गड-किल्ले मुख्यपान

पक्षी राज्याचा स्वामी - कर्नाळा (जि. रायगड)

पनवेलच्या परिसरातील आपला सुळका आभाळत उभारलेला कर्नाळा, सर्वांना कुतुहलाचाच वाटतो. तो प्रस्तरारोहकांना साहसाचा आनंद मिळवून देतो, तर पक्षीनिरीक्षकांना गडाखालच्या झाडीत त-हेत-हेच्या पक्षांना न्याहाळण्याचा आनंद उपलब्ध करून देतो. शिवकाल अन् जवळच्याच शिरढोणचे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या कालखंडातील कितीतरी ऐतिहासिक घटनांचा हा मूक साक्षीदार आहे.

कर्नाळयाला कसे जाल?

कर्नाळयाला जाण्यासाठी पुणे किंवा मुंबईहून पनवेलपर्यंत एस.टी. ने जाता येते. पनवेलपासून सहा आसनी रिक्षा, जीप अशी अनधिकृत वाहने घेऊन कर्नाळयाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. ते अंतर १२ किलोमिटर आहे. कर्नाळयाला कधीकधी जेवण मिळू शकते, पण खात्रीपूर्वक मिळेलच असे नाही. पनवेलला मात्र रहाण्या-जेवण्याची सोय चांगली होऊ शकते.

यादवांचा देवगिरी - (जि. औरंगाबाद)

बाराव्या शतकात ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. त्यावेळी यादवांचं पराक्रमी घराणं महाराष्ट्रावर राज्य करीत होतं. अन् महाराष्ट्रात नंदनवनच अवतरलं होतं. यादवांची देवगिरी जणू इंद्राची अंबारीच बनली होती. सोन्याचं उन्ह, रुप्याचं चांदणं, मोत्याचा पाऊस, कस्तुरीचा धुरळा अन् अत्तराचं दंव महाराष्ट्रभर पडत होतं. महाराष्ट्र स्वर्गीय सुखात नांदत होता. स्वतंत्रता, प्रसन्नता, विशालता अन् प्रचंड वैभव देवगिरीत होतं. पण हे सुख काही नियतीला पाहवलं नाही. उत्तरेतून दौडत आलेल्या अल्लाउद्दीन खिलजीने कपट अन् अत्याचारांच्या जोरावर अवघ्या महाराष्ट्राची राजधानी, खजिना अन् अब्रू लुटली. तोच हा देवगिरी. एक अप्रतिम मिश्रदुर्ग. इथला भुयारी प्रवेश मार्ग अन् खोदीव खंदक, तासलेले कडे हे सारं सारं पहाण्यासारखं आहे.

देवगिरीला कसे जाल?

देवगिरीकिल्ला औरंगाबादजवळ आहे. पुणे किंवा मुंबईहून एस.टीने औरंगाबादला जाता येते. तेथून देवगिरीला जायला पुष्कळ बसेस, टॅक्सी आहेत. औरंगाबाद ते देवगिरी हे अंतर फक्त अर्ध्या तासाचे आहे. रहाण्या-जेवण्याची सोय औरंगाबाद शहरात उत्तमरित्या होते.

नितांत रमणीय हरिश्चंद्रगड (जि. नगर)

महाराष्ट्र भूमंडळाचे ठायी असंख्य दुर्गांची मांदियाळी आहे. पण माळशेज घाटा नजीकचा रमणीय हरिश्चंद्रगड म्हणजे एक अफलातून ठिकाण आहे. रौद्र भीषण सौंदर्याचा साक्षात्कार घडविणारा कोकण कडा उरात धडकीच भरवितो. तेथील सुरेख कोरीव कामाचं प्राचीन मंदीर, योगीराज चांगदेवांचे शिलालेख, समृध्द निसर्ग, नीरव शांतता,  कोरीव लेणी हे सारं पहायचं म्हणजे नगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगडावर जायलाच हवं. पण इथं ना मुक्कामाची उत्तम सोय, ना चहा-पाण्याची उपलब्धता. निसर्गात हरवून जायला आडवाटेवरचा हा देखणा दुर्ग पहायचा तर अडचणीच फार. पण तरीही जाऊन पहायलाच हवा.

हरिश्चंद्रगडाला कसे जाल?

पुण्याहून आळेफाटा आणि त्यानंतर आळेफाटयाहून ओतूरमार्गे खिरेश्वरला एस.टी. ने जाता येते. मुंबईहून निघायचे असले तरी माळशेजघाटामार्गे खिरेश्वरला एस.टी. ने जाता येते. खिरेश्वरला एकदा पोचले की तिथून गडावर पायी चालू लागावे लागते. वर रहाण्या-जेवण्याची कोणतीही सोय नाही. ओतूरमध्ये रहाण्या-जेवण्याची सर्वसाधारण सोय होऊ शकते.

विस्तीर्ण भुईकोट - नळदुर्ग(जि. धाराशीव/उस्मानाबाद)

धाराशीव/उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग म्हणजे एक अवाढव्य नी देखणा भुईकोट किंवा स्थळदुर्ग. तिथल्या इतर ऐतिहासिक अवशेषांबरोबर बोरी नदीवर बांधलेला जलमहाल केवळ त्यासम तोच. भरपूर पाऊस पडला तर जलमहालाच्या सज्जावर पाण्याची चादर पांघरली जाते अन् त्यातून जे दृश्य नजरेसमोर साकारले, ते त्या-सम तेच.

नळदुर्गाला कसे जाल?

पुणे किंवा मुंबईहून सोलापूर हैद्राबाद रस्त्याला लागले की नळदुर्ग शहर लागते. पुण्याहून साधारणत: ६० किलोमिटर अंतरावर ते आहे. नळदुर्ग किल्ला गावातच आहे. त्यामुळे चालत जाणे सहज शक्य आहे. नळदुर्ग गावात जेवण्या-रहाण्याची सोय होऊ शकते.

चिमाजी अप्पांचा वसई किल्ला (जि. ठाणे)

थोरले बाजीराव अन् त्यांचा शूर भाऊ चिमाजी अप्पा यांची समशेर अवघ्या देशभर तळपत होती. अन् तिकडे दुर्लक्ष करून धर्मांध आक्रमक पोर्तुगीज सत्ताधीश, वसई प्रांतात गरीब रयतेची अडवणूक अन् धर्मछळ करीत होते. यांचा मोड करावयाचा तर त्यांचा फिरंगाणातून समूळ उच्छेद करणेच आवश्यक आहे, याची जाण असलेल्या नरवीर चिमाजी अप्पा पेशवे यांनी जोरदार चढाई करून या किल्ल्याला वेढा घातला. बहुमूल्य वेळ वाया जात आहे म्हणून जोरदार हल्ला चढविण्यासाठी 'किल्ला जिंकला जात नसेल तर मला तोफेच्या तोंडी बांधून किमान माझं मस्तक तरी किल्ल्यात पडेल असे करा' हे उद्गार चिमाजी अप्पांनी काढले. ४ मे १७३९ रोजी पोर्तुगीजांनी पराभव मान्य केला आणि १३ मे १७३९ रोजी वसईचा किल्ला मराठयांना मिळाला.

वसईच्या किल्ल्याला कसे जाल?

वसईला जायला पुणे किंवा मुंबईहून रेल्वेने जाणे सोयीचे आहे. पुणे ते दादर अशी ट्रेन घेऊन दादरहून वसईरोडला जायला लोकल ट्रेन मिळतात. वसईरोड पासून वसई किल्ला १० किलोमिटरवर आहे. वसईरोडपासून किल्ल्याला जायला टांगे मिळतात. वसई गावात जेवण्या- रहाण्याची सोय होते.

श्रीबाग उर्फ अलिबागचा पाणकोट -कुलाबा (जि. रायगड)

कान्होजी आंग्रे एक नररत्न होतं. कोकणच्या भूमीत किल्ल्यांचे दाणे पेरून स्वातंत्र्याचा अन् सागरी पराक्रमाचा मळाच त्यांनी फुलवला.अरबी चाचे, धर्मांध पोर्तुगीज अन् लबाड इंग्रज अशा सा-यांना धडा शिकवणारा हा मराठयांचा अद्वितीय दर्यासारंग होता. अष्टागराच्या मर्मस्थानी त्यांनी कुलाबा किल्ला हे आपलं मुख्य ठाणं निर्माण केलं. सागरपार मूळ भूमी असणा-या सागरी शत्रूंच भय अफाट होतं. पण कान्होजींचा पराक्रम असा, की अवघ्या दर्यालाच त्यांनी पालाण घातलं. अन् त्यांचा दरारा इतका की परवानगी घेतल्याविना समुद्रावर वाराही वाहू शकत नव्हता. धाक तर असा उत्पन्न केला की या जलदुर्गाच्या पुढयात येताना लाटानाही घाम फुटावा. किल्ल्यातील श्रीगणेशमंदिर, भली थोरली पुष्करणी, अन् दोन्ही दरवाजांवरची दुर्गद्वार शिल्पे हे सारं पहायचं तर कुलाबा किल्ला पहायलाच हवा.

अलिबागच्या किल्ल्याला कसे जाल?

मुंबई व पुणे येथून अलिबागला जाण्यासाठी भरपूर एस. टी. बसेस आहेत. शिवाय मुंबईहून भाऊचा धक्का ते रेवसपर्यंत ला चही जाते. रेवसहून पुढे अलिबागपर्यंत एस.टी. बसही जाते. अलिबागमधे गेल्यावर किल्ला जवळच आहे. भरती असताना होडीशिवाय किल्ल्यापर्यंत जाता येत नाही. परंतू ओहोटीच्यावेळी किल्ल्यापर्यंत चालत जाता येते. अलिबागमध्ये रहाण्या-जेवण्याची सोय हॉटेल्समध्ये किंवा कुणाच्या घरीही होऊ शकते.

मराठयांचा सागरी पराक्रमाचा साथीदार - खांदेरी (जि. रायगड)

मराठयांच्या ताब्यातील खांदेरी म्हणजे जणू मुंबईकर इंग्रजांच्या काळजावर रोखलेला खंजीरच होता. जंजिरेकर सिद्दी अन् मुंबईकर इंग्रजांची हातमिळवणी थांबावी म्हणून खांदेरीवर शिवरायांनी अजोड जलदुर्ग उभारला. त्यांच्या बांधणीतील कच्चेपणा दूर करण्यासाठी सागरी दुर्ग उभारणीत त्यांनी आगळा वेगळा प्रयोग करून पाहिला. शिवछत्रपतींची दूरदृष्टी अन् मराठयांचं वाढतं सागरी सामर्थ्य याची खूण म्हणजे हा खांदेरीचा जलदुर्ग.

खांदेरीच्या किल्ल्याला कसे जायचे?

खांदेरीच्या किल्ल्यावर जायचे तर प्रथमत: पुणे किंवा मुंबईहून अलिबाग येथे एस.टी.च्या बसने पोचावे लागते. शिवाय मुंबईहून भाऊचा धक्का ते रेवसपर्यंत ला चही जाते. रेवसहून पुढे अलिबागपर्यंत एस.टी. बसही जाते. खांदेरीचा किल्ला सर्वसामान्य नागरिकांना भेट देण्यास मुक्त नाही. तिथे भारतीय नौसेनेचा तळ आहे, तिथे दीपगृहही आहे. तेथे काम करणाऱ्या कर्मचा-यांना नेण्या-आणण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या नियंत्रणाखाली बोटींची वाहतूक चालते ती सुध्दा आठवडयातून एकदा.

मुरूडचा जंजिरा - जलदुर्गाचा स्वामी (जि. रायगड)

'जैसा घरास उंदीर, तैसा स्वराज्यास सिद्दी' हे शिवरायांनी केलेलं मूल्यमापन अचूक आहे. राजपुरीच्या खाडीतील एक बुलंद बेट ताब्यात आणून सिद्दीने या ठिकाणी आपले पाय घट्ट रोवले. या अभेद्य अजिंक्य जलदुर्गाला हिंदवी स्वराज्यात आणावं म्हणून केलेले सारे प्रयत्न वाया गेले. हे बलाढय ठिकाण शिवाजी महाराजांच्या हाती आलं असतं तर महाराष्ट्राचा अन् पर्यायाने अवघ्या हिंदुस्थानच्या नौदलाचा इतिहास बदलला असता.

मुरुड जंजि-याला कसे जायचे?

पुणे किंवा मुंबईहून मुरूडपर्यंत एस.टी. बसची सोय आहे. जिंजि-याला जायला मुरूडहून बोटीची सोय आहे. बोटीचा प्रवास अर्ध्या तासाचा आहे. प्रत्यक्ष जंजि-यावर जेवण्या-रहाण्याची काहीच सोय नाही. परंतू ती सोय मुरूड येथे मात्र होते.

मराठयांच्या आरमाराचं वैभव - विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग)

आंग्रे अन् धुळूप या नौदलाधिपतीचं बलाढय ठाणं म्हणजे विजयदुर्ग. बलदंड अशा युरोपीयन सागरी सत्तांनाही धाक बसेल असं मराठी आरमार विजयदुर्गावर विसावत असे. तिहेरी तटबंदी अन् त्यात गुंफलेले अनेक बुरुज हे त्यांचं वैशिष्टय. किल्ल्याजवळच वाघोटन खाडीत असणारी आरमारी गोदी अन् गंगाधरपंत भानू (नाना फडणीसांचा भाऊ) यांनी उभारलेलं रामेश्वर मंदिर या पहाण्याजोग्या गोष्टी जवळच आहेत.

विजयदुर्गला कसे जायचे?

विजयदुर्गला पुणे किंवा मुंबईहून जाता येते. मुंबईहून विजयदुर्गला जाण्यासाठी थेट एस.टी. बस आहे. पुण्याहून जायचे तर प्रथम पुणे-कोल्हापूर -विजयदुर्ग अशी एस.टी. बसची सोय आहे. प्रवास मात्र बराच म्हणजे सलग गाडी मिळाली तर ११ तासांचा आहे. विजयदुर्ग गावात जेवण-रहाणे याची साधी सोय होऊ शकते.

स्वराज्याची सागरी राजधानी - सिंधुदुर्ग (जि. सिंधुदुर्ग)

आरमार म्हणजे स्वतंत्र राज्यांगच आहे. जसे 'ज्यास अश्वबळ त्याची पृथ्वी', तद्वतच 'ज्याचे जवळ आरमार त्याचा समुद्र. आपल्या छोटयाशा कारकीर्दीत स्वतंत्र आरमाराची स्थापना, उभारणी अन् प्रभाव दाखवणारा अन् सिंधुबंदीची अयोग्य रूढी तोडणारा राजा शिवाजी हा पहिलाच दूरदृर्ष्टीचा नेता ठरला. मालवणाच्या कुरटे बेटावर तीन कोट होन खर्च करून हा अवाढव्य जंजिरा तयार केला गेला. चुन्याच्या लादीवर उठलेले शिवरायांच्या हाताचे अन् पायाचे ठसे आजही सिंधुदुर्गावर पहायला मिळतात. किल्ल्यात फांदी फुटलेले एक नारळाचे झाडही आहे.

सिंधुदुर्गला कसे जायचे?

सिंधुदुर्गला जायला आता मुंबईहून मालवणपर्यंत कोकणरेल्वेने जाता येते. व त्यापुढे मालवणहून सिंधुदुर्गला जायला बोटी मिळतात. बोटीने हा प्रवास १५ ते २० मिनिटांचा आहे. पुण्याहून जायचे तर पुणे ते मालवण एस.टी.ची थेट बस आहे. सिंधुदुर्गावर जेवण किंवा रहाण्याची काहीच सोय नाही. पण मालवणला मात्र ती सोय होऊ शकते.

दक्षिणेकडचा बलाढय सागरी किल्ला - अंजदीव (गोवा)

अंजनीमातेचं निवासस्थान, श्री आर्यादुर्गेचं विस्थापित देवस्थान असणारं कारवार जवळचं एक बेट म्हणजे अंजदीव. पण इथं थेट वास्को द गामापासून युरोपीयन आक्रमकांचे पांढरे पाय विसावले ते अगदी थेट १८ डिसेंबर १९६१ रोजी हिंदी सैन्यानं गोवा मुक्ती पूर्ण करेपर्यंत. सभोवती समुद्राचं खोल पाणी, किल्ल्यावर मुबलक गोडं पाणी अन् निसर्गाचा वरदहस्त. त्यामुळे अंजदीव म्हणजे जणू खोल समुद्रात नांगरून ठेवलेली अचल युध्द नौकाच! काळी नदीकाठच्या कारवारला कधी गेलं तर अंजदीव पहायचा प्रयत्न जरूर करा.

अंजदीवला कसे जायचे?

अंजदीवला जायचे तर पुणे किंवा मुंबईहून कारवारला जावे लागते. कारवारपर्यंत जायला पुणे किंवा मुंबई दोन्ही ठिकाणाहून कारवारपर्यंत एस.टी. बस मिळतात. कारवारहून अंजदीवला जाण्यासाठी होडया असतात. अंजदीवला जेवण किंवा रहाण्याची काहीच सोय होऊ शकत नाही. पण कारवारला मात्र दोन्ही सोयी होऊ शकतात.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF