गड-किल्ले मुख्यपान

शिवशाहीचा भाग्यमणी - प्रतापगड (जि. सातारा)

'चढे घोडियानिशी त्या डोंगरातल्या उंदराला पकडून आणीन ! जिंदा या मुर्दा !' अशा वल्गना करीत निघालेला अफजलखान, तुळजापूरच्या भवानीला अन् पंढरपूरच्या विठ्ठलाला उपद्रव देत, स्वराज्याकडे धावला. शिवबावर मायेची पाखर घालणा-या जिजाऊसाहेबांना तो जणू प्रश्न करीत होता; 'बोल तुला काय हवं ? स्वराज्य की सौभाग्य?' पण १० नोव्हेंबर १६५९ - म्हणजे मार्गशीर्ष शु. ७, शके १५८१ रोजी शिवरायांची फत्ते झाली. प्रतापगड हा शिवशाहीचा भाग्यमणी ठरला.

प्रतापगडाला कसे जाल?

प्रतापगडावर जायला पुणे किंवा मुंबई येथून प्रथम महाबळेश्वर येथे जावे लागते. महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सुप्रसिध्द हिलस्टेशन आहे. महाबळेश्वर पासून प्रतापगडापर्यंत रडतोंडी घाटातून एस.टी. बस, टॅक्सी, प्रायव्हेट कार्स मिळू शकतात. महाबळेश्वरपासून सुमारे पाऊण तासात प्रतापगडापर्यंत पोचता येते. मुंबईहून पोलादपूर येथून आंबेनळी घाटातूनही प्रतापगडावर पोचता येते. प्रतापगडाच्या पायथ्याशी रहाणे-जेवणाची सोय उपलब्ध आहे. महाबळेश्वरमध्येही रहाण्या-जेवण्याच्या अत्यंत उत्तम सोयी आहेत.

दक्षिणेचा स्वामी - पन्हाळगड (जि. कोल्हापूर)

प्रतापगडावर अफजलखानाला धुळीला मिळवलं अन् शिवाजी महाराज दक्षिणेकडे दौडले. या अचानक झालेल्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी सावरून उभं रहायच्या आधीच करवीरनगरी संरक्षक दुर्ग अवघ्या १८ दिवसात म्हणजे २८ नोव्हेंबर १६५९ - मार्गशीर्ष वद्य ९, शके १५८१ रोजी शिवरायांच्या ताब्यात आला. तातडीने ऐन रात्रीच्या वक्तालाच शिवाजी राजांनी पन्हाळगड हिंडून पाहिला. सिद्दी जोहरचा वेढा अन् त्यातून यशस्वी सुटका, हा मोठा आणीबाणीचा क्षण होता. पुढे कोंडाजी फर्जंदाने अवघ्या साठ मावळयांनिशी हा बुलंद नी बळकट हल्ला करून जिंकून घेतला व पुन्हा तो स्वराज्यात आला.

पन्हाळगडाला कसे जाल?

पन्हाळा हे कोल्हापूरजवळील एक प्रसिध्द हिलस्टेशन आहे. पन्हाळयाला जाण्यासाठी कोल्हापूरहून एस.टी.बस किंवा टॅक्सीने जाता येते. साधारणत: पाऊण ते एक तासात वर पोचता येते. वर हिलस्टेशन असल्यामुळे जेवण्याची व रहाण्याची उत्तम सोय होते.

समर्थांचा सज्जनगड - (जि. सातारा)

सातारा जिल्ह्यातील, समुद्रसपाटीपासून ९०० मीटर्स उंचीवरील सज्जनगड हे समर्थ रामदासस्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेले ठिकाण. साता-याचा अजिंक्यतारा, जावळीचा वनदुर्ग, वासोटा, चंदन-वंदन, वैराटगड, नांदगिरी उर्फ कल्याणगड हे याचे सखे सोबती किल्ले. शिलाहारांनी १०-११ व्या शतकात बांधलेल्या, शंखाकृती माथा असलेल्या या किल्ल्याच्या पायथ्याला परळी हे गाव वसलेले आहे. शिवछत्रपतींच्या विनंतीनुसार समर्थांनी या गडावर वास्तव्य केले. त्यासाठी दोन हजार सुवर्ण होन खर्च करून शिवरायांनी इथे मठ बांधून घेतला. मूळचे धारातीर्थ असलेला परळीचा हा लढाऊ किल्ला, समर्थांच्या वास्तव्याने रामदासी संप्रदायाचे तीर्थक्षेत्र, 'सज्जनगड' बनला.

पायथ्याशी जायला बस किंवा रिक्षा अशी वाहने साता-याहून मिळतात. अंतर २० किलोमिटर आहे. सज्जनगडावर रामदासस्वामींचा मठ आहे. तिथे जेवण्याची - रहाण्याची सोय होऊ शकते. सज्जनगडावर जाण्यासाठी व्यवस्थित पाय-या आहेत.

पावनखिंडीच्या स्मृती जागविणारा विशाळगड उर्फ खेळणा (जि. कोल्हापूर)

पन्हाळगडाच्या वेढयातून बाहेर पडलेले शिवराय विशाळगडी पोहोचले तेव्हां शिवा न्हावी काशीद स्वराज्याच्या कामी खस्त झाला होता अन् गजापूरच्या घोडखिंडीत प्राणांची बाजी लावून ती खिंड आपल्या रुधिराभिषेकाने केव्हांच पावन करून बाजी प्रभू देशपांडे स्वर्गलोकी निघून गेले होते. विशाळगडच्या गहन अरण्यात शिर्के अन् मो-यांनी मलिक-उल- तुजारला अस्मान दाखवलं होतं. या सा-यांची आठवण करून देणारा, हा बेलाग दुर्ग, शिलाहार- राष्ट्रकूट अन् चालुक्यांच्याही स्मृती जागवितो आहे. याचे आधीचे नाव होते 'खेळणा'.

विशाळगडाला कसे जाल?

विशाळगडाला जाण्यासाठी मुंबई किंवा पुण्याहून प्रथम कोल्हापूरपर्यंत एस.टी. बस किंवा ट्रेनने जावे लागते. तेथून मलकापूरमार्गे विशाळगडाच्या पायथ्यापर्यंत एस.टी. बस मिळते. गडावर जाण्यासाठी प्रथम खाली उतरावे लागते व मग वर चढावे लागते. गडावर रहाण्या-जेवण्याची काही सोय होऊ शकते.

सर्वोच्च किल्ला, परशुरामस्थान - साल्हेर (जि. नाशिक)

सालेरी अहिवंतापासोन चंदी तंजावरापर्यंत पसरलेल्या शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील झळाळता तुरा म्हणजे साल्हेरचा किल्ला. हा तर बागलाणचा मानबिंदू, पण याचे प्रमुख वैशिष्टय म्हणजे याची उंची. महाराष्ट्रातील दुस-या क्रमांकाचे शिखर असणारे हे परशुराम स्थान. पण त्याला तटबंदीचं शेलापागोटं चढलं अन् हे दुर्गरत्न महाराष्ट्राच्या उत्तर सरहद्दीवरचं एक बुलंद नी बळकट स्थान बनलं. शिमग्याची टपरी दणाणते तसा मोरोपंतांचा पराक्रम इथं साकारला. त्यांना साथ मिळाली होती प्रतापराव सरनोबत, आनंदराव मकाजी, व्यंकाजी दत्तो, रूपाजी भोसले, सूर्यराव काकडे अन् अन्यही कितीतरी जणांची. पुढे हा किल्ला बडोद्याच्या गायकवाडांच्या ताब्यात होता.

साल्हेरला कसे जाल?

साल्हेरला जायचे तर पुणे किंवा मुंबईहून एस.टी. बसने सटाण्यापर्यंत जावे लागते. सटाण्यापासून वाघांबे किंवा केळझर (ऊर्फ तताणे) येथे गेल्यास साल्हेरचा पायथा लागतो. परंतू वाघांब्याहून वर जाणारी वाट अवघड आहे, चढ मात्र कमी आहे. याउलट केळझरहून वर जाणारी वाट सोपी आहे, पण चढ मात्र अवघड आहे. यापैकी दोन्हीही ठिकाणी जायला एस.टी. आहे. तिथे रहाण्या-जेवण्याची कसलीही सोय नाही. सटाण्याला जेवण मिळू शकते.

दुर्गदुर्गेश्वर रायगड (जि. रायगड)

जेष्ठ शुध्द १३, शके १५९६ आनंदनाम संवत्सर म्हणजे ६ जून १६७४ रोजी शिवाजीराजांना राज्याभिषेक झाला. आजवर घेतलेल्या कष्टांचं , लढायांचं सार्थक झालं. आता शिवनेरीचा शिवबा, क्षत्रिय अकुलावतंस सिंहासनाधीश्वर श्री शिवछत्रपती झाला. महाराष्ट्र वसुंधरेला चिरवांछित पती लाभला. मराठा राजा छत्रपती झाला ही सामान्य गोष्ट नव्हे. रायरी किल्ल्याचा रायगड झाला. ६ वर्षे छत्रपती म्हणून राज्य करून, चैत्र शुध्द १५ शके १६०२, हनुमान जयंती, म्हणजे ३ एप्रिल १६८० रोजी श्रीशिवछत्रपतींचे रायगडावरच अचानक निधन झाले. एका तेजस्वी पर्वाचा अकाली अंत झाला. या रायगडावर जाण्यासाठी आता रोपवेची सोयही झाली आहे. त्याची माहिती वेबसाइटवर मिळेल. त्याचा पत्ता- http://www.raigadropeway.com

महाडपासून सुमारे २१ किलोमिटर गेल्यावर रायगडाचा पायथा लागतो. तेथपर्यंत जायला बस किंवा प्रायव्हेट वाहने मिळू शकतात. रायगडावर जेवण्याची व रहाण्याची सोय आहे. रोपवेनेही रायगडावर जाता येते.त्याचे एकाच दिवसात वर जाऊन परत खाली येण्यासाठीचे तिकीट १०० रुपये आहे. दुस-या दिवशी परत यायचे असेल तर पुन्हा १०० रुपयाचे तिकीट काढावे लागते.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF