नदी/तलाव मुख्यपान

नाढाळ तलाव

'मनगटात ताकद, हातात दुधारी तलवार आणि पायाखाली परीच्या दातासारखा शुभ्र अबलख घोडा, असा जर योध्दा असेल तर त्याला फक्त यशाचाच स्पर्श होणार...'- जी. ए. कुलकर्णींच्या समर्थ लेखणीतून उतरलेलं हे वाक्य. आणि याच धर्तीवर मनात नवा प्रदेश पाहण्याचं अपार कुतुहल, पाठीवर भरलेल्या पाठपिशव्या आणि एक कॅमेरा व दुर्बिण असेल तर त्यालाच पर्यटनाचा आनंद लाभणार असं अनिवारपणे म्हणावसं वाटतं. पर्यटन वेडयांसाठी महाराष्ट्र हा असाच एक रसरसलेला, नवनव्या जागांनी सजलेला अनोखा प्रांत आहे.

अनादी काळापासून ते आजपर्यंत आपण प्रवासात किंवा ट्रेकिंगमधे 'ब्रेक' घेत असू तर तो पाण्याच्या कोणत्याही स्वरूपातील साठयाच्या परिसरात. पायपीट करता करता घटकाभर विश्रांती ही पाण्याचं थंड सान्निध्य असल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. भले तो ओढा असो, धबधबा असो समुद्र किंवा नदी असो किंवा एखादा रमणीय तलाव असो.

दोनचार बलदंड माणसांसोबत एखादी १८ वर्षांची युवती दिसली तर कसं वाटेल, तसंच मला नाढाळ तलाव पाहिल्यावर वाटलं. बाजूला प्रबळ व इर्शाळगड असे बळकट किल्ले आणि पायथ्याशी सुंदर आणि छोटासा नाढाळ तलाव. काहीजण झोपेतून नुकतेच उठल्यावरही सुंदरच दिसतात. (आणि काही मेकप करूनही हिडिंबेसारखे) तसंच काहीसं नाढाळ तलावाने दर्शन दिल्यानंतर वाटलं.

मुंबई-पुणे महामार्गावर मुंबईपासून पुढे पनवेलपर्यंत (आपल्या वाहनाने जास्त श्रेयस्कर) आलात की तसेच पुढे व्हा. थोडे किमी. गेल्यावर डावीकडे गांधी टोपीसारखा आकार धारण करणारा ईशाळगड सोबत करीत राहतो. पनवेलपासून चौककडे येऊ लागलात की चौक फाटयाच्या अलिकडे अदमासे एक किमी. वर एक रस्ता डावीकडे फुटतो. डावीकडे हाय वे लगतच 'नाढाळ गाव' अशी पाटी आहे. डाव्या बाजूस जाणाऱ्या या कच्च्या रस्त्याने अंदाजे दोन-एक किमी. वर रस्ता थांबतो. येथेच तलावाची भिंत आहे. (बांध) वाहने येथे ठेवून तलावाच्या भिंतीवर चढून आलात की साक्षात ही निसर्गसौंदर्यवती आपल्याला दर्शन देते.

समोरच तलावाचा दुसरा काठ आणि मागे वडीलधारी व्यक्ती उभी राहावी तसा ईशाळगड! ईशाळगडाच्या पायथ्याच्या तलावाच्या त्या बाजूस चांगली झाडी आहे. आजूबाजूचे गावकरी आपल्या गुरांना पाणी पिण्यासाठी बांधाच्या उजवीकडील वाटेने तलावावर आणतात. याच वाटेने उतरून ईशाळगडाच्या पायथ्याजवळ चालावयास लागावे. आल्हाददायक हवा, वाऱ्याचा खेळ, पाण्याचा उत्फुल्लपणा आणि काठावरच्या पक्षांचा किलबिलाट यामुळे शिणलेल्या मनाला जो काही उत्साह येतो, त्याचे वर्णन शब्दांत करता येणार नाही.

इथे रॉबिन साळुंक्या, डोमकावळे, बुलबुल बरेचसे कोतवाल आणि वेडे राघू या पक्षांव्यतिरिक्त टिटवी, हेरॉज, असंख्य बगळे, असे पाणपक्षीही मुबलक पाहायला मिळतात. तलावाच्या या तीरावर जंगलात असल्याचा संपूर्ण आभास निर्माण होतो. पावसाळयात व हिवाळयात ही झाडी जरा जास्तच लोभसवाणी असते. रात्री पाण्यावर आलेल्या जंगली जनावरांच्या पाऊलखुणा काठावरच्या चिखलात उमटलेल्या असतात. याशिवाय बाजूच्या झाडोऱ्यात असंख्य हुप्पे वानर पाहायला मिळतात. माकडे हा आधीच एक चौकस प्राणी असल्याने आपण त्या तीरावर पोहोचताच बाजूची सर्व झाडे माकडांनी फुलून जातात. जेवणखाण बरोबर नेले असल्यास कृपया या तीरावर ते डबे सोडण्याच्या फंदात पडू नका.

नाढाळ तलावाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे, येथे बऱ्याच रंगाची फुलपाखरे व कीटक पाहायला मिळतात. त्यामुळे फोटोग्राफीचीही हौस पुरी करायची असेल तर नाढाळसारखी जागा नाही. चौक फाटयापासून येथपर्यंत चहा-फराळाची सोय नाही. परंतु पुण्याला जात असाल तर तासभर विश्रांती घ्यायला येथे वाट वाकडी कराच.

जगाच्या एका कोपऱ्यात असल्यासारखी शांतता, समोर ईशाळगड व नाढाळ तलावाच्या पाण्यात त्याचे नितळ प्रतिबिंब. बऱ्यापैकी जंगल आणि मन:शांतीचा गाढ अनुभव घ्यायचा असेल तर या अलौकिक सुंदर जागेवर यायचा संकल्प कराच!

प्रसाद टिळक

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF