अन्न हे पूर्णब्रम्ह मुख्यपान

 

पक्वान्ने

 


 

मोदक विविध प्रकार

 


 

रुचिपालट म्हणून, तसेच सणासुदीला नेहमीपेक्षा जास्त चविष्ट व उंची पदार्थ खाण्याची प्रथा जगभर आहे. भारतीय परंपरेनुसार तर अनेक सण व त्याच्याशी निगडीत असलेले अनेक पदार्थ प्रांतोप्रांती आढळतात. महाराष्ट्र राज्यही त्याला अपवाद नाही. महाराष्ट्राचे खरे पक्वान्न म्हणजे पुरणपोळी. हरबऱ्याची डाळ,गूळ व गहू यांपासून बनविलेली ही पोळी शेतकऱ्यांपासून उच्चभ्रूवर्गातील सर्वाचा आवडीचा पदार्थ आहे. त्याचे पोषण मूल्यही जास्त आहे. पण मऊसूत आणि अलवार पुरणपोळी बनविणे हे कौशल्याचे, सुगरणीचे काम आहे. बैलपोळयापासून ते होळीपर्यंत कोणत्याही सणाला सर्वसामान्य महाराष्ट्रीय माणूस हेच पक्वान्न खातो. त्याच बरोबर विविध ऋतुनुसार शरीराला पोषक अशी पक्वान्ने करण्याची प्रथा आहे. उदाहरणार्थ थंडीच्या दिवसात जास्त उष्मांकाची जरूरी असल्यामुळे तीळ व गूळ वापरून केलेली गूळपोळी खाण्याची प्रथा आहे. श्रीखंड, बासुंदी या पदार्थांना पेशवाईत फार महत्व प्राप्त झाले व आता श्रीखंडातच आंबरस घालून आम्रखंड नावाचा एक चविष्ट पदार्थ लोक आवडीने खातात. कोकण भागात, जिथे नारळाचे भरपूर उत्पन्न होते तिथे नारळापासून बनविलेले उकडीचे मोदक, किवा तांदुळाच्या घावनाबरोबर नारळाच्या दुधापासून बनविलेले घाटले करण्याची प्रथा आहे. टिकाऊपणाच्या दृष्टीने व सार्वजनिक भोजनाच्या प्रसंगी मोतीचूर किंवा बुंदीचे लाडू करण्याची पध्दत आहे. अशा अनेक पदार्थांपैकी महाराष्ट्रातील खास पक्वान्नाच्या कृती येथे दिलेल्या आहेत.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF