नदी/तलाव मुख्यपान

गाडेश्वर तलाव

शांतता! ही अनेक प्रकारची असते असं आपल्या सर्वांना माहीत आहे. नीरव शांतता, स्तब्ध शांतता, कीं ऽऽ शांतता आणि स्मशान शांतता! यापैकी नीरव शांततेचा अनुभव फारसा प्रवास न करता यावा असं मनापासून वाटत असेल तर पनवेलजवळ एक जागा सांगतो. ट्रेकर्स आणि वेगळया वाटेचे भटके यांना माहीत आहे, पण सर्वांसाठी सांगतो. ती जागा आहे, गाडेश्वर तलाव.

अलिकडे ट्रेकिंग करणे ज्यांना शक्य नाही पण फिरायला मात्र आवडते अशांचा स्वर्ग म्हणजे, गाडेश्वर तलाव. चहूकडे नीरव शांतता, पक्ष्यांची किलबिल आणि भणाण वारा! पनवेल एस्. टी. स्टँडवरून सकाळी गाडेश्वरला जाण्यासाठी बस सुटते. स्वत:चे वाहन असल्यास उत्तम. मुंब्रा-पनवेल रस्त्याला पनवेल शहरात शिरण्याआधी डावीकडे एक नवा रस्ता झाला आहे. 'स्वप्ननगरी' अशी पाटी या जंक्शनवर अलिकडे लावलेली आहे. या रस्त्यावरून तडक नेरे गावाचा रस्ता पकडावा. नेंरे गावात एक जुने मंदिर आहे. येथून पुढे सात-एक किमी. वर एकदम गाडेश्वर तलाव सामोरा येतो.

इतर कोणत्याही ठिकाणी फारसे न पाहिलेले दोन पक्षी पाहीले. जांभळा शिंजीर (रूक्रिब्व्रुम्) आणि तारवाली दोन्ही पक्षी जांभळया व निळया छटा घेऊन आलेले. निलपंखाचा रंग पाहून माडगुळकरांनी लिहीलंय की 'स्वातंत्र्य या गोष्टीचा रंग बहुदा निळा असावा.' तसंच मला वाटलं.

गाडेश्वर तलाव म्हणजे माथेरानच्या सनसेट पॉईंटवरून खाली नजर फिरल्यावर जो दिसतो तोच. अतिशय विस्तीर्ण अशा या तलावावर वा-याच्या झुळुकी आणि शांतता याचा अनुभवच घेतलेला बरा. एका तीरावर मातीचा बंधारा ज्याच्यावर बसून तलावाच्या पाण्याकडे एकटक बघावं आणि ताबडतोप एखादी कविता लिहावी आणि पलिकडच्या तीराला चंदेरी, नाखींद, पेब आणि माथेरान यांचे सुळके. पिकासोकडे एक घुबड होतं. याने काही चांगली कलाकृती केली की तो ती, या घुबडाला सांगे. मात्र हे घुबड एका जागी ढिम्म बसून असे. ते पाहून पिकासो म्हणाला, आपण फार सृजनशील आहोत असा गर्व झाला की हे घुबड माझं गर्वहरण करतं. तसे हे डोंगर पाहून आपल्या किडुकमिडुकपणाची लाज वाटू लागते. याही एका कारणासाठी बाहेर पडावंच असं माझं प्रांजळ मत आहे.

तलाव पाहून परत पनवेलकडे येताना वाटेत गाडेश्वराचे मंदिर आहे. छोटेखानी. पण त्याचं स्थान मन मोहून टाकतं. गर्द राई, मधे मंदिर आणि मागे गाढी नदी. वेळ नसूनही नदीवर गेलोच. टार्झनच्या चित्रपटात असतं तसं जंगल आहे. इथे एक विसरलो. गाडेश्वर तलावापासून तसंच पुढे गेलं की, मालदुंगा नावाचं नितांत सुंदर खेडं आहे. आपल्या स्वप्नातल्यासारखं... सुंदर, नीटस! गावात पोहोचल्या पासून माथेरानची एक अवाढव्य बाजू आपल्यासमोर मोठ्ठया हत्तीसारखी ठाकते.

मनाच्या गाभ्यापासून संपूर्ण शांतीचा अनुभव घ्यायचा असेल तर मालदुंगाला जा! नदीचा झुळझुळ आवाज. गर्द राई, ओले पाय... एक स्वत:ला विसरायला लावणारा अनुभव! परत येताना नेरे सोडल्यावर उजवीकडे एक फाटा आहे. हा शांतीवन नावाच्या एका नंदनवनाशी घेऊन जातो. मुद्दामहून जावे असे हे एक ठिकाण आहे.

एका दिवसात स्वत:च्या वाहनाने सुंदर शांतता अनुभवायची असेल तर गाडेश्वर-मालदुंगा आणि शांतीवन आदर्श ठिकाण आहे.

प्रसाद टिळक

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF