थंड हवेची ठिकाण मुख्यपान

जव्हार

ठाणे जिल्ह्यातील जव्हार तालुका हा तेथील आदिवासींचे वास्तव्य आणि वारली चित्रकला यामुळे प्रसिध्द आहे. सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या पर्वत रांगांपैकी उत्तर पर्वत रांगांमध्ये जव्हार, मोखाडा, वाडा, खोडाळा हे प्रदेश समाविष्ट आहेत. या सर्वांची सरासरी उंची १५०० फुटांपेक्षा जास्त नसल्यामुळे पाताळात शिरणा-या द-या आणि आभाळाला भिडणारे डोंगर असे निसर्गाचे रौद्र रूप न दिसता कमी उंचीचे डोंगर आणि लहानखु-या द-या यामुळे इथल्या निसर्गाला सौम्य रूप प्राप्त झाले आहे. आधीच विपुल वृक्षराजीने नटलेला हा भाग पावसाळयात पूर्णपणे हिरव्या रंगात न्हाऊन निघतो. वळणावळणांचे रस्ते त्यावर अगणित धबधबे आणि ठिकठिकाणी आडव्या येणा-या नद्यांवर बांधलेले छोटेसे पूल यामुळे इथल्या सृष्टीसौंदर्यात भरच पडते. मुंबई ते जव्हार हे अंतर १८० कि.मी. आहे. 'ठाणे जिल्ह्याचे महाबळेश्वर' म्हणून ओळखले जाऊ लागलेले जव्हार १६०० फूट उंचीवर आहे.

इथे मुक्काम करून आजूबाजूला पाहण्यासाठी कित्येक उत्तम जागा आहेत. एम.टी.डी.सी.ने बांधलेले एक अप्रतिम रेस्ट हाऊस आहे. या रेस्ट हाऊसच्या समोरच्या टेकडीवर राजवाडयाचे विहंगम दृश्य दिसते. जयविलास पॅलेस, हिरण्यकेशी मंदिर, हनुमान धबधबा, शिर्पामाळ, नारायणगड हे इथले काही बघण्यासारखे पॉईंटस् आहेत. इथून १६ कि.मी. वर असलेला भूपतगडही ट्रेकर्सना आकर्षित करतो.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF