठविले. पण त्याच्यावर वार करताक्षणी, त्याच्या रक्तातून अनेक दैत्य उत्पन्न होऊ लागले. त्यामुळे भैरव निष्प्रभ ठरू लागला. लगेच देवी महालक्ष्मीने कात्यायनीला पाठविले. तिने अमृत कुंड घडविला. रक्तामधून निर्माण झालेले भासमान दैत्य तिने त्या कुंडामधे ठेवले. भैरवाच्या सेनेचे पुनरूज्जीवन करून, कात्यायनीने रक्तबीजाचा नाश केल्याचा उल्लेख पुराण कथेमध्ये सापडतो. शिकारी, स्वाऱ्या इ. प्रसंगी, छत्रपती शाहू, राजाराम, व आक्कासाहेब या मंदिराला भेट देत असत, असे दफ्तरी बाडामधील ऐतिहासिक नोंदींवरून लक्षात येते. थकलेल्या, रोजच्या कटकटींनी ग्रासलेल्या कोल्हापूरवासियांसाठी, हे मंदिर म्हणजे, एक विसाव्याचे, विरंगुळयाचे रमणीय ठिकाण ठरते.

kolhapurdistrict.org च्या सौजन्याने

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF