दिवाळीचा फराळ मुख्यपान

अनारसे


साहित्य - जुने तांदूळ, गूळ, तूप, खसखस.

कृती - तांदूळ ३ दिवस भिजत घालावेत. नंतर चाळणीवर उपसून ठेवावेत व कपडयावर वाळत घालावेत. साधारण कोरडे झाले की खलबत्यात कुटावेत किंवा मिक्सरवर बारिक करून घ्यावेत. मैद्याच्या चाळणीने पीठ चाळून घ्यावे.

जेवढे तांदूळ असतील तेवढा गूळ किसून घ्यावा व पिठात मिसळावा. १ वाटी पिठाला २ चमचे तूप याप्रमाणात तूप घालावे. सर्व पीठ कालवून मोठे गोळे करून स्टीलच्या डब्यात ठेवावेत. ३-४ दिवसांनी अनारसाचे पीठ काढून घ्यावं. त्यात १/४ चमचा सायीचे दही घालून पीठ मळावे. नंतर पिठाची पेढयाएवढी गोळी करून खसखशीबरोबर थापावी. नंतर हा अनारसा मंदाग्नीवर तळावा. खसखशीची बाजू वर येईल, अशा तर्‍हेने अनारसा तुपात सोडावा. त्यावर झार्‍याने तूप उडवावे, म्हणजे जाळी छान पडते. अनारसा कधी उलटून तळायचा नाही. निवल्या शिवाय अनरसा कडक होत नाही. अनारसा फार जाड थापू नये.

कडबोळी


साहित्य - थालीपीठ भाजणी २ फुलपात्री भरून, २ टे. स्पून तीळ, २ चहाचे चमचे तिखट, २ चहाचे चमचे मीठ, १ चहाचा चमचा ओवा, ४ टे.स्पून कडकडीत तेल, तळण्याकरता तेल.

कृती - एका पातेल्यात २ फुलपात्री भरून थालीपीठ भाजणी घ्यावी. त्यात तीळ, ओवा, तिखट, मीठ घालावे व ४ टे. स्पून तेल तापवून घालावे. सर्व नीट मिसळावे व १ फुलपात्र भरून पाणी उकळून भाजणीवर घालावे व मिसळून झाकून ठेवावे. एक तासाने भाजणी हाताने पाणी लावून खूप मळावी. थोडीशी भाजणी घेऊन पोळपाटावर बोटाने वातीसारखी लांब वळावी. साधारण २ इंचाएवढी लांब नळी झाली की नळीची दोन्ही टोकं एकत्र दाबून कडबोळ तयार करावे. पसरट कढईत तेल तापवून आच  मंद करावी व वरीलप्रमाणे तयार केलेली १०-१२ कडबोळी घालून मंद आचेवर काळपट रंगावर खमंग तळावीत. मऊ किंवा कच्ची ठेवू नयेत. वरील साहित्यात अंदाजे अर्धा किलो कडबोळी होतात.

साटोर्‍या


सारणाचे साहित्य - १ वाटी बारीक रवा, १ वाटी गूळ, १ वाटी मैदा, थोडेसे तूप, ४ चमचे खसखस, ४ चमचे खोबर्‍याचा कीस, वेलची पूड

सारणाची कृती - रवा तुपात भाजावा, तो कोमट झाल्यावर त्यात २-३ चमचे गरम पाणी शिंपडावे व परत भाजावा गूळ बारीक चिरून त्यात एक चमचा पाणी घालून गॅसवर ठेवावा व तो थंड झाल्यावर त्यात गूळ, बारीक केलेला खोबर्‍याचा कीस कुटलेली खसखस व वेलची पूड घालावी. मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यावेत.

साटोर्‍यांच्या उंडयाचे साहित्य - दोनदा चाळलेली कणीक, दीड मोठी वाटी, मोहन ३ चमचे, मीठ १/४ चमचा.

कृती - कणीक, तेल व मीठ घालून भिजवावी व पुरीच्या कणके इतपत घट्ट मळावी. सारणाची गोळी असेल तेवढीच कणकेची गोळी घ्यावी. सारण घालून झाल्यावर उंडयाचे तोंड नीट बंद करावे व ती पुरीसारखी लाटावी. तळण्यासाठी तेल किवा तूप गरम झाल्यावर तळाव्यात. साटोर्‍या ४-५ दिवस टिकतात.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF