दिवाळीचा फराळ मुख्यपान

ओल्या नारळाच्या करंज्या


साहित्य - ३ वाटया रवा, १ वाटी मैदा, १/४ चमचा मीठ, ८ चमचा पातळ डालडाचे मोहन

सारण - २ मोठे नारळ, ३ वाटया साखर, वेलची पूड, ५० ग्रॅम बेदाणा, १० ग्रॅम बदाम, थोडा रोझ इसेन्स.

कृती - रवा, मैदा पीठ व डालडा एकत्र करून दुधात किंवा पाण्यात घट्ट पीठ भिजवावे. साधारण तासाभराने पाटयावर पीठ कुटून घ्यावे व त्याच्या बेताच्या आकाराच्या लाटया करून, ओल्या कपडयाखाली झाकून ठेवाव्यात.

खोबरे व साखर एकत्र करून अगदी मिनिटभर गॅसवर ठेवावे. साखर विरघळली की लगेच उतरवावे. नंतर त्यात इसेन्स, वेलची पूड, बेदाणा व बदामाची सालं काढून केलेले काप घालावेत. वरील पिठाच्या पातळ पुर्‍या लाटून त्यात नारळाचे सारण भरून करंजीसारखे दुमडून कडा चांगल्या जुळवून नंतर कातण्याने कापून मंदाग्नीवर तळाव्यात.

भाजणीच्या चकल्या


भाजणीचे साहित्य - २ किलो जाडे तांदूळ, १ किलो हरभरा डाळ, अर्धा किलो उडीद डाळ, १०० ग्रॅम धने, ५० ग्रॅम जिरे.

भाजणीची कॄती - तांदूळ स्वच्छ निवडून धुवावेत व कपड्यावर वाळत घालावेत. हरभरा डाळ व उडीद डाळ वेगवेगळी धुवुन कपड्यावर वाळत घालावी. सर्व जिन्नस एक दिवसभर चांगले वाळले की दुस-या दिवशी कढईत मंद आचेवर हलक्या गुलाबी रंगावर भाजावेत. धने भाजून त्यात मिसळावे व जिरे न भाजता तसेच मिसळावे. भाजणी गिरणीतून बारीक दळूण आणावी.

चकलीचे साहित्य - वरीलप्रमाणे केलेली भाजणी ५ फुलपात्री भरूण अर्धी वाटी तेल, चार चहाचे सपाट चमचे तिखट, चार चहाचे सपाट चमचे मीठ, २ टेबलस्पून तीळ, तळण्याकरीता तेल.

चकल्यांची कृती - एका पातेल्यात २ फूलपात्री पाणी घ्यावे. त्यात अर्धी वाटी तेल. तिखट, मीठ घालावे व गॅसवर ठेवून त्या पाण्याला उकळी येऊ द्यावी, लगेच गॅस बंद करून त्या पातेल्यात ५ फुलपात्री भाजणी घालून नीट ढवळावे व त्यात दीड फुलपात्रे गार पाणी ताबडतोब घालून भिजवलेली भाजणी झाकून ठेवावी. एका तासाने २ टेबलस्पून तीळ घालून आवश्यकतेनुसार पाणी लावून भाजणी परातीत चांगली मळावी. मळलेली भाजणी सो-यात भरून कागदावर २ ते ३ वेढयाच्या एकसारख्या ४-५ चकल्या घालाव्या. पसरट कढईत अंदाजे पाऊण किलो तेल घालावे व तेल चांगले तापले की एकावेळी ५-६ चकल्या घालून खमंग तळाव्यात. गॅसची आच मध्यम ठेवावी. खूप कमी व खूप प्रखर नको. वरीलप्रमाणे सर्व चकल्या एका रंगाच्या तळाव्या. चकल्या नेहमी घट्ट झाकणाच्या लोण्याबरोबर आवडीनुसार खायला द्याव्यात.

चिरोटे (पाकातले)


साहित्य - २ वाटया भरून मैदा, १ चिमूट मीठ, तांदळाची पीठी, ४ चहाचे चमचे कडकडीत तेल, २ टे. स्पून डालडा साटयां करता. तळण्याकरता तूप अथवा रिफाइंड तेल, २ वाटया साखर, अर्धी वाटी पाणी, थोडा केशरी रंग अथवा केशर.

कृती - मैदा चाळून चिमूटभर मीठ व चार चहाचे चमचे कडकडीत तेल घालून भिजवावा, खूप घट्ट भिजवू नये. (मैदा भिजवतांना त्यात १ टे. स्पून दही घालावे, म्हणजे चिरोटयाला आंबट गोड चव येते व चिरोटे हलके होतात), दोन टे. स्पून डालडा परातीत हलके होईपर्यंत फेटावे. पांढरे शुभ्र झाले की कोमट करावे.

मैद्याचे सारखे चार गोळे करावेत व तादंळाच्या पीठीवर पातळ मोठया पोळया लाटाव्यात व ओल्या फडक्याखाली अथवा प्लास्टिकच्या कागदाखाली ठेवाव्यात. मैद्याची एक पोळी पसरवून त्यावर फेटलेले कोमट डालडा हाताने कडेपर्यंत सारखे लावावे व त्यावर दुसरी पोळी पसरवावी. त्यावर कडेपर्यंत डालडा लावावे व गुंडाळी हलक्या हाताने करावी. गुंडाळीच्या कडेचा थोडा भाग कापून एक सारखे १० भाग करावेत. कापलेला भाग पोळपाटावर ठेवून कापलेल्या दिशेने एकदा व दुसर्‍या बाजूने नंतर असा चौकोनी चिरोटा लाटावा असे १० भाग लाटावे. कढईत भरपूर तेल अथवा तूप घालून मंद आचेवर दोन्ही बाजूंनी झार्‍याने तूप उडवून चिरोटे फुलवून घेऊन गुलाबी रंगावर तळावा. भोकाच्या चाळणीत खाली ताटली ठेवून सर्व चिरोटे उभे लावावेत व तूप निथळू द्यावे. वरीलप्रमाणे उरलेल्या दोन पोळयांना साठा लावून त्याचे चिरोटे तळून घ्यावेत.  कढईमध्ये दोन वाटया साखर, अर्धी वाटी पाणी, हवा असल्यास रंग अथवा केशर घालून पक्का पाक करावा. गॅस मंद करून वरील पाकातून एक एक चिरोटा उलटापालट करून चाळणीत उभा ठेवावा. पाक सुकला की चिटे ताटात काढून घ्यावेत.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF