पक्वान्ने मुख्यपान

तळलेले मोदक


साहित्य - २ नारळ खवून, २ वाटी पिवळाधमक चिरलेला गूळ अथवा २ वाटी साखर, ५-६ वेलदोडयांची पूड, १ वाटी मैदा व १ वाटी रवा, चिमूटभर मीठ, ३ टेबलस्पून, कडकडीत तेल तळण्याकरता डालडा अथवा रिफांईड तेल

कृती - २ खवलेले नारळ, अथवा गूळ घालून सारण चिकट होईल असे शिजवून घ्यावे व वेलदोडा पूड घालून ठेवावे. रवा, मैदा, ३ टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन व चिमूटभर मीठ घालून शक्यतो दुधात अथवा पाण्यात घट्ट भिजवून १ तास झाकून ठेवावे. भिजलेला मैदा हाताने चांगला मळून २१ लाटया कराव्यात. पोळपाटावर पुरीएवढी लाटी लाटावी. हातावर घेऊन मुखर्‍यापाडून वाटी करावी. १ चहाचा चमचा भरून सारणमध्ये भरावे व मोदकांचे तोंड बंद करावे. असे सर्व मोदक भरून घ्यावेत. कढईत मंद आचेवर सर्व मोदक गुलाबी रंगावर तळून घ्यावे. वरील साहित्यात २१ मोठया आकाराचे मोदक होतात.

उकडीचे मोदक

सारणाचे साहित्य - २ मोठया वाटया नारळाचे ओले खोबरे (एक मोठा नारळ) १ वाटी साखर किंवा गूळ, ५-६ वेलदोडयांची पूड, १ टेबल चमचा बेदाणा, २-३ कुस्करलेले पेढे.

कवचाचे साहित्य - २ फुलपात्रे तांदुळाचे पीठ (तांदुळ धुवून, वाळवून, दळून आणावेत) २ चमचे पातळ डालडा, अर्धा चमचा मीठ.

कृती - ओले खोबरे व साखर एकत्र करून अगदी मिनीटभर गॅसवर ठेवून ढवळावे, साखर वा गूळ विरघळेतोवरच उतरावे, नंतर त्यात वेलदोडयांची पूड, बेदाणे व कुस्करलेले पेढे घालून सारण करावे. जरा जाड बुडाच्या पातेल्यात २ फुलपात्रे पाणी ठेवावे. पाण्यातच पातळ डालडा व मीठ घालावे व पाण्याला उकळी आली की त्यात तांदुळाचे पीठ वैरावे, उलाथण्याच्या टोकाने ढवळावे व झाकण ठेवावे. मंदाग्नीवर चांगली वाफ येऊ द्यावी. नंतर पातेले खाली उतरवून घ्यावे व झाकण ठेवावे. २-४ मिनिटांनी ह्यातली थोडीशी उकड परातीत काढून हाताला थोडे तेल व पाणी लावून ती मळून घ्यावीख्‍ पाणी थोडेसेच वापरावे, नंतर मोठया लिंबाएवढया उकडीच्या गोळयाचा वाटीसारखा आकार करून त्यात वरील नारळाचे सारण भरून, मुखर्‍या करून मोदक बंद करावेत, असे ५-६ मोदक तयार झाले की मोदक पात्रात चाळणीवर एक घट्ट पिळलेले ओले फडके पसरून त्यावर मावतील तेवढे मोदक (फक्त मोदकाची खालची बाजू) पाण्यात जरा बुडवून वाफवण्यासाठी ठेवावेत. मोदकपात्रातील पाण्याला उकळी आल्यापासून १० मिनिटांनी मोदक बाहेर काढावेत.

टीप - हे मोदक साच्यावरही करता येतात. काही वेळा थोडीशी उकड उरते त्या वेळेस थोडया वाटलेल्या मिरच्या, हळद व मीठ घालून छोटया पुर्‍यांसारखे करून वाफवावे, चवीला खूप छान लागतात. ह्यालाच निवगर्‍या म्हणतात.

जोंधळ्याच्या पीठाचे मोदक

साहित्य - १ नारळाचे खोबरे, १ १/२  वाटी बारीक चिरलेला गूळ, ४ /५  वेलदोडे, २ वाटया जोंधळ्याचे (ज्वारी) पीठ, मीठ व तूप.

पूर्व तयारी -  पांढरे जोंधळे स्वच्छ  धुवून, कपडयावर वाळवून घ्यावेत. नंतर ते गिरणीतून दळून आणावेत. मैद्याच्या चाळणीने पीठ चाळून घ्यावे.

कृती - प्रथम नेहमीप्रमाणे नारळ आणि गुळाचे सारण तयार करून, शिजवून घ्यावे. नेहमी मोदकाला घेतो, त्याप्रमाणे जितक्यास -तितके पाणी घ्यावे. एका जाड बुडाच्या पातेल्यात पाणी घालून त्यात मीठ व तूप टाकावे. पाण्याला उकळी येताच पातेले गॅसवरून खाली उतरवून त्यात पीठ घालावे व उलथन्याच्या टोकाने पीठ ढवळावे. नंतर गॅसवर ठेवून दोन वाफा आल्यावर उतरवावे व मळून घ्यावे आणि नेहमीप्रमाणे मोदक करावेत. हे जोंधळ्याचे (ज्वारी) मोदक अगदी तांदुळाच्या पिठाच्या  मोदकासारखे लागतात.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF