पक्वान्ने मुख्यपान

तिळाचे लाडू


साहित्य - अर्धा किलो पॉलिशचे पांढरे तीळ, अर्धा किलो चिक्कीचा गूळ, अर्धा पावशेर डाळे, अर्धा पावशेर सोललेले शेंगदाणे, अर्धा वाटी खोबर्‍याचा किस, ७-८ वेलदोडयांची पूड

कृती - तीळ भाजून घ्यावेत, नंतर गुळाखेरीज सर्व वस्तू एकत्र करून त्याचे दोन भाग करावेत, गूळाचेही दोन भाग करावेत. जाड बुडाच्या पातेल्यात गूळ घालून गॅसवर ठेवावा. थोडया वेळात गूळ पातळ होईल, सतत गूळ हलवत रहावा. गूळ पातळ झाला की त्यात एक चमचा तूप घालून वरील तिळाच्या मिश्रणाचा एक भाग व शेंगदाणे व वेलदोडयांची पूड घालावी. जरा हलवून तूप लावलेल्या ताटात वरील मिश्रण ओतावे. लगेचच छोटे छोटे लाडू वळावेत. हे लाडू कडक पण कुरकुरीत होतात.

दिंड

साहित्य - २ भांडी हरभरा डाळ, २ भांडी गूळ, अर्धे जायफळ पूड, ५-६ वेलदोडयांची पूड, २ वाटया कणीक, ४ टेबलस्पून कडकडीत तेल, चिमूटभर मीठ.

कृती - हरभरा डाळ निवडून धुवून शिजवून घ्यावी व चाळणीवर टाकून पाणी निथळून घ्यावे. डाळ डावाने एकजीव घोटावी व गूळ घालून पुरण शिजवावे, त्यात जायफळ व वेलदोडे पूड घालावी, हे पुरण वाटायचे नसते म्हणून डाळ चांगली घोटून घ्यावी. २ वाटी कणकेत चिमूटभर मीठ व ४ टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन घालून कणीक घट्ट भिजवावी व झाकून ठेवावी. कणकेचे सारखे पुरीसाठी १७ ते १८ गोळे करावेत व  एका गोळयाची पुरी लाटावी. शिजवलेले १ टेबलस्पून पुरण पुरीच्या मधोमध ठेवावे व पुरीच्या दोन्ही बांजूनी पुरणावर घडी घालावी, लांबट आकार होईल. मग बाजूच्या दोन्ही बाजूंची घडी एकमेकांवर घालावी. चौकोनी आकाराची दिंड तयार होतील, अशी सर्व दिंड करावीत. मोदकपात्रात किंवा चाळणीत मलमलचे फडके टाकून दिंड ठेवावीत व पाण्याच्या वाफेवर मोदकपात्रात अथवा कुकरमध्ये उकडावीत. उकडलेली दिंड साजूक तुपाबरोबर खायला द्यावीत, वरील साहित्यात १८ ते २० दिंड होतील. हे नागपंचमीचे खास पक्वान्न आहे.

दिवे

साहित्य - ३ वाटया जाडसर दळलेली कणीक, २ वाटया चिरलेला गूळ, ६ टेबलस्पून तेल, चिमूटभर मीठ, खायचा सोडा, अर्धी वाटी साखर (भरपूर गोड आवडत असल्यास)

कृती - पातेल्यात अर्धी वाटी पाणी, गूळ व साखर एकत्र करून गूळ विरघळेपर्यंत पाणी उकळवावे. त्यात ६ टेबलस्पून तेल घालावे व पाणी परातीत घालावे.  कोमट झाल्यावर चिमूटभर सोडा घालून कणीक घालून व पीठ भिजवावे व त्या पिठाचे पेढ्याएवढे गोळे करून त्यांना दिव्याचा आकार द्यावा. चाळणीवर मोदकपात्रात मलमलचे फडके टाकून त्यावर दिवे ठेवून पाण्याच्या वाफेवर अथवा कुकर मधे उकडावीत. साजुक तुपाबरोबर खायला द्यावेत.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF