अळूची पातळ भाजी

भाज्या-तोंडीलावणी मुख्यपान

 

साहित्य : ३ अळूच्या जुडया (१ जुडीत ७-८ पाने असतात), १ चुका जुडी, १ मुळा, १/२ वाटी हरबर्‍याची डाळ, १/२ वाटी कच्चे शेंगदाणे, थोडे सुक्या खोबर्‍याचे काप, मोठया लिंबाएवढी चिंच, ४-५ हिरव्या मिरच्या, १/२ वाटी ओले खोबरे, १/२ चमचा मेथीचे दाणे, १ डहाळी कढीलिंब, दीड चहाचा चमचा तिखट, चवीनुसार मीठ, १ मोठया लिंबाएवढा गूळ, दीड चमचा काळा मसाला, २ डावभरून गोडेतेल, फोडणीसाठी मोहरी, हिंग व हळद प्रत्येकी १ चमचा लहान १ डावभरून गोडेतेल, फोडणीसाठी मोहरी, हिंग, व हळद प्रत्येकी १ चमचा (लहान), १ डाव हरबर्‍याच्या डाळीचे पीठ

कृती : आदल्या दिवशी रात्री हरबर्‍याची डाळ व दाणे वेगवेगळे भिजत घालावेत. अळूची पाने ओल्या फडक्याने पुसून घ्यावीत व बारीक चिरावीत. चुका व मुळाही बारीक चिरावा. सर्व भाज्या धुवून चाळणीवर निथळत ठेवाव्यात. एका पातेल्यात डावभर तेल घालून त्यावर अळूची व चुक्याची चिरलेली पाने, देठे वगैरे घालून जरा परतापवे. नंतर एका बेताच्या पातेल्यात भिजलेले दाणे, डाळ, खोबर्‍याचे काप, काजू, मिरच्या, व परतलेली अळूची व चुक्याची पाने, देठ, वगैरे घालून ही पातेली साध्या किंवा प्रेशर कुकरमध्ये ठेवून, भाजी शिजवून घ्यावी. भाजी शिजल्यानंतर, वरचे पाणी बाजूला काढून, भाजी गरम आहे, तोच छावाने घोटून घ्यावी. भाजी घोटतानांच त्यात डावभर डाळीचे पीठ घालावे. नंतर मोठया पातेल्यात हिंग, मोहरी, हळद घालून तेलाची फोडणी करावी. फोडणीतच मेथीचे दाणे व कढीलिंब घालावा. नंतर त्यावर वरील घोटलेली भाजी घालावी. थोडे पाणी घालून ढवळावे. त्यात चिंचेचा कोळ, तिखट, मीठ, काळा मसाला व गूळ घालून ढवळावे. भाजी आवडीनुसार दाट किंवा पातळ करावी. नंतर त्यात कोथिंबीर व खोबर्‍याचे काप घालून चांगल्या चार उकळया येऊ द्याव्यात. प्रखर विस्तवावर भाजी जरा आटली की डाळीचे पीठ शिजते व चिंचेचा उग्रपणा कमी होतो.

टीप : भाजीसाठी अळू निवडतांना काळया देठाची पाने घ्यावीत म्हणजे अळू खाजरा निघत नाही. अळूने घशाला खाज येऊ नये म्हणून भाजीत चिंच व चुक्याचा आंबट पाला घालण्याची पध्दत आहे. चुक्याची पाने घातल्यामुळे अळूची भाजी छान मिळून येते व जास्त चवदार लागते

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF