भोजन कसे घ्यावे

आपल्या जेवणाचे प्रमाण ठरवण्यसाठी साधे सोपे गणित सांगितले आहे. आपल्या जठराचे ४ भाग करा. त्यातील २/३ भाग घन/ठोस आहार (भात, भाजी, चपाती इ.) घ्या. १/४ भाग द्रवाहार घ्या (दूध, ताक, रस, सूप इ.). उरलेल्या १/४ भाग रिकामा ठेवा. यामुळे जठरात त्याचे चलनवलन नीट होऊन त्याचे पचन नीट होते. म्हणून तर आपल्याकडे म्हणतात, ‘सावकाश = स+अवकाश’ जेवावे.

भोजनक्रम

आहार जेव्हा आपल्या शरीराच्या तापमानाचा होईल तेव्हाच त्याचे आपल्या पाचकाग्निद्वारे पचन होते. योग्य पचनासाठी भोजनक्रम असा असावा:

१) प्रथम घोटभर पाणी प्यावे.

२) यानंतर मधुर व स्निग्ध पदार्थ खावेत. यामुळे अन्ननलिकेला स्निग्धत्व प्राप्त होते व पुढील घास ठोठरे न बसता सुलभपणे पुढे जातात. भूक लागलेली असताना पोटात वायुदोष वाढलेला असतो. या वायूची शांती अशा पदार्थांनी होते. यामुळे पुढे होणारे पचनाचे विकार टाळता येतात. तूप लावलेली पोळी किंवा भाकरी असे जड पदार्थ सर्वप्रथम खावेत कारण भुकेलेला माणूस असे पचायला जड पदार्थ सहज पचवू शकतो. यानंतर भात व हलके पदार्थ घ्यावेत. वरण, भात, तूप व वर लिंबू पिळून खाणे ही अत्यंत योग्य पध्दत आहे. प्रथिने (डाळीचे वरण), कर्बोदके (तांदळाचा भात), स्निग्ध (तूप) व विटॅमिन्स या सर्वांचे हे अगदी योग्य मिश्रण आहे.

३) यानंतर खारट व आंबट पदार्थ घ्यावेत. हे पदार्थ जठरात पाचक स्त्राव स्त्रवायला मदत करतात. यात लोणची, पापड, कोथिंबीर या सर्वांचा समावेश होतो पण ही अत्यंत मर्यादित प्रमाणातच घ्यावीत.

४) सर्वात शेवटी तिखट, कडू, व तुरट रस असावेत. भाजी, कढी, ताक हे पदार्थ सर्वात शेवटी घ्यावेत. आवळयासारख्या तुरट रसाच्या आणि कारलं, मेथीसारख्या कडू रसाच्या पदार्थांचा समावेश रोजच्या आहारात जरूर करावा.

आपल्याकडे हल्ली स्वीट डिश म्हणून मिष्टान्ने शेवटी खाण्याची पध्दत रूढ होत आहे. हे पदार्थ स्वभावत: पचनाला जड असतात. आधी खाल्लेल्या पदार्थांच्या पचनात पित्त व्यग्र असताना अशा पदार्थांचे व्यवस्थित पचन होत नाही.

अति थंड, अति गरम, अति कोरडे, अति शिजवलेले, शिळे अन्न कधीही खाऊ नये. अति थंड पदार्थ हे जरी स्पर्शाला थंड असले तरी प्रत्यक्षात ते अति पित्तकर असतात कारण त्यांना आपल्या शरीराच्या तापमानाला आणण्याकरीता जठरात अधिक पित्ताचा स्त्राव होतो. अति उष्ण पदार्थांचे तोंड येणे व यांसारखे अनेक दुष्परिणाम तर आपणास माहितच आहे.

आहाराचा प्रमाणे पाणी पिण्याचाही क्रम आहे. काही लाकांना जेवणापूर्वी भरपूर पाणी प्यायची सवय असते तर काहींना जेवणानंतर. पेटलेल्या विस्तवावर पाणी ओतलं की विस्तव जसा विझून जातो त्याप्रमाणे जेवणापूर्वी पाणी प्यायल्यास पाचकाग्नी विझून जातो. म्हणजेच सर्व पाचक स्त्राव पातळ होतात. याने अग्निमान्द्य होऊन हळूहळू पचनाच्या तक्रारी उद्भवू लागतात. भूक न लागणे ही यातील प्रमुख तक्रार असते. हळूहळू माणूस कृश होत जातो.

जेवल्यानंतर पाणी पिणेही तितकेच वाईट. या सवयीमुळे पुढे स्थौल्य, मधुमेह, तसेच आमाचे विकार उद्भवू लागतात. या पाण्याने पाचक स्त्रावाद्वारे अन्न पचविण्याच्या क्रियेत अडथळा येतो. त्यामुळे जेवताना एक ते दीड ग्लास पाणी मध्ये-मध्ये घोट घोट घेत रहावे.

विरुध्दाहार

ज्या दोन वस्तू वेगवेगळया खाण्याने अपाय होत नाही परंतु, त्याच वस्तू एकत्र करून, मिसळून खाल्ल्या तर त्या शरीराला विषाप्रमाणे अपायकारक होतात. अशा वस्तू एकत्र करणे म्हणजे विरुध्दाहार होय.
दूध व आंबट फळे (कैरी, चिंच, करवंद, अननस, मोसंबी, द्राक्ष) एकत्र करुन खाणे.
वरी, मटकी, कुळीथ, उडीद, वाटाणे, वाल दुधाबरोबर खाणे.
कच्चा मुळा व दूध एकमेकांअगोदर खाऊ नयेत, त्याने चामडीचे विकार होण्याची शक्यता असते.
दूध, भात, मीठ एकत्र खाणे. दूध व मासे एकत्र खाणे.
दही कधीही तापवून खाऊ नये.
ताक किंवा दह्याबरोबर केळ खाणे.
गरमागरम जेवणानंतर आईस्क्रीम किंवा शितपेये घेणे.
तूप व मध सम प्रमाणात एकत्र खाणे.
मोहरीच्या तेलात परतलेले मासे, हळकुंड.
मध, दही, मद्य यापैकी कशाबरोबरही उष्ण पदार्थ खाणे.
ताक व कारल्याची भाजी एकत्र खाणे.
रात्री झोपतांना सातूचे पीठ खाणे.
उन्हात तापलेल्या शरीराने थंड दूध किंवा पाणी प्यायल्याने रक्तपित्त होते.