मधल्या वेळचे पदार्थ

पालक वडया

spinach-vadaya साहित्य – १ पालक जुडी, अर्धी वाटी घट्ट ताक, अडीच वाटया मुगाच्या डाळीचं पीठ, धणे-जिरे १-१ चमचा, अर्धा चमचा तिखट, २-३ चिमटी हींग, चवीनुसार मीठ, हळद अर्धा चमचा.

कृती – पालक निवडून धुऊन बारिक चिरावा. त्यात अर्धी वाटी घट्ट ताक, मुगाच्या डाळीचं पीठ, हळद, धणे-जिरं पूड, तिखट, हे सर्व एकत्र कालवून सैलसर भिजवावे. गरज वाटल्यास पाणी घालावे, कुकरच्या भांडयाला आतून तेलाचा हात लावून त्यात हे पीठ पातळसर थापावं. भांडयावर वरून झाकण ठेऊन १५ ते २० मिनिटे शिजवावे. शिजलेल्या पिठाच्या वडया कापून त्या तव्यावर दोन्ही बांजूनी भाजून काढाव्यात. भाजतांना थोडं थोडं तेल बाजूनं सोडावं. (पालकात लोह व कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात. शरीराची प्रतिकार क्षमता वाढविण्याचे काम तो करतो. हा उत्तम सारकही आहे, यात उष्मांक कमी मिळत असल्याने लठ्ठ माणसांनी याचा समावेश आहारात जरूर करावा.)

सुरळीच्या वडया

साहित्य – १ वाटी डाळीचे पीठ, १ वाटी आंबट ताक, १ वाटी पाणी, तिखट, मीठ हिंग व हळद.

सारणाचे प्रमाण – १/२ वाटी ओले खोबरे, १ चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, मीठ, साखर, फोडणीसाठी तेल, तिखट.

कृती – एका जाड बुडाच्या भांडयात डाळीचे पीठ, ताक, पाणी, तिखट, मीठ, हिंग व हळद यांचे व्यवस्थित मिश्रण करावे, गुठळी करू नये. नंतर हे भांडे गॅसवर ठेवावे व सतत ढवळत रहावे. खाली लागू देऊ नये. मिश्रण शिजत आले की त्याला एक प्रकारची चकाकी येते, हे मिश्रण एका स्टीलच्या ताटाला लाऊन पहावे, गार झाल्यावर चटकन उचलले गेले की मिश्रण झाले असे समजावे व गॅस बंद करावा.

स्टीलच्या ताटाला थोडे तेल लाऊन, थोडे थोडे मिश्रण ताटावर पसरावे. थंड झाल्यावर त्याच्या शंकरपाळयासारख्या वडया कापाव्यात खायला देतांना त्यावर कोथिंबीर व खोबरेकिस सजवून द्यावे.

कोथिंबीर वडया

koriander-vadaya साहित्य – १ जुडी बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरच्या, ओले खोबरे, खसखस, जिरे गरम मसाला, डाळीचे पीठ, मीठ, तेल, साखर.

कृती – चिरलेल्या कोथिंबीरीत वरील सर्व जिन्नस बारीक वाटून घालावे, डाळीचे पीठ, साखर, मीठ घालून सैलसर मिश्रण भिजवून ते कुकूरमध्ये उकडून घ्यावे. गार झाल्यावर त्याच्या वडया कापून तळाव्यात.

खरवसाच्या वडया

milk-paneer साहित्य – १/२ लि. गायीच्या किंवा म्हशीच्या खरवसाचे दूध, गायीचे किंवा म्हशीचे साधे दूध, गूळ किंवा साखर अंदाजे, जायफळ किंवा वेलची पूड.

कृती – चिकाचे दूध कितपत दाट आहे ते पाहून त्यात साधे दूध घालावे. पहिल्या दिवसाचे दूध असल्यास साधे दूध चिकाच्या दूधात तिप्पट व नंतरच्या चिकात दोन्ही दुधे समप्रमाणात घ्यावीत. चांगले गोड होईपर्यंत साखर किंवा गूळ मिसळावे. आवडीनुसार जायफळ किंवा वेलची पूड घालावी. हे मिश्रण कुकूरमध्ये (शिट्टी न लावता) ठेऊन साधारणपणे अर्धा तास वाफवावे. थंड झाल्यावर सुरीने वडया पाडाव्यात.