मंदिरे/तीर्थक्षेत्रे मुख्यपान

अंबरनाथ-शिवमंदिर

मुंबईनगरीचे एक उपनगर अंबरनाथ. अंबरनाथ हे नाव बहुतेक अमरनाथ म्हणजेच शिवशंकर यावरुन पडले असावे. हळेबीड-बेलूरची आठवण व्हावी असे एक महादेवाचं मंदिर इथे आहे. मंदिराचे प्रवेशदाराजवळ एक शिलालेख आढळते. रॉयल एशियाटीक सोसायटीच्या एका खंडात हा इ. स. १०६० चा शिलालेख छापला आहे. मंदिराच्या प्रवेशदारापाशी दोन नंदी आहेत. एका नंदीच्या गळयात शिवलिंग आहे. आत शिरल्यावर अठरा खांबांचा भव्य सभामंडप दिसतो त्यातले चारच खांब आता दिसतात ज्यावर सुरेख नक्षीकाम दिसते. बाकीचे खांब मात्र भिंतीत बुजले आहेत. मंडपाचे छत व कळस यामझे पोकळी आहे.कोनात जोडून असलेल्या गाभाऱ्यामुळे ऊनसावल्यांचा वेधक दृष्य पहायला मिळते. संपूर्ण मंदिर सव्वादोनशे कोरीव हत्तींच्या पाठीवर बांधलेले आहे. मंदिराच्या बाह्यांगाला चारी बाजूला विविध शिल्पे आहेत. त्यात त्रिशूल घेतलेली शिवमूर्ती, लक्ष्मीची मूर्ती, शिवलिंग, पार्वती, नरमुंडधारी महाकाली, शिवपार्वती विवाह, हंसारुढ ब्रम्हदेव, वराहरुढ विष्णू ,ऊजव्या सोंडेचा गणपती, नृत्यांचे आविष्कार, शृगांरिक कामशिल्पे आढळतात. काळाच्या ओघात त्यात बरीच पडझड झालेली आहे.

सभामंडपातील कोरलेले खांब म्हणजे कोरीवकामाचा उत्कृष्ट नमुनाच होय. सभामंडपाच्या मध्यभागावरील झुंबर त्याच्या भोवतालची वर्तुळे, घुमट, त्यावरचे नक्षीकाम फारच सुरेख आहे. गाभारा दिवसाउजेडी पाहिला तर आतील भागात योगी शिव कोरलेला दिसतो. सभामंडपापासून दहाबारा पाय-या उतरल्यावर गाभारा दिसतो. त्यात एक स्वयंभू काळया पाषाणाचे शिवलिंग व दुसरे घडीव गारगोटीचे शिवलिंग आहे. आंबा, चिंच यांची दाट राई इथे एकेकाळी असावी असं वाटतं. वढवाण नदीच्या ऐन काठावर हे मंदिर सहज लक्षात येत नसलं तरी प्रेक्षणीय नक्कीच आहे.

कसे जाल?
अंबरनाथ हे सेंट्रल लाईनवर मुंबई दादर स्टेशन पासून ५२ किमी. वर आहे. रेल्वेने गेल्यास १ तासाचे अंतर आहे व हे मंदिर अंबरनाथ स्टेशपासून रिक्शाने काही मिनिटांच्या अंतरावर आहे.

कुंदा कुलकर्णी

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF