भाज्या-तोंडीलावणी मुख्यपान

 

 

सुरणाची भाजी

साहित्य - अर्धा किलो पांढरा सुरण, (लाल अथवा गुलाबी सुरण खाजरा असतो), १ डावभर तेल, फोडणीचे साहित्य, चिंच, साखर चवीनुसार, १ चमचा लाल तिखट, ५-६ सुक्या लाल मिरच्या, १ चमचा उडदाची डाळ, थोडे किसलेले ओले खोबरे

कृती - सुरणाची सालं काढून सुरणाच्या लांबट पातळ फोडी कराव्यात. उकळत्या पाण्यात ३-४ आमसुले किंवा चिंच टाकून थोडे मीठ टाकून सुरणाच्या फोडी उकडून घ्याव्यात. १ डावभर तेलाची, कडीपत्ता, जिरे, मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. फोडणीत लाल मिरची व उडदाची डाळ घालावी व उकडलेल्या सुरणाच्या फोडी घालाव्यात. किसलेलं ओलं खोबरं घालावे. लगेच मीठ व साखर घालावी. भाजी खरपूस परतून कोथंबीर घालून उतरवावी.

यात चिंचेचा कोळ घातल्याने सुरणाची खाज निघून जाते. तसंच चिंच मलभेदक आहे म्हणून बध्दकोष्ठामुळे ज्यांना मूळव्याधीचा त्रास होतो, त्यांनी ही भाजी जरूर खावी. सुरण हा उत्तम उपाय अर्शाघ्न (मूळव्याधीचा नाश करणारा) आहे. मूळव्याधीचा त्रास असणार्‍यांनी रोजच्या आहारात सुरण जरूर वापरावा.

 
 
 

सुरणाच्या पाल्याची भाजी

साहित्य - सुरणाचा कोवळा पाला, भिजवलेली हरभरा डाळ, लाल मिरच्या, एक-दोन आमसुलांचं पाणी, ओलं खोबरं, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट, दोन चमचे गुळ, तिखट, मीठ.

कृती - सुरणाची कोवळी पानं मधला दांडा वगळून बारीक चिरावीत .कढाईत फोडणीमध्ये सुक्या मिरच्यांचे दोन-तीन तुकडे तळून त्यावर भिजवलेली चणा डाळ टाकून परतावी. थोडी मऊ झाल्यावर सुरणाचा पाला टाकावा. पाला परतून त्यावर आमसुलाचं पाणी घालावं. मीठ, तिखट, गुळ घालून भाजी मंद आचेवर शिजू दयावी. शेंगदाण्याचा कूट, खोबरं घालून खायला द्यावी.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF