गुहा/लेंणी मुख्यपान

लोनाड लेणे

महाराष्ट्र आणि परिसर म्हणजे बळकट दुर्गांचा प्रदेश. पण त्याचबरोबर महाराष्ट्र आपली अभयारण्ये, तलाव मंदिरे आणि लेणी यांच्यासाठीही प्रसिध्द आहे. या सर्वांची महाराष्ट्रात अगदी रेलचेल आहे. अनेक किल्ले, ताडोबा, किनवट सारखी अभयारण्ये, मुळशी, कोयनानगर असे अनेक तलाव, मंदिरे तर अगणित अजिंठा, वेरूळ, पितळखोरा अशी आंतरराष्ट्रीय ख्यातीची लेणी!

लेणी पाहायची म्हणजे मुख्यत: 'दगडांच्या देशा...' या वाक्याशी अगदी जवळीक करायची, आणि अजिंठा वेरूळ वगैरे मोठी भरपूर लेणी पाहिल्यावर आणखी लेणी पाहायची इच्छा कोणत्याही हाडाच्या पर्यटकाला असणारच.

आपल्या लेणी दर्शन यादीत एक छोटसं नाव घालून टाका... 'लोनाड'. मुंबईहून येणार असाल तर कल्याणकडे जाऊ लागावे. कल्याणहून भिवंडी गाठावी. कल्याणपासून भिवंडीगावा बाहेरून नाशिकला जाणारा बायपास पकडला की पुढेच सोनाळे फाटा नामक फाटा आहे. या फाटयावरून कच्चा रस्ता आपल्याला लोनाड गावात आणतो. परंतु त्याहीपेक्षा चांगला रस्ता म्हणजे, तसेच पुढे गेलात की, २/३ किमी. वर उजव्या बाजूस एक वळण आहे. या वळणाने रस्त्याने सरळ गेलात की, पाऊण ते एक किमी. वर उजवीकडे लोनाड गावात जाण्यासाठी रस्ता आहे. या फाटयावर डावीकडे पाहिलेत तर एक बेताच्या उंचीची टेकाड दिसेल. येथे बहुदा दगडाच्या खाणी आणि क्रशिंग नेहमी चालू असते. हे टेकाड आपल्या डाव्या हाताला लागले. इथेच उतरावे. एक बारिकसे मंदिर दिसेल. आपल्या वाहनास इथे विश्रांती द्यावी. य मंदिराजवळूनच लोनाडच्या लेण्यांकडे जाणारा मार्ग आहे. २०/२५ मिनीटांच्या सरळसोट चालीनंतर आपण दोन टेकांडांच्या मधल्या पाखेत जाऊन पोहोचतो. शेवटपर्यंत येथे काही गुहासदृश आहे, याचा पत्ता लागत नाही.

हेच लोनाडचे लेणे. संपूर्ण प्रवासात सावली औषधालाही नाही. परंतु लेण्याच्या आत जाताक्षणीच थंड वाटते. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस एक थंड पाण्याचे टाके आहे. पण पाणी पिण्यायोग्य नसावे. प्रवेशद्वाराच्या उजवीकडे एक सहा बाय चार फुटाचे दगडातील कोरीव शिल्प आहे. आजही अगदी उत्तम स्थितीत आहे. राजा, राणी, सेविका, इतर मंत्री वगैरे शिल्पे आहेत. सेविका राजाचे पाय चेपत आहे, असेही शिल्पात स्पष्ट दिसून येते. (हे शिल्प दुसरा खुश्रु याने पुलकेशीच्या दरबाराला दिलेल्या भेटीचे असावे असा तज्ञांचा तर्क आहे.) लेण्याच्या माथेपट्टीवरही काही चांगली शिल्पे कोरली आहेत. परंतु इतर ठिकाणच्या लेण्यांमधल्या कामापेक्षा हे काम कमी दर्जाचे वाटते. लेण्यात प्रवेश कल्यावर प्रथम व्हारांडा (दगडी) असून मग गर्भगृह आहे. या जागेवर हे एकच लेणे आहे याचे कुतुहल वाटते. व्हारांडयात उत्तम वारा येत असतो. पोटपूजा करावी. आतील शेंदूर फासलेल्या देवांना नमस्कार करावा. गजानन महाराजांचेही आर्शीवाद घ्यावेत आणि टेकाड उतरू लागावे.

येथून पुढे लोनाड गावात शिलाहाराने उभारलेले सुंदर शिवमंदीर आहे. ते पाहून जवळच एका शेतात एक मोठी शिळा (शीलालेख) पाहावयास जावे. गावकरी या कामात अगदी तत्पर आहेत. १० मिनिटांत आपण एका शाळेच्या इमारतीजवळ येतो. या शाळेच्या मागील शेतात हा शीलालेख पडून आहे. या शीलालेखांची अस्सलता तपासून पाहण्याकरिता मात्र अभ्यासकांची गरज लागते.

एकंदरीत भिवंडी बायपास व परिसर हा भाग रूक्ष व रखरखीत असल्याने उन्हाळयात या बाजूस न आल्यास उत्तम. पावसाळयाचे शेवटचे महिने व हिवाळा हा चांगला काळ. येथे येण्यासाठी स्वत:चे वाहन असणे श्रेयस्कर. त्यामुळे खर्चाची बचत होते, तसेच वेळही वाचतो.

लोनाड लेण्यांच्या टेकांडांवरून भिवंडी बायपास रस्ता स्पष्ट दिसतो. तसेच मलंगगड वगैरे किल्लेही दिसतात. झाडझाडोरा कमी असला तरी बुलबुल, रॉबिन, वेडे राघू यांसारखे पक्षी सहजगत्या दिसतात. मुंबई वा ठाणे येथून एका दिवसाची छोटी सहल करावयाची असेल तर 'लोनाड' लक्षात असू द्या. मात्र येथे जेवणाखाणाची, चहाचीही सोय नाही. बायपास गेल्यावर दोन्ही बाजूंना धाबे आहेत तेथेच काय ती सोय पाहायची!

प्रसाद टिळक

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF