संस्कार मुख्यपान

मुलांसाठी योग - योगाकडून यशाकडे...

आताचे युग हे संगणकाचे युग आहे. तसेच अनेक वेगवेगळया क्षेत्रातील स्पर्धेचे ही युग आहे. हया स्पर्धेला वयाचे व विषयाचे बंधन नाही. हीस्पर्धा अतिशय लहान वयापासून सुरू होते व ती कधी संपतच नाही. या स्पर्धेत जो जिंकतो तो यशस्वी होतो व जो हरतो तो अपयशी होतो. जो हया स्पर्धेत तग धरू शकतो तो आत्मविश्वास मिळवतो व स्वत:ची प्रगती करून घेतो, व जो तग धरू शकत नाही तो हरतो, आत्मविश्वासगमवून बसतो. हयातून नैराश्य निर्माण हाते. जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक होत जातो. अभ्यासाची नावड उत्पन्न होते. सारासार विचार करण्याची प्रवत्ती नष्ट होते. हया गोष्टीतूनच विघातक गोष्टी करण्याची मुलांची प्रवत्ती होते.

जेंव्हा अडीच तीन वर्षाची मुले पाठीवर दप्तर घेऊन शाळेत जातात. त्यावेळी आजूबाजूच्या बदलणाऱ्या अनेक गोष्टींना सामोरे जात असतात. शाळेत होणाऱ्या अनेक स्पर्धा व शालेय अभ्यासक्रम हयात आपल्या मुलाने सतत यशस्वी व्हावे अशी पालकांची तीव्र इच्छा व त्यासाठी पालकांनी केलेले प्रयत्न व त्या प्रयत्नात मुलांची होणारी शारीरिक व मानसिक ओढाताण. आजच्या गतीमान जीवनामुळे व बदलत्या राहणीमान व विचारसरणीमुळे पालकांचे मुलांकडे होणारे दुर्लक्ष त्यामुळे मुलांचा मानसिक कोंडमारा होत असतो. खरे तर शालेय जीवनाचा काळ हा मुलांच्या सर्वांगीण (व्यक्तीमत्व) विकासाचा अतिशय महत्वाचा काळ. हया वयात ब-याच गोष्टी पालकांच्या आग्रहाखातर मुलांना मनाविरूध्द स्वीकारायला लागतात. अशावेळी त्यांच्या मनात प्रचंड वैचारिक संघर्ष चाललेला असतो. अशा काळात मुलांचा व पालकांचा संवाद साधला गेला नाही तर अशा वैचारिक संघर्षाचा ताण हा मुलांच्यात अस्थिरता निर्माण हाणे, चिडचिडेपणा वाढणे, हेकेखोरपणा वाढणे, उलट उत्तरे देणे, एकलकोंडा स्वभाव होणे, आत्मकेंद्रित होणे अशा वागण्यातून बाहेर पडतो. अशा वर्तनाचे मूळ हे घर, शाळा व आजूबाजूच्या परिस्थितीमुळे निर्माण होणऱ्या मानसिक ताणतणवात असते.

हया व अशा मानसिक ताणतणावाची तीव्रता कमी करण्यासाठी इ.स. पूर्व 500 वर्षांपूर्वी जगाचे पालकत्व स्वीकारून महामुनी पतंजलींनीनिर्मिलेल्या योगशास्त्राचा उपयोग व्यक्तिमत्व विकासासाठी खात्रीलायकरित्या होऊ शकतो.

आजच्या काळात योगाचा अभ्यास म्हणजे केवळ आसन, प्राणायाम, शुध्दी क्रिया, मुद्रा, बंध, व ध्यानधरणा असे मानले जाते. पण हा अभ्यास इतकाच नसून त्याची व्यापकता 'पातंजल योग सूत्र' हया ग्रंथात, योग:श्चित्तवृत्तिनिरोध: ॥ पातंजल योग सूत्र 1-2 ॥ असे सूत्र सांगून स्पष्ट केली आहे.

योग म्हणजे चित्ताच्या वृत्तींचा निरोध होय.

वरील सर्व साधनांच्या सहाय्याने चित्तवृत्तींचा निरोध करणे इतकी सर्वंकष अशी हया सूत्राची व्याप्ती आहे. त्याचबरोबर पतंजलींनी अष्टांगयोग सांगितला आहे. हयामधील पहिली दोन अंगे यम व नियम. यम व नियमांतार्फत्, साधकाने समाजात कसे वर्तन करावे व साधकाचेस्वत:चे वर्तन कसे असावे हया विषयीचे मार्गदर्शन पातंजल मुनींनी केले आहे. अशी ही दोन अंगे (यम व नियम) पालकांकडून काही प्रमाणातअंगिकारली जाऊन पालकांकडूनच मुलांवर अतिशय चांगले संस्कार करता येतील.जीवनाच्या सुरवातीचा काळ हा विद्याग्रहणाचा काळ असे सर्वसाधारणपणे मानले जाते. अशा हया काळात ज्ञान संपादण्यासाठी एकाग्रता आवश्यक असते. योगशास्त्राच्या अभ्यासाने, स्मरणशक्ती, आत्मविश्वास यात सकारात्मक बदल घडवून आणता येतात, त्याच बरोबर शारीरिक व मानसिक वाढ देखील निकोप व सुदृढ अशी होते.

पुढे >>

- सौ. चारूता प्र. फाळके

मुंबईच्या चारूता फाळके हयांनी योग विषयाची पदवी प्राप्त केली असून, त्या योग-प्रशिक्षक आहेत. निरनिराळया रोगांवर त्या योग-पध्दतींचा वापर करून उपचार सुचवितात, तसेच मुलांच्या व्यक्तित्त्व विकासाकरिता कार्यशाळा घेतात.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF