मंदिरे/तीर्थक्षेत्रे मुख्यपान

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर

अनेक पुराणांमधे श्री. महालक्ष्मीचा उल्लेख आढळतो. जवळपास ४० किलो वजनाच्या मौल्यवान पाषाणाचा वापर करून देवीची मूर्ती बनविली आहे. हा पाषाण हिरक कणांनी मिश्र आहे. त्यातून मूर्तीचे पुरातनत्त्व सिध्द होते. मूर्तीचे आकारमान शिवलिंगाशी मिळते जुळते आहे. देवीची मूर्ती एका चौकोनी दगडावर उभी असून त्यात वालुका तसेच हिरक सापडतात. श्री. महालक्ष्मी मूर्तीच्या मागे सिंह प्रतिमा आहे. मध्यभागी सहाजिकपणे पद्मरागिणी आहे. देवीची मूर्ती चतुर्भुज आहे. वरच्या दोन हातांमध्ये तिने बांबूची ढाल व तलवार धारण केली आहे, तर म्हाळूंगाचे फळ खालच्या उजव्या बाजूच्या हातात तर डाव्या हाती पानाचे तबक धरले आहे. मूर्तीच्या डोक्यावर मुकुट आहे. मुकुटावर, भगवान विष्णुची बैठक असणारा फणाधारी शेषागं आहे. हा शेषांग ५ ते ६ वर्षांपूर्वीचा आहे, असा संशोधकांचा कयास आहे. इ. सन. पूर्व १००० पासून मौर्यांची राजवट होती. तर इ. सन. ३० पासून राजा कर्णदेव कोकणातून कोल्हापूरास आला व राज्यकर्ता झाला. त्याकाळी एका छोटया मंदिरामधे ही मूर्ती होती.

कर्णदेवाने आजूबाजूचे जंगल तोडले वे हे मंदिर उजेडात आणले. १७ व्या शतकानंतर, अनेक रथी-महारथींनी या मंदिरास भेट दिली व त्यानंतर हया मंदिरास प्रसिध्दी लाभली. श्री. महालाक्ष्मी ही अखिल महाराष्ट्राची देवता बनली. कोल्हापूरास देवस्थानाचे महत्त्व प्राप्त झाले. या परिसरामधे जवळपास ३५ लहानमोठी देवळे असून, एकंदर २० दुकाने आहेत. हेमाडपंती शैलीने बांधलेल्या या मंदिराचे ५ कळस आहेत. 'गरूड मंडप' हा या मंदिराला लागूनच जोडलेला मंडप आहे.

रात्रौ ठीक १० वाजता देवीची शेजारती होते, त्यावेळी देवीला दूध-साखरेचा नैवेद्य दाखवतात. देवीच्या शयनगृहात आरती होते, व त्यावेळी 'निद्राविध' गीते गातात. त्यानंतर दिनक्रम संपवून, प्रमुख आणि उपदरवाजे बंद करतात. दिवसातून एकंदर ५ वेळा देवीची आरती करतात. तसेच महाकाली, मातुलिंग, श्री. यंत्र, महागणपती आणि महासरस्वती यांची सुध्दा आरती व नैवेद्य करतात. दर मंगळवारी व शुक्रवारी आरतीला भाविकांची गर्दी वाढते. मंदिराच्या आवारातील सर्व लहान-मोठया ८७ देवालयांमधे आरती होते. काही भाविक एकापेक्षा जास्त आरती सोहळयांना हजर राहतात. प्रत्येक आरतीला सरासरी १८३ भाविक असतात. आकारती व पंचारती करताना चांदीचा दिवा वापरतात, तर कापूर-आरती करताना, पितळेचा दिवा वापरताता. महालाक्ष्मी मंदिराच्या दैनंदिन आचार विधींमधे, आरती ही सर्वात महत्त्वाची आहे. रोज पहाटे ४ वाजून ३०  मिनीटांनी मंदिर उघडल्यावर, मूर्तीची पाद्यपूजा झाल्यावर, काकडारती करतात. यावेळी भूप रागातील गीते म्हणतात. सकाळी ८ वाजून ३०मिनीटांनी, महापूजा झाल्यावर 'मंगल-आरती' करतात. सकाळी ११.३०  वाजता देवीला सुवासिक फुले, कुंकुम वाहतात. तेवणारा कापूर देवीसमोर धरून तिला नैवेद्य दाखवतात. भाविकांमार्फत कोणी महापूजा घातली नसेल तर, (दूध, दही, साखर, तूप व मधाच्या) पंचामृताऐवजी दूधाने देवीची पाद्यपूजा करतात. दूपारी २ वाजेपर्यंत ही प्रक्रीया सुरू राहते. त्यानंतर अलंकारांसहीत देवीची पूजा करतात. मंदिराच्या अंतर्गृहात वेदातील मंत्रोच्चारण होते. संध्याकाळी ७.३०  वाजता, दुमदुमणा-या घंटानादाच्या साक्षीनं देवीची आरती होते. याला भोग आरती म्हणतात. दर शुक्रवारी रात्री देवीला नैवेद्य दिला जातो. आरती नंतर देवीचे अलंकार पुन्हा देवस्थानच्या खजिन्यात जमा करतात.

मंदिरातील हया नित्याच्या आरत्यांव्यतिरिक्त, त्रयंबूली जत्रा, रथोत्सव, अष्टमी जागर, ग्रहण, गोकुळ अष्टमी, किरणोत्सव इ. उत्सव प्रसंगी आणखी एक आरती करतात. श्री. शंकराचार्य, आणि श्रीमान् छत्रपती ज्यावेळी देवळास भेट देतात, त्यावेळी खास आरती करण्याची प्रथा आहे. कार्तिक महिन्यात दिवाळीपासून तो, पौर्णिमेपर्यंत उत्सव करतात. हजारोंनी पुरूष व महिला ज्यास भेट देतात, तो हा उत्सव पाहण्यासारखा आहे.

संपर्क : महालक्ष्मी भक्त मंडळ धर्मशाळा, 
कपिलतीर्थ मार्केटजवळ, ताराबाई मार्ग, 
कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत, 
दूरभाष : ९१-२३१-६२६३७७

kolhapurdistrict.org च्या सौजन्याने

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF