गड-किल्ले


भुईकोट किल्ला

Bhuikot Fort नाशिक पासून १०४ किमी लांब असणा-या मालेगाव शहरात भुईकोट किल्ला आहे. सध्या या किल्ल्यात ‘काकानी विद्यालय’ शाळा भरत आहे.

इतिहास

हा किल्ला नारोशंकर यांनी १७४० साली बांधला तर एका ठिकाणी असा उल्लेख आहे कि हा किल्ला १७६० साली बांधण्यात आला आहे.

नारोशंकर हे त्या वेळी मोगल बादशहा आलमगीर गाझी यांच्याकडे सरदार म्हणून नियुक्त होते. एकदा बादशहा शिकारीसाठी गेले असता त्यांच्यावर सिंहाने हल्ला केला. त्यावेळी नारोशंकर यांनी आपल्या जीवाची बाजी लावत त्या सिंहास ठार केले. यामुळे बादशहाने खुश होऊन नारोशंकर यांना ‘राव बहादूर’ हा किताब देऊन मालेगाव जवळील साथ ते आठ खेड्यांचा परिसर जहागीरदार म्हणून दिला. पुढे पेशव्यांनी नारोशंकर यांना महाराष्ट्रामध्ये बोलावून घेतले. नारोशंकर यांनी मालेगाव येथे वाडा बांधण्याची परवानगी पेशव्यांकडून मिळवली. मोसम नदीच्या काठावरची जागा उत्तम असल्याची माहिती सल्लागारांनी दिली आणि नारोशंकर यांनी वाडा न बांधता किल्लाच बांधला.

नारोशंकर यांनी किल्ला बांधण्यासाठी उत्तर भारतामधून कारागीर आणले होते. यामुळे किल्ल्यावर उत्तर भारतातील किल्ल्यासारखा प्रभाव दिसतो. उत्तर दिशेला किल्ल्याचा दरवाजा असून तो खंदकावरील पुलाने जोडला आहे. हा मुख्य दरवाजा सध्या मोडकळीला आला आहे. दरवाजातून आत शिरल्यावर समोरच मूळ किल्ल्याची तटबंदी आहे. हा किल्ला इंग्रजांना लढून जिंकता आलेला नव्हता म्हणून त्यांनी तो फितूरीने घेतला.

किल्ल्यावर बघण्यासारखे

अजूनही किल्ला भक्कम स्थितीत असून याचा आकार चौरस आहे. त्याच्या भोवती साधारण ४० ते ४५ फूट अंतरावर बाहेरची तटबंदी उभी करण्यात आली आहे. या तटबंदीच्या बाहेर रुंद आणि खोल असा खंदक खेदून आहे. आतील आणि बाहेरील भिंतीमधून फेरी मारता येते. किल्ल्याच्या बाहेरील तटबंदीवर चढण्यासाठी पायर्‍यांचा मार्ग केलेला आहे. बाहेरील खंदक माती आणि कचर्‍याने भरत आला आहे. त्यात काही भागात वस्तीही झाली आहे. म्हणून किल्ल्याची दुरवस्था झालेली आहे.

किल्ल्याच्या दारामध्ये तोफा ठेवलेल्या आहेत. तसेच बाजूला रंगमहाल आहे. त्याचा देखणा दरवाजा आणि त्याच्या लाकडी फळ्या अजून शाबूत आहेत. रंगमहालात नक्षीकाम पहाता येते. सर्वात वरच्या बाजूला सुबक बांधणीचे दोन घुमट आहेत. मात्र उत्तम नक्षीकाम असलेले हे घुमट उन्हापावसाने झिजून गेले आहेत. किल्ल्यावरून मालेगाव शहराचा परिसर लांबपर्यंत पहाता येतो.

सध्या किल्ल्याचे बुरुज, खंदक, दरवाजाची लाकडे यांची निगा राखण्यास शासन दुर्लक्ष करत आहे यामुळे हा वारसा पडद्याआड जाण्यास सुरुवात झाली आहे.

कसे जाल
नाशिक वरून जाण्यासाठी खासगी वाहनाद्वारे किंवा सरकारी बसद्वारे जाता येते. मालेगावला मोसम पुलाच्या काठावर हा किल्ला असल्याने शोधण्यास काहीच अडचण येत नाही. Location Icon

संकलन – गौरव