मुखशुध्दी

वैदिक काळापासून आजपर्यंत ज्या काही प्रथा आपण टिकवून ठेवल्या आहेत त्यात विडा, सुपारी, बडीशेप, धणाडाळ, वेलची, कलिंगड, भोपळयाच्या बिया अशा अनेक वस्तू आपण मुखशुध्दी म्हणून घेत असतो. ह्या प्रकारास आपल्याकडे अन्नपचनाच्या दृष्टीने महत्वाचे स्थान आहे. मुखशुध्दीचे पदार्थ म्हणजे उदा. मसाला सुपारी हे अत्यंत चविष्ट असून ते खाताना तोडांत भरपूर लाळ निर्माण होते. अन्नपचनाच्यादृष्टीने उपयुक्त असते.

बडीशेप, मसाला सुपारी, विडे यासारखे पदार्थ मुखशुध्दी म्हणून वापरले जातात. जेवणाच्या तयारीबरोबरच जेवणानंतर द्यावयाचे विडे तयार करून ठेवले जातात किंवा विडयांच्या सर्व साहित्याची तयारी एकाच तबकात करून ठेवली जाते. भोजनानंतर प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार विडा तयार करून घेतो. विडयासाठी थोडी जूनी व पिवळट पाने वापरावीत. ती अधिक रुचकर लागतात. विडयाच्या पानात चुना, कात, सुपारी, वेलची, लवंग, बदाम, खोबरे, जायफळ, जायापत्री, केशर, ककोळ, कस्तुरी आणि कापूर असे १३ पदार्थ घातले जात असल्याने याला त्रयोदशीगुणी विडा म्हणतात. गोविंद विडा, पुडीचा विडा, मद्रासी विडा, खणाची पट्टी असे अनेक प्रकारचे विडे प्रसिध्द आहेत. खास विडा करताना त्यात थोडी गुंजाची पाने घालतात. थोडा गुलकंद घालून श्रीमंती थाटाचा विडा केला जातो. आयुर्वेदामध्ये सुपारी, जायफाळ, कापूर, लवंग, कस्तूरी इ. मुखाला स्वच्छ ठेवणाया तिखट व तुरट रसात्मक पदार्थासह तांबूल सेवन (पान सेवन) करावे असे म्हटले आहे.

आपण फक्त जेवणानंतरच विडा घेतो, परंतू झोपून उठल्यावर, आंघोळीनंतर, उलटी झाल्यास त्यानंतरही तांबूलसेवन करण्यास सांगितले आहे.

विडा हा तिखट, कडू, गोड, तुरट, क्षार अशा रसांनी युक्त, उष्ण गुणाचा, वात, कफ, कृमी, मुखदुर्गंधी यांचा नाश करणारा, मुख स्वच्छ करून त्यास कांती देणारा, मुखातून होणारा अतिरिक्त कफाचा स्त्राव व गलरोग दूर करणारा असा १३ गुणांनी युक्त आहे.

सुपारी ही पचायला जड, थंड, रुक्ष, तुरट रसाची, कफ पित्ताचा पित्ताचा नाश करणारी, रुचिकार, भूक वाढवणारी असते. खैराचा काथ हा कफ व पित्त यांचा नाश करतो. चुना हा वातकफपित्तनाशक आहे.

विडा चावून झाल्यावर पहीली पिंक थुंकून टाकावी कारण ती विषासारखी मारक असते. दुसरी पिंक रेचक व पचायला कठीण असल्याने तीही थुंकून टाकावी. तिसरीपासून पुढील कोणतीही पिंक न थुंकता गिळावी कारण ती अमृततुल्य तसेच आरोग्याला हितकारक आहे. विडा खाल्यामुळे पचनास मदत होतो, म्हणून मेजवानीनंतर विडा खाण्याची प्रथा आहे.

विडा

vida साहित्य – नागवेलीची पाने (त्यालाच विडयाची पाने म्हणतात ) काताच्या गोळया, चुना, बडीशेप, बारीक किसलेले कोरडे खोबरे किंवा खवलेले ओले खोंबरे, वेलदोडे, लवंग, कुटलेली मसाला सुपारी अथवा कातरलेली सुपारी.

कृती – प्रथम ओलसर कपडयावर विडयाची पाने स्वच्छ पुसून घ्यावीत. त्याचे देठ काढून टाकावेत. पानाच्या शिरा फार जाड असतील तर त्याही काढून टाकाव्यात. साधारणत: एक विडा दोन पानांचा मिळून करतात. त्यामुळे जितके विडे करावयाचे आहेत त्याच्या दुप्पट पाने जोडीने मांडावीत. नंतर पानाला थोडा थोडा चुना लावावा. प्रत्येक पानावर २/३ कात गोळया, लहान चमचाभर सुपारी, वेलदोडयाचे ६-८ दाणे, लहान चमचाभर बडीशेप व १ चमचाभर ओले खोबरे किंवा कोरडया खोबर्‍याचा कीस घालावा. नंतर पानाची पुडी करून त्याला लवंग टोचावी.

गोविंद विडा

govind vida साहित्य – नागवेलीची पाने (त्यालाच विडयाची पाने म्हणतात), काताच्या गोळया, चुना, बडीशेप, बारीक किसलेले खोबरे किंवा खवलेले ओले खोबरे, वेलदोडे, लवंग, कुटलेली मसाला सुपारी, अथवा कातरलेली सुपारी.

कृती – प्रथम ओलसर कपडयावर विडयाची पाने स्वच्छ पुसून घ्यावीत. त्याचे देठ काढून टाकावेत. पानाच्या शिरा फार जाड असतील तर त्याही काढून टाकाव्यात, साधारणत: एक विडा पाच पानांचा मिळून करतात. त्यामुळे जितके विडे करावयाचे आहेत त्याच्या पाचपट पाने घ्यावीत. एका विडयाची पाने घेऊन त्यांना प्रथम चुना लावावा, एका पानाचा द्रोणासारखा आकार करून त्यात २/३ कात गोळया, लहान चमचाभर सुपारी, वेलदोडयाचे ६-८ दाणे, लहानचमचाभर बडीशेप व १ चमचाभर ओले खोबरे किंवा कोरडया खोबर्‍याचा किस घालावा. नंतर हे पान चारीबाजूंनी दुमडून त्रिकोणी आकार द्यावा. नंतर हा त्रिकोण वर येईल, अशा तर्‍हेने हे दुमडलेले पान दुसर्‍या पालथ्या पानावर ठेवावे व प्रथम लांबीच्या बाजूने पाने दुमडून घ्यावीत,नंतर रुंदीच्या बाजूने दुमडावीत. याच प्रकारे पाच पाने एकावर एक ठेऊन मोठा त्रिकोण तयार होतो, या दुमडी निघू नयेत म्हणून सपाट बाजूने लवंग टोचावी.