थंड हवेची ठिकाण मुख्यपान

महाबळेश्वर

मुंबई-गोवा महामार्गावर जाताना महाड सोडल्यावर डावीकडच्या सह्याद्री पर्वत रांगेमध्ये रायेश्वर, महाबळेश्वर, कोल्हेश्वर अशी एकापेक्षा एक उत्तुंग पठारे लागतात. यापैकी महाबळेश्वर हे ब्रिटीश कालातच थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिध्दीस आले होते. ब्रिटीशांनी या ठिकाणाला मुंबई प्रांताची उन्हाळयातील राजधानी म्हणून विकसीत केले होते. या ठिकाणी येण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग (पोलदपूर मार्गे) हा सोयीचा मार्ग आहे. या शिवाय मुंबई-पुणे किंवा मुंबई-बँगलोर महामार्गावर खंबाटकी घाट ओलांडल्यावर वाई-पाचगणी मार्गे महाबळेश्वर गाठता येते.

चेरापुंजी नंतर भारतात सर्वाधिक पाऊस पडणारे हे दुस-या क्रमांकाचे ठिकाण आहे. त्यामुळे पावसाळयात महाबळेश्वर बहुतांशी चार महिने बंदच असते. महाबळेश्वर ते प्रतापगड मधले घनदाट, निबीड अरण्य म्हणजेच जावळीचे खोरे. अफझलखानाचा प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी वध केल्यानंतर मराठयांनी आदिलशाही फौजेला याच जावळीच्या खो-यात धूळ चारली होती.

महाबळेश्वरची उंची ४,७१८ फूट आहे, त्यामुळे इथून सह्याद्रीतील द-या, कडे-कपारींचे होणारे दर्शन हे निश्चितच वेगळे आहे.ब्रिटीशांच्या नावांनी ओळखले जाणारे इथले विविध पॉईंटस् पर्यटकांना विशेष आकर्षित करतात. यापैकी काही पॉईंटस् बाजारपेठेच्या जवळ तर काही १०-१३ किलोमीटरच्या परिघात आहेत. यामध्ये सर्वात प्रसिध्द आर्थर सीट पॉईंट आहे, जिथून महाबळेश्वरच्या सगळया द-याखो-यांचे दर्शन होते. याच पॉईंटपासून खाली असलेल्या विंडो पॉईंटपासून ढवळया घाटाने ट्रेकर्सना कोकणात उतरता येते. महाबळेश्वरपासून पुण्याला जाण्याच्या रस्त्यावर केटस् पॉईंट आहे. इथून कृष्णा नदीवर बांधलेल्या धोम धरणाचा परिसर, डावीकडे घंटेच्या आकाराचा कमळगड आणि समोर दिसणारे पाचगणीचे टेबलटॉप यांचे दर्शन होते. महाबळेश्वरचे पश्चिम म्हणजे लॉडविग पॉईंट. ज्याने १८२४ मध्ये मुंबईच्या उष्ण वातावरणापासून काही दिवस दूर जाता यावे म्हणून महाबळेश्वरचा आणि या पॉईंटचा शोध लावला, त्या जनरल लॉडविगच्या नावावरून या पॉईंटला लॉडविग पॉईंट असे नाव देण्यात आले. इथून पश्चिमेचा प्रतापगड आणि त्या खालचे जावळीच्या खो-याचे निसर्गदृश्य दिसते.

येथील सर्वात जुने ठिकाण म्हणजे क्षेत्र महाबळेश्वर. या मंदिरात कृष्णा, कोयना, सावित्री, गायत्री आणि वेण्णा या पाच नद्यांचा उगम होतो. स्ट्रॉबेरी, रासबेरी, मलबेरी ही महाराष्ट्रात इतर कुठेही न आढळणारी फळे आपल्याला महाबळेश्वरला मिळतात. इथला मधही चांगला असतो.

पाच पर्वतांनी वेढलेले पाचगणीही इथून जवळच आहे. येथील प्रसिध्द टेबलटॉप पठार, ब्रिटीश आणि पारशी पध्दतीची घरे, हिरव्यागार वनश्रीने नटलेला परिसर यामुळे हे ठिकाणही पर्यटकांच्या पसंतीस उतरते. तसेच महाबळेश्वरहून साधारण ३० किलोमीटर अंतरावर असलेले तापोळे हे नव्याने उदयास आलेले, शिवसागर तलावाच्या काठावर असलेले ठिकाण आहे.

महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून सुपरिचीत आहे. माणसांचीही इथे सतत वर्दळ असते त्यामुळे राहण्याची-जेवण्याची सोय असलेली भरपूर हॉटेल्स इथे उपलब्ध आहेत. याशिवाय एम.टी.डी.सी. चे बंगलेही आहेत. खिशाला परवडण्याजोग्या दरात आपली इथे सोय होऊ शकते.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF