आमटीचे प्रकार

तूर, मूग, हरबरा, मसूर आणि उडीद या डाळी व त्यांपासून बनविलेले पदार्थ हा महाराष्ट्रातील शाकाहारी लोकांच्या जेवणातील प्रथिने (प्रोटिन्स) पुरवणारा मुख्य घटक आहे. हरबऱ्याच्या डाळीचे भजी, वडे, फरसाण हे तर अत्यंत चटकदार व सर्वांच्या आवडीचे पदार्थ. परंतु या डाळींपासून बनविलेल्या रोजच्या जेवणातील विविध प्रकारच्या आमटया हा खास महाराष्ट्रीय पदार्थ.

पूर्वी तुरीचे घट्ट वरण, भात, तूप आणि लिंबू यानेच बहुतांश मराठी घरांतून रोजच्या जेवणाची सुरूवात होत असे. हल्ली नोकरीनिमित्त बाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांना ही चैन रोज करता येत नाही. परंतु सणावाराला, उपास सोडताना मात्र साधेवरण-भात यांवाचून चालणारच नाही. (साधे) वरण- भात यांना ‘राजा-प्रधान’ म्हंटले जाते. लसूण, कांदा किंवा टोमॅटो, कोथिंबीर घालून केलेले फोडणीचे वरण, चिंच-गूळ व गोडा मसाला आणि कढीपत्ता वापरून केलेली आमटी, पुरण शिजवल्यावर त्यातीलच थोडे पुरण व डाळ शिजविताना आलेला कट (डाळीचे पाणी) वापरून केलेली अत्यंत चविष्ट कटाची आमटी, लसणीच्या फोडणीची घट्ट मुगाची डाळ, मेथीचे दाणे डाळीबरोबर शिजवून,आमसुले घालून केलेली डाळ-मेथी हे नित्याच्या जेवणातील, तर उपवासासाठी भाजलेल्या शेंगदाण्यांपासून बनविलेली दाण्याची दाट आमटी असे आमटीचे प्रकार महाराष्ट्रभर लोकप्रिय आहेत. पोळी-भाकरी यांसारखे कोरडे पदार्थ खाताना तोंडीलावणे म्हणून, चवीसाठी आणि ओले कालवण म्हणून आमटी बनविली जाते. शिळी भाकरी कुस्करून त्यावर गरम गरम कांद्याची आमटी घालून खाणे हे शेतकरी वर्ग, तसेच खेडेगावातील लोकांचे आवडते जेवण असते. या विविध प्रकारच्या आमटयांच्या कृती दिलेल्या आहेत.

आमसुलाचे सार

amsul-saar साहित्य – १०-१५ आमसुले, १/२ नारळाचे दूध, मीठ, तिखट, साखर, थोडे वाटलेले जिरे.

कृती – ४ कप पाण्याला उकळी आणावी व त्यात आमसुले तासभर भिजत घालावीत. नारळाचे दूध काढावे. आमसुले भिजत घातलेले पाणी गार झाले की त्यातून आमसुले काढून टाकावीत, त्यात नारळाचे दुध, मीठ, साखर थोडे तिखट व वाटलेले जिरे घालावीत, वरून हिंग-जिरे घालून तुपाची फोडणी द्यावी. हे सार पुन्हा गॅसवर ठेवून गरम करायचे नाही. ह्या सारात नारळाच्या दुधाऐवजी गोड ताक घातल्यासही चव चांगली येते.

आंब्याची आमटी

mango-amti साहित्य – हरभरा डाळ, कैरी, मीठ, गूळ, गरम मसाला, डाळीचे पीठ, फोडणीचे सामान,

कृती – हरभर्‍याची डाळ व कैरीच्या फोडी शिजवून घ्याव्यात. त्यात मीठ, जरा जास्त गूळ व गरम मसाला घालावा. थोडे डाळीचे पीठ पाण्यात कालवून त्यात ओतावे. (तिखट घालू नये.) नंतर हिंग, मोहरीची फोडणी करून आमटीत घालावी.

कटाची आमटी

katachi-amti साहित्य – हरभरा डाळ, तिखट, मीठ, गूळ, कडीलिंब, लवंग, दालचिनी, थोडे जिरे, खोबरे, फोडणीचे सामान, चिंच.

कृती – पूरण शिजवून घेतल्यानंतर खाली जे पाणी राहते, त्याला कट असे म्हणतात. कट फार दाट असेल तर त्यात पाणी घालून सारखा करावा. नंतर त्यात तिखट, मीठ, गूळ, कडीलिंब घालावा. चिंच कोळून घालावी. लवंग, दालचिनी, थोडे जिरे, खोबरे वाटून त्यात घालावे. खोबर्‍याचा तुकडा विस्तवावर भाजून घ्यावा म्हणजे आमटी खमंग लागते. नंतर नेहमीप्रमाणे हिंग, मोहरी, व हळद घालून तेलाची फोडणी करावी. त्यावर सारखा केलेला कट घालावा. ह्या कटाच्या आमटीत शेवग्याच्या शेंगाही घालतात.

मसूराची आमटी

masoor-amti साहित्य – १ वाटी मसूराची डाळ, १ मोठा कांदा, जिरे, लसूण, मिरची, टॉमेटो, डाळ, मोहरी, हिंग, हळदी, नारळ, कोथिंबीर.

कृती – १ वाटी मसूराची डाळ, १ मोठा कांदा चिरून ३-४ मिरच्या व अर्धवट शिजत आली की त्यात चिरलेला कांदा वाटलेले जिरे, लसूण, मिरची घालावी व टॉमेटो घालून डाळ शिजू द्यावी. डाळ पूर्ण शिजली की आपल्याला जेवढी आमटी पातळ हवी तेवढे पाणी घालावे व २-३ आमसूले व चवीनूसार मीठ व गूळ घालावा. आमटी चांगली उकळू द्यावी. कढईत डावभर तेल तापवून, मोहरी, हिंग, हळदीची, फोडणी करावी त्यात ३-४ लसणाच्या पाकळया घालून लसूण चांगला लाल तळला गेला की आमटीला खमंग फोडणी द्यावी. नारळ, कोथिंबीर घालून आमटी खाली उतरवावी.