उपवासाचे पदार्थ मुख्यपान

उपवासाची मिसळ


साहित्य - साबुदाण्याची खिचडी (वाटीभर साबुदाणा असेल तर ३/४ वाटी उकडलेल्या बटाटयाच्या फोडी या प्रमाणात करावे. शेवटी लिंबाचा रस मिसळावा) १ लहान वाटी नॉयलॉन साबुदाणा तळून घेणे, काकडी किंवा कोशिंबीर, खारे दाणे १ लहान वाटी, साखर, कोथिंबीर, १ मोठी वाटी दही.

कृती - हे सर्व पदार्थ तयार करून ठेवावे. प्रत्येकाच्या बशीत खिचडी घालून ती बशीत पसरावी. त्यावर २-४ चमचे खारे दाणे, त्यावर तितकाच तळलेला साबुदाणा, त्यावर तितकाच बटाटयाचा कीस, त्यावर डावभर दही, त्यावर ३-४ चमचे काकडी चव, कोथिंबीर हे सर्व पदार्थ पेरावेत. चवीपुरती साखर पेरावी. खाणार्‍याने आपल्या आवडीप्रमाणे हे सर्व मिसळून घ्यावेत. वरील पदार्थांचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त करावे.

उपवासाचे पंचांमृत


साहित्य - १-२ चमचे दाण्याचे कूट, मिरच्या, जिरे, मीठ, साखर किंवा गूळ, तूप, चिंच.

कृती - तूप जिरे यांची फोडणी त्यावर मिरचीचे तुकडे टाकावेत व एक कपभर पाणी फोडणीस घालावे. पाणी उकळले की त्यात दाण्याचे कूट घालून ढवळावे. नंतर त्यात चिंच कोळून घालावी. मीठ व गूळ चवी पुरते घालावे. थोडे घट्ट झाले की खाली उतरवावे. हे पंचामृत ३-४ दिवस टिकते.

बटाटयाचा कीस


साहित्य - बटाटे, दाण्याचे कूट, मीठ, मिरच्या, तूप जिरे.

कृती - बटाटे स्वच्छ धुवून, साले काढून किसून घ्यावेत, नंतर किसही पाणी घालून स्वच्छ धुवावा व पिळून ठेवावा. जिरे घालून तूपाची फोडणी करावी. त्यावर मिरच्यांचे तुकडे व बटाटयाचा किस घालून परतावे, नंतर त्यात दाण्याचे कूट व मीठ घालून चांगले ढवळून झाकण ठेवावे. मधून मधून कीस हलवावा. शिजला की उतरवावा. गरमच खायला द्यावा. असाच रताळयाचा कीस करावा

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF