चटण्या - कोशिंबीर मुख्यपान

भाज्यांचे तात्पुरते लोणचे


साहित्य - १ गाजर (साधारण १०० ग्रॅम), १०० ग्रॅम फ्लॉवर, १ सलगम (५० ग्रॅम), अर्धी वाटी मटारचे दाणे, ३ हिरव्या मिरच्या, १ लहानसा आल्याचा तुकडा, २ चमचे मोहरी, १/२ चमचा मेथीच्या दाण्यांची पूड, १/२ चमचा हिंग, १ चमचा हळद, २ टेबल चमचा मीठ, २ लिंबाचा रस, १ पळी तेलाची फोडणी.

कृती - सर्व भाज्या व मिरच्या चिरून त्यांना मीठ चोळून ठेवावे. मोहरी बारीक कुटून ठेवावी. आल्याचे बारीक तुकडे करावेत, नंतर हिंग हळद, मेथीपूड व सर्व चिरलेल्या भाज्या व आले हे सर्व एकत्र करावे. तेलाची फोडणी करून कालवलेल्या भाज्यांवर ती गार करून घालावी व लिंबाचा रस घालावा. हे लोणचे अत्यंत चविष्ट लागते. हे लोणचे ५-६ दिवसच टिकते.

गाजराचे लोणचे


साहित्य - अर्धा किलो लालभडक गाजर, १०० ग्रॅम हिरव्या मिरच्या, ८ ते १० लिंब, पाऊण वाटी मोहरी डाळ, पाव वाटी लाल तिखट, १ चमचा हिंगपूड, १ वाटी मीठ, १ वाटी तेल.

कृती - गाजर स्वच्छ धुवून सोलून मधला पिवळा भाग काढून टाकून गाजराच्या एकसारख्या छोटया पातळ फोडी कराव्यात. लिंबाचा रस काढून घ्यावा. मिरच्यांचे गाजरासारखे छोटे तुकडे करावेत. २ टे. स्पून तेल गरम करून त्यात हिंग व मेथी तळून घ्यावी व उरलेले तेल ताटलीत तिखट, हळद घेऊन त्यावर ओतावे. मेथी व हिंग बारीक वाटून घ्यावा व त्याच पाटयावर मोहरीच्या डाळीला एक घसरा द्यावा. मेथी, हिंगाची पूड, तिखट, हळद, मीठ सर्व एकत्र मिसळावे व त्यात गाजराच्या व मिरचीच्या फोडी घालाव्यात व लिंबाचा रस घालावा. उरलेल्या तेलाची मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी व ती फोडणी गार झाल्यावर लोणच्यावर घालून लोणचे बरणीत भरावे.

आवळयाचा मुरांबा


साहित्य - डोंगरी (अहमदाबादी) आवळे १ किलो, साखर सव्वा किलो, केशर व वेलची आवडीप्रमाणे.

कृती - प्रथम आवळे स्वच्छ पुसून स्टीलच्या किसणीने किसावेत. प्रेशरकुकरमध्ये आवळयाचा किस चाळणीत ठेवून वाफवावा. साखरेत एक ते सव्वा वाटी पाणी घालून गोळीबंद पाक करावा. नंतर त्यात वाफवलेला आवळयाचा किस घालून घट्टसर होईपर्यंत शिजू द्यावे.

टीप - हा मुरांबा पाचक, पित्तशामक, क्षुधावर्धक व जिभेची रुची वाढवत असल्यामुळे पोळी, पुरी, ब्रेडबरोबर किंवा नुसता खायला सुध्दा चांगला लागतो.

मेतकूट


साहित्य - १ वाटी हरभर्‍याची डाळ, १/२ वाटी तांदूळ, १/२ वाटी उडदाची डाळ, २ चहाचा चमचा गहू, १ चहाचा चमचा जिरे, १ चहाचा चमचा हिंग, १ चहाचा चमचा हळद, २ चहाचा चमचा तिखट, १ चहाचा चमचा धने, १ चहाचा चमचा मोहरी, १/२ चहाचा चमचा मेथीचे दाणे.

कृती - दोन्ही डाळी, तांदूळ व गहू भाजून घ्यावे. नंतर डाळी व बाकीचे सर्व पदार्थ एकत्र करून मिक्सरवर बारीक करावे. तयार झालेले पीठ नंतर चाळणीने चाळून बाटलीत भरून ठेवावे. मेतकूट बरेच दिवस टिकते, मऊ भाताबरोबर ते छान लागते.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF